देशात सगळ्यात मोठा बॉम्ब तयार होतोय, जो पाकिस्तानच्या कुठल्यापण विमानतळाला उडवून टाकेल

आपला सख्खा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानच्या डोक्यात नेहमीच नवनवीन कुरापती शिजत असतात. म्हणजे भारताला कसं तोंडावर आपटता येईल, त्याचा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर कसा  अपमान होईल,  त्यांच्यावर कश्याप्रकारे हल्ले करता येईल अश्या सगळ्याच गोष्टी. पण दुसऱ्यांसाठी  खोदलेला खड्डा हा नेहमी आपण आपल्यासाठी खोदत असतोय, हे पाकच्या डोसक्यात काय बसत नाही. आणि त्यामुळं हजारदा प्रयत्न करून सुद्धा पाक स्वतःची लाज काढून घेतो.

असो.. आता तो काय सुधारणार नाही. आणि यापुढेही  तो असले उपद्याव करतच  राहील. पण त्यासाठी  भारत आपला मात्र  नेहमीच  सज्ज असतो. मग तो मुद्देसूद बोलण्यासाठी असो किंवा मैदानात आपली ताकद दाखवण्यासाठी. पाकनं आपल्याकडे बोट दाखवण्याआधी त्याचं बोट मोडून त्याच्याचं हातात देण्याची तयारी  भारत नेहमीच करतोय.

म्हणजे मैदानावरच्या ताकदीविषयी बोलायचं झालं तर भारत अत्याधुनिक शस्त्र आपल्या ताफ्यात जमा करतोय. इतर देशांची लढाऊ विमान, पाणबुडी, मिसाईल आपल्याकडे आणण्यासोबतच आत्मनिर्भर बनून स्वतः त्यांचं उत्पादन सुद्धा करतोय.

आता सुद्धा देशाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी 500 kg GP बॉम्ब मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये बनवण्याची तयारी सुरु आहे. महत्वाचं म्हणजे खमारिया इथल्या आयुध निर्माणीमध्ये बनवण्यात येणारा 500 kg GP बॉम्ब हा देशातील सर्वात मोठा बॉम्ब असल्याचं समजतंय. ज्याच्यात पाकिस्तानातील कोणतेही विमानतळ एकाच हल्ल्यात उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. एवढेच नाही तर चीनची बुलेट ट्रेन सुद्धा त्यांच्या टार्गेटवर येणार असल्याचं बोललं जातंय.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) गेली अनेक वर्षे या बॉम्बवर रिसर्च केले. गेल्या वर्षी चाचणीच्या निकालानंतर त्याच्या प्रोडक्शनवर हिरवा कंदील दाखवण्यात आला. याच्या फिलिंगचे काम फक्त आयुध निर्माणी खमरियामध्ये केले जाईल. नुकताच या कामाची पाहणी करण्यासाठी डीआरडीओची टीम खमारिया येथे पोहोचली आहे. सोमवारी कारखान्याच्या एफ-6 विभागात दोन बॉम्ब भरण्याचे काम सुरू झाले आहे.

डीआरडीओने अनेक भागांमध्ये हा बॉम्ब विकसित केला आहे. एका बॉम्बमध्ये 15 मि.मी. 10,300 शेल स्टीलचे असतील. स्फोटानंतर, प्रत्येक शेल 50 मीटरपर्यंत लक्ष्य करेल. महत्वाची गोष्ट म्हणजे एक शेल  12 मिमीच्या स्टीलच्या प्लेटला सुद्धा भेदण्यास सक्षम असेल. या 500 किलो वजनाच्या बॉम्बची लांबी 1.9 मीटर आहे. हे बॉम्ब जग्वार आणि सुखोई-30 वर अपलोड करण्यासाठी तयार करण्यात आले असल्याचं समजतंय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या बॉंम्बचा एकदाच वापर केला कि, अख्खच्या अख्ख विमानतळ उडवले जाऊ शकते, एवढंच नाही तर रेल्वे रुळ, मोठे पूलही यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतात. बॉम्ब तयार करताना वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे बँकर्स एका मिनिटात जमीनदोस्त होऊ शकतात. 

या हाय एक्सप्लोझीव्ह बॉम्बसाठी पुण्याहून हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे इथलं पथक सुद्धा ऑर्डनन्स फॅक्टरी खमरिया इथं पोहोचलंय. 

तज्ज्ञांच्या म्हणतायेत कि, या बॉम्बच्या पुढे पाकिस्तान काय चीनचे बॉम्ब आणि हत्यारं सुद्धा फिकी आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर जास्तीत जास्त भर देण्यात असल्याचं म्हंटल जातंय, जेणेकरून पाकनं किंवा चीनला धडा शिकवता येईल.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.