पंजाबरावांनी बंगला गहाण ठेऊन संस्था वाचवली, आज याच संस्थेत वर्चस्वावरून राडा सुरु आहे

काल अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून ही निवडणूक शांततेत पार पडत असते. यंदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख यांचा प्रगती पॅनल आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनलमध्ये निवडणुकीची चुरस रंगली होती. 

सगळं काही व्यवस्थित चालू असतांना मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार मतदान केंद्रात आले. त्यांच्या मतदान केंद्रात येण्यावरून ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा विशिष्ठ उमेदवारांचा प्रचार करण्याचे आणि मतदारांना प्रलोभन देण्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आला.  तेव्हा दोन्ही गटात धक्काबुक्की सुरु झाली. त्याचदरम्यान भुयार यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यांनतर दोन्ही गटातील प्रमुखांनी कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं आणि प्रकरण मिटलं. 

परंतु या घटनेमुळे पंजाबराव देशमुखांनी ज्या निस्वार्थ भावनेने या शिक्षण संस्थेची स्थापना केली होती त्या संस्थेच्या इतिहासाला गालबोट लागल्याचे बोलण्यात येत आहे. 

पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या पापळ गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. घरची परिस्थिती तशी चांगली असली तरी उच्च शिक्षण घेऊ शकेल इतकी सधन नव्हती. सुरुवातीला कारंजा लाड, अमरावती आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर अनेक अडचणींवर मात करून त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून आपली पीएचडी पूर्ण केली.

जेव्हा पंजाबराव आपली पीएचडी पूर्ण करून विदर्भात परतले होते तेव्हा विदर्भात बोटांवर मोजता येतील इतक्या कमी शाळा होत्या आणि या शाळांमध्ये केवळ गर्भश्रीमंत आणि भांडवलदारांचीच मुलं शिक्षण घेऊ शकत होती. तसेच या शाळा तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे खेड्यापाड्यातील मुलांना शाळेत जात येत नव्हतं.  

मात्र पंजाबरावांना परिस्थितीत बदल घडवून शिक्षणाचे दरवाजे बहुजनांच्या मुलांसाठी उघडायचे होते. 

त्याच दृढ इच्छेतून त्यांनी १९३२ मध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अमरावती येथे श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले. या छात्रालयात सगळ्याच जातीतील विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. या कामात त्यांना आबासाहेब खेडेकर, नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण या मंडळींनी मोठी मदत केली होती. 

पंजाबरावांचे छात्रालय चालू होते मात्र त्याच दरम्यान विदर्भ शिक्षण मंडळाकडून चालवले जाणारे मराठा हायस्कुल निधीच्या कमतरतेमुळे बंद होण्याच्या मार्गावर होते. निधी संपला असला तरी शिक्षकांना ती शाळा चालवायची होती त्यामुळे त्यांनी शाळा आपल्या ताब्यात घेतली आणि शिवाजी शिक्षण संस्था या नावाने त्या शाळेची नोंदणी केली. 

मात्र कालांतराने त्या शाळेचा कारभार शिक्षकांना सुद्धा पेलवत नव्हता. तेव्हा ही शिक्षण संस्था पंजाबरावांनी आपल्या ताब्यात घ्यावी अशी विनंती शिक्षकांनी त्यांना केली. त्यामुळे पंजाबरावांनी त्या शाळेला आपल्या ताब्यात घेतलं आणि शाळेत निर्वेतन शिक्षकाचे काम सुरु केलं. 

संस्थेच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळेच्या वर्गखोल्या बांबूचा तट्ट्यांपासून बनवलेल्या होत्या. त्यामुळे लोकं या शाळेला तट्टा म्हणून खिल्ली उडवायचे. 

मात्र भाऊसाहेबांनी आपले काम थांबवले नाही. १९३७ मध्ये भाऊसाहेब हे संस्थेचे आजीवन अध्यक्ष झाले. त्यांनी हैद्राबादच्या निजामाला इंग्रजांकडून मिळणाऱ्या विकास निधीची माहिती मिळवली. त्यातूनच  २० हजार रुपयांचा निधी संस्थेला मिळवून दिला. त्यानंतर इंग्रज शासनाने शाळेसाठी जमीन देऊ केली तर निजामाने सुद्धा आणखी काही निधी दिला. परंतु मिळणारा निधी संस्थेच्या कामाच्या तुलनेत अपुरा पडत होता.  

तेव्हा पंजाबराव आणि विमलबाई देशमुखांनी त्यांची सगळी संपत्ती या संस्थेच्या विकासासाठी खर्च केली.

पंजाबराव देशमुखांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांनी शिक्षण संस्थेलाच आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. छात्रावास आणि एका शाळेपासून सुरु केलेली संस्था १९५८ मध्ये १ प्राथमिक शाळा, ७ माध्यमिक शाळा आणि ८ कॉलेज इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेली होती. त्यामुळे होणारा खर्च सुद्धा वाढला होता. मात्र त्याउलट संस्थेचं  शासकीय अनुदान सुद्धा फार कमी होतं.

या वाढत्या खर्चामुळे मिळणाऱ्या देणगीसोबतच पंजाबरावांच्या खाजगी मालमत्तेतून संस्थेचा खर्च पूर्ण व्हायचा. त्यामुळे त्यांची संपत्ती संपलेलीच होती. परंतु संस्थेची आर्थिक अडचण सुरूच असायची. तेव्हा पंजाबरावांनी सगळ्या संपत्तीनंतर उरलेला स्वतःचा राहता बंगला सुद्धा राज्य सहकारी बँकेकडे गहाण ठेऊन दिला आणि बँकेकडून मिळालेल्या पैशांवर संस्थेच्या गरजा पूर्ण केल्या.

संस्थेची निकड दूर झाली मात्र पंजाबरावांकडे परत बंगला सोडवायला पुरेशे पैसे कधीच जमा झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या हयातीत स्वतःचा बंगला बँकेकडून सोडवता आला नाही. त्यानंतर काही वर्षांमध्येच १० एप्रिल १९६५ रोजी त्यांचं निधन झालं. 

त्यांच्यानंतर दादासाहेब कहाने हे संस्थेचे अध्यक्ष झाले. तर लोकाग्रहास्तव पंजाबरावांच्या पत्नी विमलबाई या अमरावतीच्या खासदार झाल्या. त्या खासदार असल्या तरी त्यांच्याकडे सुद्धा बंगला परत घेता येईल इतके पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी बंगला कायमचाच विकून टाकला आणि मिळालेले पैसे संस्थेच्या विकासासाठी खर्च केले.

विमलबाईं देशमुखांनी आपल्या हयातीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी शिक्षण संस्थेला मोठं करण्याचं काम केलं. आज या संस्थेचे ७५ हायस्कूल, ५४ ज्युनिअर कॉलेज, २४ सिनिअर कॉलेज तसेच ३४ होस्टेल्स आहेत. तसेच रयत नंतर ही संस्था महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. संस्थेत आर्टस्, कॉमर्स, साईन्स सारख्या पारंपरिक शाखांबरोबरच ऍग्रीकल्चर, मेडिकल, इंजिनियरिंग आणि लॉ अशा वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण दिले जाते.

पंजाबरावांच्या मृत्यूनंतर संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवण्यास सुरुवात झाली. आज संस्थेचे एकूण ७७४ आजीवन सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांसारखे मान्यवर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. मात्र काल संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जो राडा झाला त्यामुळे संस्थेच्या या गौरवशाली इतिहासाला धक्का लागला अशी खंत मतदान करणारे जेष्ठ सदस्य व्यक्त करत होते.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.