पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या गणेशचा गौरी पर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता

घाबरत घाबरत गणेश त्या हॉस्पिटलमध्ये गेला होता, कारण त्यानंतर त्याचं आयुष्य कलाटणी घेणार होतं. एकदा का ऑपरेशन झालं की, तिथून मागे फिरणं कधीच शक्य नव्हतं. तासाभराचं ऑपरेशन आटोपलं आणि काही वेळातच डॉक्टरने गणेशला घरी सुद्धा सोडलं.

२४ वर्ष पुरुष म्हणून जगण्याला कंटाळलेला गणेश सावंत, फक्त एका तासाच्या ऑपरेशननंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडला तो गौरी सावंत म्हणून.

एका तासात गौरीने आपल्यातल्या गणेशला तर मारलं होतं. पण गणेश म्हणून जगताना गेल्या २४ वर्षात ती खूप दिव्यातून गेली होती. काही माणसं जोडली गेली तर काहींनी तिला स्वतःपासून दूर लोटलं. यातूनच तिला नेहमीच नवीन काही करण्याचं बळ मिळत गेलं, गणेश सावंतची गौरी सावंत तर झालीच पण गौरी सावंतची श्रीगौरी सावंत सुद्धा झाली.

पुण्याच्या भवानी पेठेतल्या पोलीस कॉलनीत सुरेश सावंत यांचं कुटुंब राहायचं. तसं कुटुंब, नवरा-बायको आणि दोन मुलं एवढंच होतं. पण पुण्यात शिकायला, नोकरीधंद्यासाठी आलेले नातेवाईकसुद्धा सोबत राहायचे. सुरेश सावंत हे पोलीस अधिकारी, त्यांचा स्वभाव सुद्धा त्यांच्या खाकीला शोभेल असा होता, तर त्यांच्या बायकोचा स्वभाव मात्र सगळ्यांना सांभाळून घेणारा, अगदी शांत.

दोघांना एक मुलगी होती पण त्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांना मुलगा झाला, खुश झालेल्या सुरेश सावंत यांनी मुलाचं नाव ठेवलं, गणेशनंदन.

पुण्यातला ऑर्नेलास स्कूलमध्ये गणेशचं सुरवातीचं शिक्षण झालं. आपल्या वडीलांना गणेश दादा म्हणायचा. काही कारणांमुळे दादांची बदली पुण्यातून गडचिरोलीला झाली. साहजिकच शिस्तप्रिय वडिलांचा धाक थोडा कमी झाला. गणेशचं वय जसं वाढत होतं तशी शरीराची थोडीफार समज त्याला येऊ लागली. मुलींकडे बघून त्यांच्यासारखं नटण्या मुरडण्याची त्याला इच्छा व्हायची. मुलांसोबत क्रिकेट खेळण्यापेक्षा मुलींसोबत भातुकली खेळायला त्याला आवडायचं.

एकदा त्यानं ताईची लिपस्टिक चोरून आपल्या दप्तरात ठेवली आणि नेमकं त्याच दिवशी पिटीच्या सरांनी सगळ्या मुलांची दप्तरं तपासली. एकाच्या दप्तरात गुटख्याची पुडी सापडली आणि गणेशच्या दप्तरात लिपस्टिक. गणेशचं लिपस्टिक प्रकरण घरापर्यंत पोहोचलं आणि त्याला आधी शाळेत आणि मग घरीसुद्धा बेदम चोप मिळाला.

मुलाच्या दप्तरात गुटख्याची पुडी सापडणं हे समजण्यासारखं होतं, पण गणेशच्या दप्तरात लिपस्टिक मिळणं हे त्याच्या वडिलांना काहीसं कोड्यात आणि भीतीत टाकणारं होतं.

आता गणेशचं चालणं, वागणं आणि बोलणं थोडं बायकी होऊ लागलं होतं. आपल्यासोबत नक्की काय होतंय हे गणेशला सुद्धा कळत नव्हतं. बायकांच्या शरीराविषयी वाटणारं कुतूहल आता अजून वाढत होतं.

