अन् तालुक्याच्या विकासासाठी बांधलेल्या धरणामुळे सुंदरराव राजकारणातून कायमचे बाहेर गेले
आपल्या तालुक्यात विकासकाम झाली नाहीत म्हणून अनेकदा नेते आपल्या आमदारांना जाब विचारताना दिसतात. निवडणुकीवेळी मत मागायला आल्यावर अशा आमदारांना मतदार पराभूत देखील करतात. मात्र तालुक्यात विकासकाम झाली म्हणून पराभूत होणारे सुंदरराव सोळंके हे कदाचित एकमेवच नेते असावेत.
गोष्ट आहे ६० च्या दशकातील.
सधन शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सुंदरराव सोळंके यांनी हैद्राबाद संस्थानच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आणि राजकीय आखाड्यात प्रवेश केला होता. त्यांची राजकीय कारकिर्द त्यावेळच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या म्हणजेच आजच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु झाली होती. त्यांनी लोकल बोर्डाचे अध्यक्षपदही सांभाळले.
त्यानंतर त्यावेळी खुल्या असलेल्या केज मतदार संघातून त्यांनी १९६७ साली पहिली विधानसभेची निवडणुक लढवली आणि जिंकली देखील. पहिल्याच फटक्यात आमदार झाल्यानंतर त्यांचा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात पहिल्यांदाचं मंत्री म्हणून समावेश झाला. त्यांच्याकडे जलसंधारण, पाटबंधारे, महसूल अशी महत्वाची खाती होती.
त्यानंतर केज मतदारसंघ राखीव झाल्यानंतर १९७२ साली त्यांनी गेवराई मतदार संघातून निवडणुक लढवली. विशेष म्हणजे ते बिनविरोध गेवराईचे आमदार झाले. त्यांचं हे रेकॉर्ड जिल्ह्यात अजूनही कोणी मोडू शकलेलं नाही.
त्यानंतर माजलगाव मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर तिसऱ्या वेळी ते माजलगावमधूनही विजयी झाले. पुढे १९७४ मध्ये दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमडळात सार्वजनिक बांधकाम व दुग्ध विकास खात्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
आपल्या याच सगळ्या मंत्रिमंडळाच्या काळात माजलगाव मधील सिंदफणा नदीवर सुंदरराव यांनी धरण मंजूर करून आणलं.
या धरणामुळे जवळपास २२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांनी या सगळ्या गावांचा प्रश्न मार्गी लावला आणि धरणाच्या कामाला कमालीचा वेग आणला. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पुढे १९७८ मध्ये धरणाच्या कामास सुरुवात झाली. मात्र याच धरणाच्या जागेवरून बरेच गट नाराज झाले होते.
याच धरणाचं काम सुरु असताना दुसऱ्या बाजूला बऱ्याच राजकीय घडामोडी घडत होत्या.
वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या मंत्रिमंडळात सोळंके यांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश झाला. पुढे इंदिरा गांधी या पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्यानंतर पवार यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर १९८० मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली.
या दरम्यान सुंदरराव सोळंके इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस (आय) मध्ये ते परतले होते. त्यावेळी सोळंके यांच्या विरोधात मजलगावमधून शरद पवारांच्या एस. कॉंग्रेसकडून गोविंदराव डक हे ताकदीचे उमेदवार उभे होते.
त्यावेळी सोळंके यांची राज्यात भावी मुख्यमंत्री अशी प्रतिमा तयार होत होती.
मात्र अशातच विरोधी पक्षांनी या धरणाच्या जागेवरून काही समाज गट नाराज झाले होते त्यांचा मुद्दा प्रचारात सुंदरराव सोळंके यांच्या विरोधात वापरला. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.
निकाल लागल्यानंतर डकांनी सोळंकेंचा २६०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सोळंके यांनी पुन्हा कधीच निवडणूक लढवली नाही. पुढे ते सहकाराकडे वळले.
मात्र धरणाचं काम थांबलं नाही. १९८४ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. आज या प्रकल्पाची पूर्ण पाणी साठवण क्षमता पाहिली तर ४३१.८० मीटर एवढी असून एकूण लांबी सहा हजार ३०० मीटर आहे. धरणमाथा ४५३.६० मीटर आहे. नदीपात्र धरणाची उंची ३१ मीटर आहे.
या प्रकल्पामुळे आज माजलगाव, परभणी व नांदेड जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे.
त्यामुळेच या प्रकल्प उभारणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण पुढील अनेक पिढ्यांना राहावे, यासाठी या धरणाचे नामकरण ‘लोकनेते कै.सुंदररावजी सोळंके जलाशय’ असे करण्यात यावे अशी मागणी मागच्या काही काळापासून होत आहे.
सोळंके यांच्याच काळात धरणासोबतच तेलगावमध्ये माजलगाव सहकारी साखर कारखाना व उपळी येथील कुंडलिका प्रकल्प अशी मोठी विकासाची कामे उभी राहिली. जिल्ह्यात सर्वत्र मंडळाच्या शाळा-महाविद्यालये त्यांनी सुरू केली. मंत्री व मंडळाचे अध्यक्ष असताना एकही पैसा न घेता त्यांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे मोफत नोकरी देणारे साहेब म्हणून आज ही त्यांना ओळखलं जात होतं.
हे हि वाच भिडू.
- भारती पवारांच्या सासऱ्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत भाजपचं मंत्रिपद पटकावलं होतं..
- फिटलं म्हणा.. ! या घोषणेने क्रांतिसिंहांनी बीडच्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळवून दिली
- अन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला!