देशाचे गृहमंत्री महानगरपालिका निवडणुकीत लक्ष देतात हे सांगतं भाजपचा ‘मुंबई प्लॅन’ कसा असेल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. शहा यांचा हा दौरा ‘मिशन मुंबई’ म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  रंगत आहेत.

अमित शहांनी लालबागचा राजचं दर्शन घेऊन पक्षाच्या  मुंबई महानगरपालिका प्रचाराचं रणशिंगच फुकल्याचं सांगितलं जातंय.अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली त्यामध्ये भाजपच्या एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे असे आवाहन केले आहे.

त्यामुळे भाजपची मुंबई महानगरपालिका जिंकण्याची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असेल याची जोरदार चर्चा. त्याचाच एक आढावा घेऊया.

नॅशनल लेव्हलचं इलेक्शन असल्यासारखी फाइट

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये झालेला सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे भाजप प्रत्येक निवडणूक ही कुठल्याही परिस्तिथीत जिंकण्याच्याच उद्देशाने लढवते आणि त्यासाठी पक्षाची अगदी केंद्रीय पातळीवरील यंत्रणा कामाला लागते.याला मुंबई महानगरपालिकाही अपवाद नसणार आहे.

 त्यात देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेवर भाजपाला अजूनही आपला महापौर बसवता आलेला नाहीये. 

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी महानगरपालिका असली तरी मुंबईचं बजेट, कामकाज हे देशातल्या अनेक राज्यांपेक्षाही मोठं आहे.  उदाहरणच द्यायचं झाल्यास ४५ हजार कोटींचा मुंबईचा अर्थसंकल्प अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, गोवा या राज्यांपेक्षा दुपटीने जास्त आहे.

त्यात मुंबई हातात असण्याची सॉफ्ट पॉवरही वेगळी आहे. देशातले सगळ्यात मोठे उद्योजक, सेलिब्रिटेज थोडक्यात सांगायचे तर देशभर प्रभाव असणारी लोकं मुंबईमध्ये राहतात आणि त्यांचा अनेक परवानग्या घेण्यापासून ते प्रॉपर्टी टॅक्स भारण्यापर्यंत ह्या ना त्या करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेशी संबंध येत असतो.

त्यामुळे भाजप महानगरपालिकेची निवडणूक एकाद्या राज्याची निवडणूक असल्यासारखी लढवणार यात कोणताच वाद नाही. याआधीही  भाजपने महानगपालिकेच्या निवडनुका राज्याच्या निवडणूक लढवण्याच्या ताकदीने लढवल्या आहेत.

हैद्राबाद निवडणुकीमध्ये अमित शहा यांनी स्वतः लक्ष घातलं होतं.

अमित शहा यांनी स्वतः शहरातून रोड शो केला होता. त्याचबरोबर जेपी नड्डा,स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, तेजस्वी सूर्या हे सगळॆ मोठे नेते प्रचारासाठी उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वॅक्सीन टूरचं कारण देऊन निवडणुकीच्या काळात हैदराबादला भेट दिली होती.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतही स्वतः अमित शहांबरोबर इतर मोठे नेते प्रचारात उतरणार यात वाद नाही.

टार्गेट-शिवसेना

२०१७ च्या निवडणुकीसारखीच या ही निवडणुकीत भाजपचंच टार्गेट शिवसेनाच असणार हे फिक्स आहे. काल  कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही अमित शहा यांच्या रडारवर शिवसेना आणि उद्धव ठाकरेच होते. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला आहे आणि विश्वासघात करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा शब्दता त्यांनी सेनेच्या विरोधात रणशिंग फुंकलं आहे. 

सेनेला हिंदुत्व आणि भ्रष्टाचार या दोन मुद्यांवर घेरण्याची रणनिती भाजपने आखल्याची दिसते.

 कालच्या  भाषणात महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर भाजपने मुंबईमध्ये बेस्ट बसेसवर आपले सरकार आले, हिंदूंच्या सणांवरचे संकट दूर झाले अशी जाहिरात करून सेनेला हिंदुत्वाच्या मुद्यवरच घेरणार असल्याचं जवळपास स्पष्ट केलं आहे.

दुसरं मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा.

 ”गेल्या २५ वर्षांपासून सेनेच्या काळात मुंबईकरांना झालेल्या त्रासाचा आम्ही लेखा -जोखा आम्ही काढला आहे. याकाळात आम्ही जरी सेनेबरोबर युतीत असलो तरी  निर्णय घेण्याचे अधिकार सेनेकडे होते” असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी थे हिंदूला देलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याआधी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत मुंबई महानगरपालिकेतहजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

 तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कॅगच्या चौकशीची घोषणा केली होती.

