दोन महिने हा चोर जज म्हणून काम पाहत होता आणि त्याने दोन हजार कैद्यांना सुट्टी दिली होती..

आपल्या देशात फॉरेनपेक्षा जबरदस्त गुन्हे घडतात पण तितकेच ते विनोदीही असतात आणि गंभीरही असतात. म्हणजे आपले सिनेमे हे वास्तवातून घडलेल्या गोष्टींवर बेतलेले असतात यात काही वादच नाही. आजचा किस्सा वाचून आपल्याला हसूही येऊ शकत आणि आपल्या देशातल्या प्रशासनावर आपण त्रागाही व्यक्त करू शकतो अगोदर किस्सा पाहा किती खळबळजनक आहे.

दिल्लीतल्या धनीराम मित्तल या ७७ वर्षाच्या माणसाने न्यायव्यवस्थेला सुद्धा उल्लू बनवून असं कांड केलं कि सगळेच हैराण झाले होते. तर धनीराम मित्तल हे नाव या घटनेनंतर पोलिसांच्याच नाही तर सगळ्या देशाच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं.

तर हा धनीराम मित्तल चोर कसा बनला याकडे एक नजर टाकू.

धनीराम मित्तल हा सुरवातीला नोकरीच्या शोधात भटकत असायचा पण सतत नकार मिळायला लागल्याने त्याने विचार केला कि असं नाही तर तस पण पैसे मिळवले पाहिजे म्हणून त्याने अवैध मार्गाने पैसे मिळवायला सुरवात केली. हा धनीराम डोक्याने अतिशय चोर होता. तो रात्री अपरात्री कधी चोऱ्या करत नसे थेट दिवसाढवळ्या बनावट चाव्यांनी तो पार्किंगमधल्या कार लंपास करत असायचा.

लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून इतक्या बेमालूमपणे धनीराम गाड्या गायब करायचा कि पोलिसांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. जोवर धनीराम पोलिसांच्या हाती लागला नव्हता तोवर त्याने तब्बल १ हजार गाड्या विकून टाकल्या होत्या.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आढळलं होतं कि एक माणूस  सोसायटीत घुसतो आणि बाहेर पडताना थेट मारुती कार चोरून फरार होऊन जातो.

पन्नास वर्ष धनीराम मित्तल चोऱ्या करत राहिला आणि चोऱ्या पण तो इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने करायचा कि त्याचे किस्से ऐकून पोलीस थकून गेले होते. धनीराम मित्तलने पोलिसांच्या दोन तीन पिढ्या बदलताना बघितल्या होत्या. तो अभ्यासू होता त्याचा उपयोग चोरीवर रिसर्च करण्यात केला. अभ्यास करतात करता तो वकिलीचा अभ्यास करून बसला होता.

आपल्या केस लढवण्यासाठी आणि वकिलांचं परत झंझट नको म्हणून धनीराम मित्तलने एलएलबीच सगळं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हॅन्डरायटिंगचासुद्धा कोर्स केला होता. ग्राफोलॉजीची डिग्रीसुद्धा मिळवली पण चोरी करायचं सोडलं नाही. भारताचा चार्ल्स शोभराज म्हणून धनीराम मित्तलची ओळख बनली होती. अनेक चोऱ्या माऱ्या धनीराम मित्तल करून बसला होता आणि तेही शिक्षण घेऊन. स्वतःच गाड्या चोरायचा आणि स्वतःच त्याचे कागदपत्रं बनवून विकून टाकायचा.

एका वेगळ्या फॉरमॅटचा चोर असलेला धनीराम मित्तल चोऱ्या करून वैतागला होता, आयुष्यात काहीतरी थ्रिल आणि वेगळेपण हवं म्हणून त्याने एके दिवशी नकली कागदपत्रं बनवली आणि थेट झज्जर कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला डायरेक्ट दोन महिन्याची सुट्टी देऊन टाकली. न्यायाधीशाला सुट्टीला पाठवून हा धनीराम मित्तल स्वतः तिथला न्यायाधीश बनला.

रोज नियमित कोर्टात जाणे निर्णय देणे आणि गुन्हेगारांना शिक्षा ठोठावणे हि काम तो तब्बल दोन महिने करत राहिला. दोन महिने कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही. इतक्या बेमालूमपणे हे सगळं प्रकरण दोन महिने घडत राहिलं. आपल्या दोन महिन्याच्या न्यायाधीशाच्या करियरमध्ये धनीराम मित्तलने तब्बल २ हजार ७४० गुन्हेगारांना जामिनावर सुट्टी देऊन टाकली आणि बऱ्याच जणांना जेलातही डांबलं.

शेवटी दोन महिने उलटल्यावर पोलिसांच्या हि गडबड लक्षात आली. सगळा कट रचून आणि धनीराम मित्तलची हिस्ट्री लक्षात घेऊन पोलिसांनी धनीरामला कोर्टातच अटक केली. याआधी १९६४ साली धनीराम २५ वर्षाचा असताना पोलिसांच्या तावडीत सापडला होता त्यानंतर थेट रंगेहाथ न्यायाधीशाच्या अवतारात २०१६ साली अटक करण्यात आली.

आता इतके राडे करूनही २०१६ साली अटक झाली पण तिथूनही हा धनीराम मित्तल गायब झाला आणि गायबच आहे. त्याला ज्यावेळी अटक झाली आणि कोर्टात आणलं गेलं तेव्हा जजने त्याला ओळखलं आणि रागाने सांगितलं कि तू बाहेर निघून जा, पोलिसांचं लक्ष नाही हे बघून तो फरार झाला.

या घटनेवर सिनेमा बनू शकतो इतकी जबरदस्त धनीराम मित्तलची हि गोष्ट आहे. हसूही येऊ शकत आणि न्यायव्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा रागही येऊ शकतो.

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. Kiran Ghorpade says

    This is impossible, to become Judge

Leave A Reply

Your email address will not be published.