एकदा गणेश दादांसोबत खरेदीसाठी लक्ष्मी रोडला गेला होता. तिथे कपड्यांच्या दुकानाबाहेर साड्या नेसलेले बायकांचे पुतळे ठेवले होते. कोणाचं लक्ष नाहीये हे पाहून गणेशने पुतळ्याची साडी वर केली. आतून दुकानदार ओरडला आणि दादांनी तिथेच रस्त्यावर लहानग्या गणेशला मारायला सुरुवात केली. मुलाला इतकं का मारतायत असा प्रश्न तिथे जमलेल्या बघ्यांना पडला होता. पण दादा गणेशला एका वेगळ्याच भीती पोटी मारत होते. याच कुतुहलापोटी त्याला अनेकदा असा बेदम मार खावा लागला होता.

गणेशच्या बायकी वागण्या-बोलण्यामुळे शाळेत मुलं सुद्धा त्याला चिडवायची. त्यामुळे शाळेत कोणी चांगला मित्र नव्हता. वयात दहा वर्षाचं अंतर असल्यामुळे गणेश आणि त्याच्या ताईचं खास नातं तयार होऊ शकलं नाही. वडील सुद्धा कडक स्वभावाचे आणि गडचिरोलीहून पुण्यात घरी चार-पाच महिन्यांनी येऊन जाऊन असायचे. अशा परिस्थितीत त्याला त्याची शांत आणि जीव लावणारी आईच जवळची होती. पण शुल्लक आजारामुळे त्याची आईसुद्धा त्याला सोडून गेली.

वयाच्या १३ व्या वर्षी, घरात माणसांचा गोतावळा असूनही गणेश एकटा पडला होता.

घरातले नातेवाईक सुद्धा, ‘याचं लग्न होणार नाही, याला स्वयंपाक शिकवा.’ असं म्हणून टोमणे मारू लागले. मुलाच्या विचित्र वागण्यामुळे एकदा वडिलांनी त्याची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली, तेव्हा ज्योतिष्याने सांगितलं की, ‘तुमचा मुलगा घर सोडून जाईल, स्वतःचं नाव बदलेल आणि त्याच्यामुळे तुमची बदनामी सुद्धा होईल.’ त्यानंतर मात्र वडील गणेशशी अजूनच टाकून बोलू लागले. त्याच काळात ताईचं लग्न झालं आणि तीही सासरी निघून गेली.

दरम्यानच्या काळात वडिलांची बदली गडचिरोलीहून ठाणे ग्रामीणला झाली, तेव्हा गणेश, त्याचे वडील आणि आईची आई मुंबईला आले. मालाडला रहेजा कॉलनीत त्यांनी घर घेतलं होतं. आजी स्वयंपाक करायची. काम झालं की दिवसभर पोथी वाचायची.

वडील त्यांच्या कामात त्यामुळे त्यांचा आणि गणेशचा संवाद संपल्यात जमा होता.

गणेशचं जस जसं वय वाढत गेलं तस तसं त्याचं बायकी वागणं सुद्धा वाढत गेलं. गणेशच्या वागण्यात कुठेही बायकीपण दिसल्याचा भास जरी झाला तरी ते त्याला मारायचे. पट्ट्याने रोज मारणं, बायल्या म्हणून हिणवण आता रोजचं झालं होतं.

पण शेवटी तोही बाप होता. कसाही असला तरी गणेश त्यांचा मुलगा होता. मारलं की गणेश झोपल्यावर रात्री वडील त्याच्या जवळ यायचे. अंगावरून हात फिरवायचे. किती लागलंय ते बघायचे. दुसऱ्या दिवशी गणेशला आवडणारा खाऊ घरी आणलेला असायचा. आपल्या मुलानं मुलासारखं वागावं हीच त्यांची अपेक्षा होती.

गणेश नववी-दहावीला असताना त्याचा स्वतःविषयीचा गोंधळ बराच कमी झाला होता.

आपल्याला मुली नाही तर मुलं आवडतात, त्यांच्याविषयी आकर्षण वाटतं, हे त्याला कळून चुकलं होतं. सोसायटीतल्या मुलांना सुद्धा गणेशबद्दल माहित होतं, पण कोणीच त्याला कधी त्रास दिला नाही. अभ्यासात फारसा हुशार नव्हता पण ढ सुद्धा नव्हता. अशीच दहावी संपली. अकरावी बारावी इस्माईल युसुफ कॉलेजात करून गणेश पुढच्या शिक्षणासाठी रुपारेल कॉलेजमध्ये जाऊ लागला.