त्यामुळे येत्या निवडणुकीत गेल्या २५ वर्षांपासून सलग आपल्या सत्तेत असणाऱ्या सेनेला भाजपाकडून या दोन मुद्यांवरून टार्गेट केलं जाणार एवढं नक्की. २०१७ मध्ये भाजपने सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत २०१२ मध्ये असलेला ३१ नगरसेवकांचा आकडा ८२ वर नेला होता. भाजपच्या बाजूने असणारी अजून एक गोष्ट म्हणजे २०१७ मध्ये मजबूत असणारी सेना आता एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर तितकी स्ट्रॉंग राहिलेली नाहीये.   

उत्तर भारतीय आणि गुजराती मतांची मोट 

२०१४ पासून उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्यासारखाच समोर येत आहे. मुंबईमध्ये अमराठी मतदारांची संख्या जवळपास ४६%च्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं. २०१७ च्या पालिका निवडणुकित  २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी आहेत नगरसेवक निवडून आले होते. 

भाजपने त्यावेळी ५३ गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांना उमेदवारी दिली होती आणि सर्वाधिक ३६ अमराठी नगरसेवक मुंबई महानगर पालिकेवर पाठवले होते. या निवडनुकीतही हा मतदार भाजपासाठी ट्रम्प कार्ड असणार आहे. 

यासाठी भाजपने उत्तर भारतीयांचे  मिळावे देखील घेण्यास सुरवात केली आहे. विद्या ठाकूर, कृपाशंकर सिंग, राजहंस सिंग हे उत्तर भारतीयांचे प्रमुख नेते आणि मनोज कोटक, किरीट सोमैय्या, मंगलप्रभात लोढा हे गुजराती नेते भाजपची हा वोटबँक ह्यावेळी सुद्धा कायम राहील यासाठी प्रयत्न करताना दिसतील. 

 मराठी मतं, आशिष शेलार यांचं अध्यक्षपद , शिंदे गट आणि जमल्यास मनसेची युती 

अजून तरी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची असेल तर मराठी मतदाराची मतं मिळवावी लागतीलच अशी स्तिथी आहे. हेच कारण समोर ठेवून भाजपने आशिष शेलार या मोठ्या नावाला मंत्री नं करता मुंबईमध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आशिष शेलार यांच्या रुपाने मराठी नेता, मराठा नेता मुंबई भाजपाचा चेहरा म्हणून उभा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. 

शिवसेनेला थेट अंगावर घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांमध्ये आशिष शेलार यांचा समावेश होतो. अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतरही आशिष शेलार यांनी अनेकदा सामन्य मराठी माणूस, कोळीवाड्याचा प्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो. 

नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवातही वरळी ते घाटकोपर पर्यंत भाजपाचंच वर्चस्व दिसून आलं होतं.

भाजपाला या निवडणुकीत मराठी मतांची अधिकची रसद पुरवण्यासाठी शिंदे गटही भाजपसोबत असणार आहे. शिंदे गटातील चार आमदार आणि एक खासदार निश्चितपणे भाजपच्या मिशन १५० ला हातभार लावू शकतात. 

यामध्ये अजून एक फॅक्टर राहतो तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. भाजप-मनसे युतीबद्दल अजूनही दोन्ही पक्षाचे नेते सांभाळूनच प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र जर अमित शहांच्या मुंबई भेटीत भाजप-मनसे युती फायनल झाली तर राज ठाकरे आणि त्यांच्याबरोबर असणारी मराठी मत भाजपकडे येऊ शकतात.

हे सगळं असलं तर या सर्वांमध्ये भाजपचं जमिनीवरचा काम कुठेही मागे नसतं 

२०१४ पर्यंत भाजपचं मुंबईमधील संघटन तितकसं मजबूत नव्हतं. मात्र २०१७ ची महानगरपालिकेची निवडणूक लागायच्या आधी जवळपास अडीच वर्षे भाजपने जमिनीवरील संघटन मजबूत करण्यास सुरवात केली होती. 

त्यासाठी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलं होतं. 

संघटन वाढवण्याचा फायदा भाजपला २०१७च्या निवडणुकीत झाला देखील. त्यानंतर भाजपने हे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिल्याचं दिसतं आणि आज त्यामुळे भाजपाकडे मुंबईतही स्वतःचं असं कॅडर आहे. ४० ते ५० हजार मतदारांचा वॉर्ड असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत अमित शहांची सिग्नेचर स्टाइल असलेली पन्नाप्रमुखची आईडिया वापरून भाजप एक एक मत आपल्याकडे वळवताना दिसू शकतं. 

2017 मध्ये भाजपने 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने सुमारे 40 जागा गमावल्या होत्या असा दावा भाजपाकडून करण्यात येतो अशावेळी अमित शहांचं हे बूथ लेव्हलचं मॅनेजमेंट पक्षासाठी महत्वपूर्ण असू शकतेय.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे भाजप ही निवडणूक शेवटची निवडणूक असल्यासारखीच लढेल एवढं नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.