ज्या राजदंडामुळे सभागृह बंद पडतात त्याचा इतिहास असा आहे…

आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठा गोंधळ झाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा दावा केला जात आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केलेल्या निवेदनानुसार या सदस्यांनी गोंधळादरम्यान अध्यक्षांच्या समोरचा राजदंड देखील पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदस्यांचं हे वागणं म्हणजे गैरवर्तन ठरतं असं देखील ते म्हणाले.

काही वर्षांपूर्वी बबनराव ढाकणे यांनी विधानसभेतील राजदंड पळवून नेला होता, त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. २०१३ मध्ये नाना पटोले यांनी देखील एकदा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या गोष्टीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा निषेध म्हणून राजदंडाला हात लावला जातो, असं मानलं जात.

असं हे सभागृह बंद पडण्याची ताकद असलेला राजदंड भारतीय सभागृहांचा अविभाज्य भाग आहे. संसदीय परंपरेमध्ये या राजदंडच महत्व आजही अबाधित आहे.

पण हा राजदंड म्हणजे नेमके काय असते? त्याची प्रथा कधी आणि कुठे सुरु झाली? 

भारतात संसद आणि विधीमंडळातील सभागृहात सभेच्या वेळी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर हा राजदंड ठेवण्यात येतो. ही पद्धत ब्रिटीश संसदेकडून प्रेरणा घेऊन सुरु झालेली आहे.

ब्रिटनमध्ये राजदंड हा राजाचे, तर भारतात पीठासीन अधिकाऱ्याचे अधिकार दर्शवितो.

ब्रिटीश संसदेत राजदंड ठेवण्याची विशेष जागा आहे. सभापती सभागृहात आले की जागेवरून राजदंड उचलून तो सभापती बसतात त्यांच्या शेजारी ठेवला जातो.

असा आहे राजदंडचा इतिहास

इंग्लंड आणि फ्रान्समध्ये राजदंडाचा उगम ११८० या एकाच समांतर कालखंडात झाल्याचे मानले जाते. त्यावेळी इंग्लंडमध्ये रिचर्ड पहिला आणि फ्रान्समध्ये फिलिप दुसरा असे राजे सत्तेवर होते. चिलखत रोजच्या वापरातून बाजूला पडत असल्यामुळे- राजपदावरील व्यक्तीच्या संरक्षणासाठी सार्जंट त्याकाळी एक मोठे मौल्यवान धातूंपासून बनलेला राजदंड वापरत असल्याचे पाश्चात्य इतिहासकार सांगतात.

पुढे १३ व्या शतकात  या राजदंडाला राजाच्या ओळखीसोबत जोडले जाऊ लागले. त्यामुळे तो संपूर्ण मौल्यवान हिऱ्यानी सजलेला असायचा. राजदंडाच्या या विशेष महत्वामुळे तो पकडणाऱ्या व्यक्तीला देखील काही विशेषाधिकार मिळाले. पुढे १३८७ च्या दरम्यान चांदीचा आणि राजदंड वापरत आला. तसेच त्याचा आकार देखील काहीसा लहान झाला.  

१६ व्या शतकात हा राजदंड ब्रिटन आणि फ्रान्स या देशां व्यतिरिक्त जगातील इतर देशांमधील राजे देखील वापरू लागले. 

ब्रिटनमध्ये १४१५ सालचा सर्वात जुना राजदंड हॅडॉन या शहरातील संग्रहालयात आज देखील जतन करून ठेवला आहे.

पुढे १८ व्या शतकाच्या मध्यापासून ब्रिटनमध्ये संसदीय राजेशाहीची सुरुवात झाली. संसदीय राजेशाही म्हणजे देशात संसदेसोबतच एक राजसिंहासन देखील अस्तित्वात असणे. हे राजसिंहासन वर्षानुवर्षे चालत आलेल्या कोण्या एकाच वंशासाठी राखीव होतं.

याच राजसिंहासनावर असणाऱ्या राजाच्या किंवा राणीच्या नावाने राज्याच्या कारभार चालू लागला.

सध्या राणी एलिझाबेथ दुसरी या १९५२ पासून राजसिंहासनावर आहेत. त्याच देशाच्या औपचारिक राष्ट्राध्यक्ष देखील आहेत. तर देशातील नागरिक त्यांच्यासाठी प्रजा.