कॉलेजच्या वातावरणात त्याला अजूनच स्वातंत्र्य मिळालं.

त्यात एकदा सोसायटीच्या वॉचमननं त्याला आणि एका मुलाला बिल्डींगच्या गच्चीवर पकडलं. दुसऱ्या दिवशी त्याने हे सगळं गणेशच्या वडिलांना सांगितलं. तेव्हा त्यांनी गणेशला पट्टा तुटेस्तोवर, लाथा बुक्क्या घालत मारलं.

त्या दिवसापासून गणेशचं सोसायटीतल्या मुलांशी बोलणं कमी झालं. मग गणेशनं सोसायटीच्या शेजारच्या झोपडपट्टीतले मित्र गोळा केले. ही सगळी मुलं गरीब आणि अर्धवट शाळा सोडलेली होती, गणेश त्यांचा म्होरक्या बनला. माटुंग्याला महेश्वरी गार्डनमध्ये दर रविवारी शहरातले एलजीबीटी समुदायातले लोक जमायचे, तिथं तो त्या पोरांना घेऊन जायचा. वडील शेवटी पोलीसच, त्यांनी गणेशचं काय चालू आहे हे शोधून काढलं.

धक्का बसलेल्या त्याच्या वडिलांनी कुठे तरी जाहिरात बघून बोरिवलीतलं एक क्लिनिक शोधून काढलं. ते गणेशला तिथे घेऊन गेले.

तिथल्या डॉक्टरनं गणेश समोर काही बायकांचे फोटो असलेली मासिकं ठेवली आणि विचारलं, ‘ये देख के कुछ फीलिंग आती है?’ वडिलांना घाबरून गणेशने हो असं उत्तर दिलं. पण डॉक्टरने वडीलांकडे गणेशसाठी १२ हजाराची औषधं दिली. ही औषधं घेऊन गणेशचा चेहरा सुजायचा, कानातून रक्त यायचं, पोटात दुखायचं पण वडिलांनी ही औषधं चालूच ठेवली. जेव्हा गणेश अंथरुणाला खिळला तेव्हा कुठं त्यांनी ती औषधं बंद केली.

त्यानंतर पुन्हा गणेश रविवारी माटुंग्याच्या महेश्वरी गार्डनमध्ये जाऊ लागला. दादांचा मार खाऊन तो आता कोडगा झाला होता. वडीलांचे टोमणे आणि वडीलांचं सतत ‘घरातून चालता हो’ म्हणणं सुद्धा रोजचं झालं होतं. एकदा बायकांसारखा पायावर पाय ठेऊन बसला म्हणून त्यांनी गणेशला झापलं आणि गणेश रागाच्या भरात खिशात फक्त ७० रुपये घेऊन घराबाहेर पडला.

गणेशचे मुंबईतले एकट्याचे सुरुवातीचे दिवस खूप खडतर गेले. त्याकाळात साडी नेसून डोक्याला विग लाऊन त्याने सिग्नलवर भिक सुद्धा मागितली पण कालांतराने त्यानं सांताक्रूझच्या हमसफर ट्रस्टसाठी काम करायला सुरुवात केली. सेक्सवर्कर्सना कंडोम वाटण्याचं काम तो करायचा. यातून त्याने पैसे जमवले आणि त्याच्या ओळखी सुद्धा झाल्या होत्या. याच ओळखीतून त्याला जेंडर अफर्मेशन सर्जरीबद्दल कळलं.

आणि इथून सुरु झाला गौरीचा प्रवास.

