केंद्रातल्या विरोधी पक्षाची स्पेस ठाकरे – केसीआर घेऊ पाहतायत का ?

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. फक्त उद्धव ठाकरेंचीच नाही तर राव यांनी शरद पवार यांची सुद्धा सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

आता ही भेट का झाली ? तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात भाजपला सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न बऱ्याच नेतेमंडळींकडून सुरू आहेत. यातच के. चंद्रशेखर राव यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जेव्हा केसीआर उद्धव ठाकरेंना भेटले तेव्हा त्यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली आणि त्यानंतर या दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत केसीआर म्हंटले,

महाराष्ट्र-तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन नेते भेटतात त्यावेळी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते. देशात परिवर्तनाची गरज आहे. देशाचं वातावरण खराब करायला नको. भारताला मजबूत करावं अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करू.

तर शरद पवार यांच्या सोबत बैठक झाल्यावर पत्रकार परिषदेत केसीआर म्हणतात,

शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते आहेत. देश योग्य पद्धतीने चालवला जात नाहीये. विकास होत नाहीये. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर काही बदल आवश्यक आहेत. शरद पवार अनुभवी नेते आहेत. देशातले सगळ्यात लहान वयाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी मला आशिर्वाद दिला आहे. एकत्र काम करायला हवं यावर आमचं सहमत झालं आहे. देशातील अन्य पक्षांशी आम्ही चर्चा करू. एकत्र बसून निर्णय घेऊ. कदाचित बारामतीला बैठक होईल. आमच्याबरोबर येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांना एकत्र घेऊ. देशातल्या जनतेसमोर अजेंडा ठेऊ.

विशेष म्हणजे या पत्रकार परिषदा केसीआर यांनी हिंदी मध्ये घेतल्या. म्हणजे केसीआर स्वतःला विरोधकांच्या मोटेचे नेते म्हणून प्रोजेक्ट करतायत असं अर्थ निघू शकतो. विरोधकांची मोट बांधण्याचा असाच काहीसा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी मागे केला होता. पण त्यांच्या हाकेला ओ मिळालीच नाही.

आता हा प्रयत्न जर केसीआर करतायत तर काही प्रश्न उपस्थित होतात. जसं की,

१. कालच्या भेटी गाठींवरून के. चंद्रशेखर रावांच्या बाजून किमान दोन प्रादेशिक पक्ष उभे राहिलेले दिसत आहे – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पण २०२० पासूनच शिवसेना केंद्रतल्या विरोधी पक्षांच्या नेतृत्वासाठी शरद पवारांचं नाव पुढे करत आली आहे मग सेना केसीआर यांच्या मागे उभी राहू शकते का ?

२. प्रादेशिक पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचा नेता कोण होईल, यावरून एकमत घडवून आणणं नेहमीच जिकिरीचं ठरतं. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न पवार आणि ममतांनी करून पाहिलेत. केसीआर यांना अशी मोट बांधणं जमणार का ?

३. काँग्रेस हा भाजपनंतर दुसरा सगळ्यांत मोठा पक्ष. विरोधकांच्या आघाडीत काँग्रेसला सोबत घेतल्याखेरीज या आघाडीचं बळ वाढत नाही असं शरद पवारांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे. पण काँग्रेसला सोबत घेतलं तर गांधींचं नेतृत्व मानायची केसीआर किंवा ममता बॅनर्जींची तयारी नाही. मग अशा परिस्थितीत काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष केसीर किंवा ममतांसारख्या प्रादेशिक नेत्याच्या हाताखाली काम करेल का?

या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी बोल भिडूने जेष्ठ राजकीय तज्ञ विजय चोरमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हंटले कि, 

पहिली गोष्ट ती म्हणजे केसीआर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. कालच्या भेटीचा तेवढाच अर्थ आहे. हि प्राथमिक भेट आहे आणि भारतीय जनता पक्षच्या विरोधात आपण काहीतरी करूया एवढ्याच सहमतीचा हा विषय आहे. 

 संजय राऊतांच स्टेटमेंट आलं आहे, कि केसीआर यांच्यात सर्वाना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता आहे. यावर चोरमारे म्हणतात, 

संजय राऊत यांचं हे स्टेटमेंट तात्कालिक आहे. त्याला इतकं महत्व देण्याची काही गरज वाटत नाही. 

सध्या काँग्रेस हा भाजपनंतर दुसरा सगळ्यांत मोठा पक्ष. विरोधकांच्या आघाडीत काँग्रेसला सोबत घेतल्याखेरीज या आघाडीचं बळ वाढत नाही असं शरद पवारांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे. पण काँग्रेसला सोबत घेतलं तर गांधींचं नेतृत्व मानायची केसीआर किंवा ममता बॅनर्जींची तयारी नाही.

त्यामुळे काँग्रेसला सोबत न घेणं म्हणजे दुसऱ्या अर्थाने भाजपला मदत करण्यासारखं आहे. त्यामुळे या घडीला केसीआर यांचे प्रयत्न संशयास्पद वाटतात. 

केसीआर यांची मागची पार्श्वभूमी पाहता केसीआर आणि त्यांचा पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती किंवा टीआरएस यांनी संसदेतील महत्त्वाच्या बाबींवर भाजपची बाजू घेत आले आहे. थोडक्यात त्यांच्यावर अनेकदा असा आरोप होत आलाय कि, भाजपची सत्ता आली कि तुम्ही भाजपची बाजू घेताय. ज्यांची सत्ता त्यांच्या बाजूने चालायची अशी नीती कायमच केसीआर पाळत आलेत असं म्हणलं जातं.

पण अलीकडच्या काळात के. चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. 

गेल्या दोन वर्षांत तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये दोन मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला. हैदराबाद महानगरपाालिका निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले. त्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, आगामी २०२३ च्या विधानसभा किंवा २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळू शकते हे मोदी व शहा यांच्या लक्षात आले. भाजपने मग तेलंगणा राष्ट्र समितीवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली. राज्यसभेत या पक्षाची तेवढी गरजही भाजपला आता भासत नाही. 

 त्यामुळे आता के. चंद्रशेखर राव हे देखील ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.