फुटबॉलस्टार मॅराडोनाचं चोरलेलं घड्याळ आपल्या भारतात घावलंय

चोरी करणं म्हणजे मोठा रिस्की गुन्हा, पण कित्येक जण त्यात माहीर असतात. आता चोरी करून पोलिसांच्या नजरेतून पळ काढणं त्याहून मोठं रिस्की काम. म्हणजे एक भागातून दुसऱ्या भागात किंवा राज्यात पळ काढणं थोडं तरी सोप्प असत, पण चोरी करून ३,५०० किलोमीटरचा पल्ला पार करून डायरेक्ट दुसरा देश गाठणं आणि तेही विमानतळावरच्या हाय सिक्युरिटीच्या नजरेत म्हणजे चोराला सुद्धा मानलं पाहिजे.

आता भिडू तुम्ही कन्फ्युज झाला असाल आणि चोराला काय एवढा भाव देता, असंही म्हटला असाल. त्यामुळे स्टोरी पूर्ण वाचा म्हणजे सगळा मॅटर लक्षात येईल. आणि चोराला भाव द्यायचं कारण म्हणजे या चोरानं साधी – सुधी नाही तर हाय क्लास चोरी केलीये. ज्याला पकडायला दोन देशांच्या पोलिसांना कित्येक दिवस डोकं लढवायला लागलंय. 

ही चोरी म्हणजे दिएगो मॅराडोनाचं घड्याळ. या घड्याळ चोरणाऱ्याला दुबई आणि आसामच्या एजन्सींनी मिळून पकडलंय.

तर असं क्वचितच कोणी असेल ज्याला दिएगो मॅराडोना माहित नाही. मॅराडोना म्हणजे अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू. जो आपल्या खेळामुळं अजरामर ठरलाच. पण सोबतच दोन्ही हातात घड्याळ घालणारा खेळाडू म्ह्णून तो पटकन कोणाच्याही लक्षात येतो.

पेलेनंतर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये मॅराडोनाची गिनती व्हायची. मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने १९८६ च्या फुटबॉल वर्ल्डकप जिंकला होता. भारतात सुद्धा त्याच्या चाहत्यांची कमी नाही.

पण गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने मॅराडोनाचं निधन झाले. तो बऱ्याच काळापासून कोकेनचं व्यसन आणि लठ्ठपणाशी संबंधित आजाराशी झुंज देत होता. मेंदूच्या ऑपरेशननंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आल होतं. त्यानंतर दोन आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला.

असं म्हंटल जात की, त्याच्या सामनाचं स्थलांतर होत असताना त्याच्या घड्याळ चोरी झाल्याचं समोर आलं होतं. तशी तक्रार दाखल झाली. आणि दुबई पोलीस त्या घड्याळाचा शोध घेण्याच्या कामाला लागले. आता एवढा मोठा फुटबॉलर आणि तो सुद्धा घड्याळ प्रेमी त्यामुळं त्याची घड्याळं काय साधी – सुधी थोडीना असणारे.

माहितीनुसार, दिएगो मॅराडोनाच्या Hublot कंपनीच्या या घड्याळाची किंमत त्यावेळी ११ लाखांच्या आसपास असल्याचं समजतंय. जे सध्या भारतातून जप्त करण्यात आलीये.

वाजिद हुसेन असं या आरोपीचं नाव आहे. ज्याला आसामच्या चरैदेव जिल्ह्यातील मोरानहाट भागातून अटक  करण्यात आली. आसाम पोलिसांचे डीजीपी ज्योती महंता यांनी सांगितले कि,

दुबई पोलीस कित्येक दिवसांपासून या मौल्यवान घड्याळाचा शोध घेत होती. तपासा दरम्यान त्यांना वाजिद हुसेनवर संशय आला. ज्याला पकडण्यासाठी दुबई पोलिसांनी आसाम पोलिसांच्या मदतीने महत्त्वाची मोहीम राबवली. आणि या आरोपीला आसाममधून ताब्यात घेण्यात आलं.

चौकशी दरम्यान, आरोपी वाजिदनं हे घड्याळ चारल्याचं कबुली दिली. त्यानं सांगितलं कि, तो मॅराडोनाचं सामान स्टोअर करणाऱ्या कंपनीत वॉचमॅन म्हणून काम करायचा. याच दरम्यान त्यानं घड्याळावर डल्ला मारला. चोरी केल्यानंतर तो यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात भारतात पळून आला.

पोलिसांनी सांगितलं कि, वाजिद हुसैन याला मोरनहाट भागात त्याच्या सासरच्या घरातून अटक केली गेली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून ही याबाबत  माहिती दिली.

एका इंटरनॅशनल मिशन अंतर्गत आसाम पोलीस आणि दुबई पोलिसांनी वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीकडून दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे लिमिटेड स्टॉक असलेलं घड्याळ जप्त केले आहे. वाजिदला कायद्यानुसार शिक्षा होईल.

आता या पठ्ठ्यानं घड्याळ चोरलं खरं पण जवळपास दीड वर्षानंतर सुद्धा त्यानं विकलं नाही हे विशेष. आता ते विकलं नाही कि विकताच आलं नाही हे त्याच त्यालाच माहीत.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.