तासाभराच्या ऑपरेशननंतर २४ वर्षं पुरुष म्हणून मिळालेली बाह्यओळख आता मिटून गेली होती. यातच हमसफर ट्रस्ट मध्ये वाद झाल्यामुळे गौरी यांनी हमसफर ट्रस्ट सोडून स्वतःची ‘सखी चारचौघी’ नावाची ट्रस्ट सुरू केली. हळूहळू बरेच तृतीयपंथी या ट्रस्टमध्ये सामील झाले. गौरी तृतीयपंथी लोकांसाठी काम तर करत होत्या पण हिजडा समाज त्यांना आपल्यातला समजत नव्हता. ते त्यांना ‘ऑफिसवाला हिजडा’ म्हणायचे. तेव्हा मात्र गौरी यांनी साग्रसंगीत समुदायाच्या प्रथेप्रमाणे गुरु केला. त्यांच्या गुरु एक अतिशय परंपरावादी तमिळ ब्राह्मण आहेत. त्या हिजडा समाजातल्या सगळ्या चालीरीती कट्टरतेने पाळतात. कालांतराने गौरी सुद्धा गुरु झाल्या आणि श्रीगौरी सावंत बनल्या.

तसंच हिजड्यांनी फक्त भिक मागून किंवा देहव्यापार करून आपला उदरनिर्वाह करू नये. यासाठी सुद्धा त्या कायम झटत राहिल्या.

त्यांच्यासाठी त्यांनी साई सावली नावाची ट्रस्ट उभी केली. या ट्रस्टमधून त्यांनी हिजड्यांना पैसे कमावण्याचा नवा मार्ग दिला. पण झटपट पैसे कमावण्याच्या नादात बरेच हिजडे इथे वळत नाहीयेत ही श्रीगौरी यांची शोकांतिका आहे.

गौरी यांच्या कामाठीपुरामधल्या वेश्या मैत्रिणी सुद्धा होत्या. त्यातली एक मैत्रीण एचआयव्ही होऊन गेली तेव्हा गौरी यांना कळलं की तिथली लोकं त्या बाईच्या चार वर्षांच्या मुलीला विकणार आहेत. तेव्हा गौरी यांनी सगळ्यांशी लढत त्या मुलीला दत्तक घेतलं आणि त्या तिची आई झाल्या. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या

‘आई व्हायला स्त्री असावं लागत नाही. ती एक भावना आहे आणि ती कुणातही असू शकते. मातृत्वावर सगळ्यांचा हक्क आहे.’

ही मुलाखत ऐकून त्यांना ‘टच ऑफ केयर’ ची जाहिरात त्यांना मिळाली. ही जाहिरात एवढी गाजली की त्या या जाहिरातीमुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या समुदायाबाहेर, जगभरात पोहोचल्या.

त्यानंतर मात्र प्रसिद्धी त्यांच्या मागोमाग येऊ लागली.

यानंतरचीच एक गोष्ट. गौरी कामाठीपुरामध्ये आपल्या एका मैत्रिणीकडे गेल्या होत्या. तिथे त्यांनी पाहिलं की, एक २२-२३ वर्षांची मुलगी आपल्या दोनेक वर्षांच्या मुलीला घेऊन देहव्यापार करत होती. ती कोवळ्या वयातली आई त्यांना बोलली, ‘नानी, आप लेकर जाओ इसे अपने साथ. मेरे पास रहेगी तो मेरे जेसी बनेगी’ ते दृश्य गौरी यांना हेलावून टाकणारं होतं.

वृद्ध झालेल्या हिजड्यांसाठी घर बनवण्यासाठी गौरी यांनी कर्जतमध्ये एक जागा घेतली होती. आता याच जागेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी घर बनवायचं श्रीगौरी यांनी ठरवलं.

इथे वृद्ध हिजडे या मुलांचा सांभाळ करतील आणि जवळच्या शाळेत ही मुलं शिकतील. त्यांच्या या स्वप्नाला त्यांनी नाव दिलं ‘आजीचं घर.’

हे घर बनवण्यासाठी गौरी त्यांच्या साई सावली या ट्रस्टमधून निधी गोळा करत आहेत आणि या घराचं म्हणजे आश्रमाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गौरी यांनी स्वतःला पूर्णपणे ‘आजीचं घर’ या प्रोजेक्ट साठी वाहून घेतलं आहे. आपल्या कामामुळं गौरी यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारत पुरस्कारासोबत अनेक पुरस्कार जिंकले, मानपत्र मिळवली. आता त्यांच्यावर सिरीजही आली, पण तीन गोष्टींसाठी गौरी यांनी केलेला संघर्ष कुणाच्याही लक्षात राहील असाच आहे, या तीन गोष्टी म्हणजे, ओळख, आदर आणि स्वातंत्र्य.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.