म्हणून सप्टेंबरमध्ये परत जाणारा पाऊस यंदा ऑक्टोबरमध्येही कोसळतोय

शाळेत असतांना सगळ्यांनीच तीन ऋतूंचे ४-४ महिने पाठ केले आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा, फेब्रुवारी ते मे उन्हाळा आणि जून ते सप्टेंबर पावसाळा. पण अलीकडच्या काळात याचा क्रम हळूहळू चुकतोय. साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पडणारा परतीचा पाऊस तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबलाय. 

काल पुण्यात पडलेल्या पावसाच्या प्रवाहात दगडूशेठ गणपती मंदिराच्या रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाक्या सुद्धा वाहून जात होत्या. निव्वळ पुणेच नाही तर देशभरातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती निर्माण झालीय. 

परंतु एरवी ऑक्टोबरच्या सुरुवातीला परतीचा राम राम करणारा हा पाऊस ऑक्टोबर संपेपर्यंत परत जात नाहीये.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर असलेली खरेदी ठप्प पडतेय तर राज्यातल्या बहुतांश भागात हाता तोंडाशी आलेलं पीक पावसामुळे वाया जातंय. पण तरी सुद्धा पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 

त्यामुळेच सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की, यंदा पाऊस इतक्या उशिरापर्यंत का पडतोय? 

तर याचं कारण आहे हवामानात होणाऱ्या बदलामुळे परतीच्या पावसात झालेला बदल. हवामानात होणाऱ्या बदलामुळे गेल्या २ दशकांपासून पावसाच्या वेळेत बदल होतेय. पावसाची सुरुवात होण्याची वेळ बदलत आहे त्याचप्रमाणे परतीच्या पावसाच्या वेळेत सुद्धा बदल होतोय. दोन दशकांपासून हे बदल हळूहळू होत असले तरी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. 

परतीचा पाऊस जेव्हा माघारी वळतो तेव्हा तापमानात सुद्धा वाढ व्हायला लागते. ऑक्टोबरमध्ये दिवसा भरपूर ऊन पडायला लागते. या उन्हामुळे हवेत आणि वातावरणात असलेल्या पाण्याची वाफ होते आणि ते ढगांमध्ये जाऊन मिसळते. या अधिकच्या बाष्पामुळे ढग मोठे होतात आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडतो. 

ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. 

ते सांगतात की, “यंदाच ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतोय असं काहीही नाही. आमच्याकडे असलेल्या १२० वर्षांच्या रेकॉर्डमध्ये अनेकदा ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्याच्या नोंदी आहेत. यंदा पाऊस परतत असतांना दिवसा मोठ्या प्रमाणावर ऊन तापतंय. त्या उन्हामुळे हवेतील पाण्याचं बाष्पभावं होऊन रात्री जोरदार पाऊस पडतोय.”

ते पुढे सांगतात की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची परिस्थिती सामान्य आहे. साधारणपणे यामधून चक्रीवादळ तयार होऊन, नोव्हेंबर महिन्यात या पट्ट्यातून तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. पण अशी परिस्थिती अद्याप तयार झालेली नाही.” असं त्यांनी सांगितलं.

तसेच दुसऱ्या एका हवामान तज्ज्ञांनी बोल भिडूशी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,

ते म्हणाले, “यंदाचे वर्ष हे ला निनो वर्ष आहे. ला निनो वर्षांमध्ये पावसाच्या ढगांचा परिसर मोठा होत असतो. बंगालच्या उपसागराकडून वाहत जाणारे वारे हे ढगांना आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यापासून इराणपर्यंत घेऊन जात असतात. तिथे पाऊस पडल्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाच्या परतीचा प्रवास सुरु होतो. पण तो मोठ्या अंतरामुळे लांबत जातो.”

ते पुढे म्हणाले की, “जेव्हा हे ढग बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जायला लागतात. त्या प्रवासादरम्यान ऊन सुद्धा वाढायला लागते. वाढलेल्या उन्हामुळे वातावरणातील पाण्याची वाफ होते आणि ढगांची वाढ व्हायला लागते. तर संध्याकाळी वातावरण थंड झाल्यानंतर याच ढगांमधून पाऊस सुरु होतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतोय.” असं त्यांनी सांगितलं.

परंतु हवामानात होत असलेल्या बदलांमुळे ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढत आहे. तापमानातील वाढीमुळे परतीच्या पावसाच्या ढगांची वाढ होणे आणि त्यातून पाऊस पडण्याचे चक्र लांबत आहे. 

पावसाच्या वेळेत बदल होण्यामागे पर्यावरणात होणारे बदल हेच प्रमुख कारण सांगण्यात येते.

पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे पावसाचेच नाही तर एकंदरीत तीनही ऋतूंचे चक्र बदलले आहे. हवामानातील बदलांमुळे तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्रावर तयार होणारे ढग वेळी अवेळी जमिनीवर येत आहेत. तर पाऊस जेव्हा परतत असतो तो लांबत आहे.

पावसामध्ये झालेल्या या बदलाचे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक परिणाम आहेत.

सुरुवातीच्या अतिवृष्टीपासून बचावलेली पिकं जेव्हा कापणीसाठी तयार झाली होती, तेव्हा परतीचा पाऊस लांबल्यामुळे हातात आलेली पिकं वाया वाया गेली आहेत. लोकांची अनेक नियोजित कामं या पावसामुळे खोळंबली आहेत. पण या पावसामुळे अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. उसाच्या शेतीला  धरणातून देण्यात येणारे पाणी वाचत आहे. पाऊस संपल्यानंतर भूजलाचा उपसा केला जातो तो कमी होत आहे त्यामुळे भूजलाची पातळी टिकून राहतेय.

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.