मुंबईतून कामगारांना घरी पाठवणाऱ्या सोनूचं चीनमध्ये सुद्धा भरपूर वजन आहे.

नुकतेच स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान अभिनेता सोनू सुदला समर्पित केले. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर त्याचा फोटो लावण्यात आला आणि  “देवदूत सोनू सूदला वंदन” अशा आशयाची ओळ त्यांनी लिहिली.

हा मान मिळणारा सोनू सूद हा पहिला भारतीय कलाकार असावा.

बॉलिवूडचा व्हिलन सोनू सूद कोरोना मध्ये हिरो म्हणून फेमस झाला. मुंबईत व इतरत्र अडकलेल्या कामगारांना त्याने फक्त ट्विटर वापरून परत गावी पाठवलं. त्याचं प्रचंड कौतुक झालं. थोडीशी टीका सुद्धा झाली.

सगळ्यात जास्त जोक झाले. अनेकांनी ट्विटरवर हे जोक शेअर केले. सोनूने सुद्धा खिलाडूवृत्ती दाखवत स्वतःवरच्या जोकला सुद्धा शेअर केलं.

मागे जेव्हा भारत आणि चीनमध्ये बॉर्डरवर तणाव सुरू झाला तेव्हा एका ट्विटरवरील व्यक्तीने सोनूला चिनी सैनिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची विनंती केली. सोनूने सुद्धा मला त्यांची माहिती पाठवा असे सांगत हसून दाद दिली.

पण या सगळ्यात तुम्हाला आतली गोष्ट सांगायची म्हणजे सोनू सूद चीनमध्ये सुद्धा फेमस आहे आणि काय माहिती खरंच चिनी सैनिकांना परत सुद्धा पाठवेल.

आता सोनू तिथं कसं काय फेमस या प्रश्नाचं उत्तर सांगतो.

पंजाबी सोनू बॉलिवूडमध्ये करियर बनवायचं म्हणून मुंबईला आला. इथे मॉडेलिंग केली पण जास्त डाळ गळली नाही मग साऊथ मध्ये चान्स मिळाला आणि तिकडे गेला.

दक्षिणेत छोटे मोठे रोल करता करता व्हिलन म्हणून नाव केलं. हिंदीत सुद्धा युवा आशिक बनाया अपने मुळे पाय रोवता आले. इथं पण व्हिलन टाइपच रोल मिळत होते पण सोनू त्यातही खुश होता.हळूहळू स्वतःच नाव केलं.

सलमान खानच्या दबंग मधल्या छेदी सिंगमुळे तर त्याने रेकॉर्डब्रेक पॉप्युलरीटी कमवली.

अमरीश पुरी, गुलशन ग्रोव्हर, शक्ती कपूर यांच्या नंतर खुर्ची सांभाळणारा व्हिलन मिळाला अशी चर्चा झाली. सोनूने एका पाठोपाठ एक सुपरहिट पिक्चर मध्ये काम करून ही चर्चा सार्थ ठरवली.

अशातच एक दिवस त्याला एका इंटरनॅशनल सिनेमाची ऑफर झाली,

तो चीनी सिनेमा होता. नाव होतं झांगजांग (Film Xuanzan)

झालं काय की भारताचा थ्री इडियट्स चीनमध्ये प्रचंड फेमस झाला आणि भारतीयांसाठी चिनी मार्केट ओपन झालं. थ्री इडियट्सने भारतात जेवढे कमवले त्याच्याही कित्येक पट अधिक हजार कोटी चीन मध्ये कमवले.

या पाठोपाठ अनेक भारतीय सिनेमांनी चीन मध्ये एन्ट्री केली. भारतातले सिनेमे चीनमध्ये येऊन फेमस होत आहेत तर तिथल्या करणं जोहर टाइप चापटर लोकांनी भारतात येऊन चिनी सिनेमा बनवायचं ठरवलं.

यात सोनूने सम्राट हर्षवर्धनची भूमिका केली होती.

महाराष्ट्रात औरंगाबादला या सिनेमाचं शूटिंग झालं. चीनमधल्या शेड्युल साठी सोनू वर्षभर तिकडे होता. या सिनेमासाठी सोनूने प्रचंड तयारी केली होती.

अतिशय मोठया स्केलवर बनलेला हा सिनेमा चीनमध्ये प्रचंड हिट झाला. एवढंच नाही तर चिनी समीक्षकांनी देखील त्याच कौतुक केलं. अनेक पुरस्कार मिळाले.

चीन तर्फे हा सिनेमा ऑस्करसाठी सुद्धा पाठवला गेला.

या पिक्चरने ऑस्कर जिंकला असता तर खरंच सोनूला चीनमध्ये सगळे डोक्यावर घेऊन नाचले असते.  तसं घडलं नाही मात्र याच पिक्चरच्या शूटिंगवेळी सोनू सूदच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली.

जगातला सर्वात मोठा सुपरस्टार जॅकी चेन याच्या कुंगफु योगा या सिनेमाची त्याला ऑफर आली.

खरं तर हा रोल म्हणे आमिर खान ला ऑफर झाला होता पण तो दंगलच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे त्याने नकार दिला. यामुळे सोनू सूदला वन्स इन लाईफ टाईम जॅकी चेन बरोबर काम करायची संधी मिळाली.

कुंग फु योगा मध्ये दिशा पाटणीसुद्धा होती.

सोनूची आणि दिशाची जॅकी चेनबरोबर चांगली गट्टी जमली. भारतात देखील प्रमोशन करायला ते एकत्र फिरले.

कुंगफु योगा चीनमध्ये ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला. आजवरचे सगळे रेकॉर्ड या सिनेमाने मोडून टाकले.

आजही चीनच्या सर्वात जास्त पैसे कमवणाऱ्या दहा सिनेमापैकी एक आहे.

जॅकी चेन असूनही कुंग फु योगा भारतात विशेष गाजला नाही पण याच सिनेमाच्या यशामुळे सोनू सूद संपूर्ण चीनच्या घरा घरामध्ये व्हिलन म्हणून फेमस झाला.

भारता तर्फे आमिर खान, राज कपूर, मिथुन चक्रवर्ती नंतर हा चमत्कार सोनू सूदलाच जमलाय.

आजही सोनूला चिनी सिनेमा मधून कामाची ऑफर येत असते पण अजून तरी त्याने तिथे कोणता नवा सिनेमा साइन केलेला नाही.

गेल्या काही दिवसात सोनू सूद ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये कामगारांना बाहेर काढण्याचा चमत्कार करून दाखवला तेव्हा त्याची राजकारणात वर पर्यंत पोहच आहे असं म्हटलं गेलं. आता या घटनेमुळे गंमती गंमतीत सोनूचा इंटरनॅशनल वजन सुद्धा असेल का याची ही चर्चा सुरू झाली आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.