या राजसिहांसनावरील व्यक्तीच संसदेत बहुमत मिळवलेल्या पंतप्रधानांना नियुक्त किंवा पदमुक्त करतो. त्यांना सरकारच्या सर्व व्यवहार आणि त्यांच्या फाइली बघण्याचा अधिकार असतो. सेनेचा सर्वोच्च कमांडर देखील हीच व्यक्ती असते.

पण प्रत्यक्ष व्यवहारातील त्यांची सर्व भूमिका हि केवळ प्रतिकात्मक असते. रोजच्या व्यवहारांमध्ये ही व्यक्ती लक्ष देत नाही. रोजचे व्यवहार आणि राजसिंहासनाच्या नावे पंतप्रधान सरकार चालवत असतात. आपल्या मंत्रिमंडळाची निवड आणि खाती वाटप करत असतात.

त्यामुळे संसदेच्या बैठकीत प्रत्येक दिवशी नियमानुसार, राजा किंवा राणीच्या शाही राजदंडाला संसदेच्या मध्ये एका आसनावर ठेवलं जात, आणि कामाला सुरुवात केली जाते. हा राजदंड म्हणजे राजा किंवा राणी तिथं उपस्थित असल्याच्या सामान मानले जाते.

संसदेची बैठक देखील तिथपर्यंतच चालू शकते जोपर्यंत राजदंड आपल्या जागेवर सुरक्षित आहे. राजदंड जर आपल्या जागेवर नसेल तर संसदेची बैठक देखील पुढे चालूच शकत नाही. त्यामुळे अनेक वेळा असे देखील होते की, बराच वेळ चालेल्या बैठकीला वैतागून कोणी सदस्य राजदंडच उचलून नेतो, आणि लवकर बैठक संपवण्यासाठी तो लपवून ठेवण्याचं देखील धाडस केलं जात

ब्रिटिश संसदेत राजदंडाचे महत्व अबाधित आहे… 

विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंतराव टिळक यांनी आमदारांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणावेळी ब्रिटीश संसदेत राजदंडाबाबत घडलेला एक किस्सा सांगितला होता. त्यावरून या राजदंडाचे ब्रिटनमध्ये किती महत्त्व आहे, हे समजून येते.

१९३० मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील सत्याग्रहींवर ब्रिटीश सरकारने केलेला अन्याय आणि अत्याचाराबाबत पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी हाऊस ऑफ कॅामन्सचे सदस्य लॅार्ड ब्रॅाकवे यांनी यांनी केली. मात्र पंतप्रधान जागेवरच बसून राहिले.

सभागृह संपण्यापूर्वी मला माहिती मिळावी, अशी मागणी ब्रॅाकवे यांनी केली, मात्र सभापतींनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. तुम्ही खाली बसा अन्यथा तुम्हाला सभागृहाबाहेर जावे लागेल, असा इशारा दिला.

एखाद्या सदस्याचे नाव सभापतींनी घेतले तर त्यास सभागृहाबाहेर जावे लागते अशी इंग्लंडमध्ये तरतूद आहे.

मात्र ब्रॅाकवे त्यानंतर देखील खाली बसले नाहीत, त्यामुळे सभापतींनी त्यांचे नाव उच्चारले आणि पंतप्रधानांनी लगेच जागेवरून उठून ब्रॅाकवे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. ठरावावर मतदान झाले. सहाजिकच ते ब्रॅाकवेच्या विरोधात झाले होते.

मतदानानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र सभागृहातील एका सदस्याला, ब्रॅाकवेचे सदस्यत्व रद्द होऊ नये असे वाटत होते.

त्यामुळे निकाल जाहीर होण्यापूर्वी त्या सदस्याने राजदंड पळवून नेला आणि कामकाज थांबले, निकाल जाहीर करता आला नाही. परिणामी ब्रॅाकवेचे सदस्यत्व कायम राहिले.

ब्रिटिश कालीन भारतात संसदीय सभागृह आणि त्यांच्या निवडणूकांची सुरुवात झाल्यावर हा राजदंड भारतात देखील वापरला जाऊ लागला, तो आजतागायत वापरला जात आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.