आरोग्यमंत्री म्हणतायत, लसीचा एकच डोस पुरेसा! पण डॉक्टरांचं म्हणणं मात्र वेगळंय…

महाराष्ट्राला कोविड-१९ चा जबरदस्त फटका बसला. लोकांच्या आरोग्यासोबतच आर्थिक घडीही विस्कटली. पहिल्या लाटेपेक्षाही गंभीर अशी परिस्थिती दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झाली. आजही कोविडचं संकट पूर्णपणे टळलंय असं म्हणता येत नाही. दोन लाटांनंतर, तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात होती. वाढतं लसीकरण, बहुसंख्य लोकसंख्येला कोविड होऊन गेल्यानं तयार झालेली हर्ड इम्युनिटी आणि उपाययोजनांमुळे तिसरी लाट रोखण्यात यश मिळालं. राज्यात लसीकरण मोहिमेनंही चांगलाच वेग पकडला आहे. लोकल प्रवास, मॉल आणि महाविद्यालये अशा महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

विषय असा झालाय की, आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसंच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीनं मुख्यमंत्री याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतील. नवरात्र, दसरा नुकताच पार पडला आहे, दिवाळीही तोंडावर आहे. यामध्ये लोकांची गर्दी होईल. याचा कोविड रुग्णांच्या संख्येवर कसा प्रभाव पडेल हे लक्षात घेतलं जाईल. रुग्णांची संख्या कमी असल्यास सवलत दिली जाईल. आरोग्य सेतू ॲपमध्ये जर ‘सेफ’ असं स्टेटस असलं तर प्रवास, मॉल, चित्रपटगृह प्रवेश करण्यासाठी सवलत मिळेल.’

खरंच लसीचा एक डोस पुरेसा आहे का? याबाबत आम्ही डॉ. संग्राम पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी याच्या अगदी विरोधातलं मत व्यक्त केलं. त्यांच्यामते, ‘कोविडची लागण होऊन गेलेली असेल, तर एक डोस पुरेसा असेल. नाहीतर दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांना एक डोस पुरेसा असला, तरी प्रौढांना ही बाब लागू होत नाही. प्रौढांना तिसरा डोस लागेल का याचा विचार करायला हवा.’

राज्य सरकारनं उच्च महाविद्यालयं सुरू करताना फक्त दोन डोस घेतलेले विद्यार्थीच प्रवेश करू शकतील, असं अध्यादेशात नमूद केलं होतं. त्यावरून नागरिकांनी सोशल मीडियावर #VaccinationIsNotCompulsory अशी मोहीमही चालवली होती. दोन डोसमध्ये असलेल्या तीन महिन्यांच्या अंतरामुळे लसीकरणात अडथळा येत होता. त्यामुळेच सरकारनं हा विचार मांडल्याची चर्चा आहे.

आता अशी सवलत मिळाल्यावर किती भिडू दोन डोस पूर्ण करतील, याचा अंदाज भविष्य सांगणाऱ्या टॉपच्या कार्यकर्त्यांना व्यक्त करणंही अवघड आहे. सोबतच लसीकरण मोहिमेलाही ब्रेक लागण्याची पुरेपूर शक्यता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रानं ९० मिलियन पेक्षा अधिक लोकांना लसीचे डोस दिलेत.

भिडू लोक तुम्हाला म्हणून सांगतो, सवलत मिळुद्या किंवा नको, लसीचे दोन्ही डोस घ्याच. आपल्या सरकारनंच सांगितलंय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.