मीरा कुमार म्हणतायत, भारतात तर दोन प्रकारचे हिंदू आहेत…

कॉमेडियन वीर दासच्या ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज…’ कवितेनं देशात चांगलाच राडा घातला. कुणी वीर दासला पाठिंबा दिला, तर कुणी त्याला देशद्रोही ठरवलं. कुणी जुनी विडंबनं शेअर केली, कुणी कॉमेडियनचे किस्से शेअर केले. थोडक्यात काय जितकी टाळकी तितकी मतं, असं चित्र सोशल मीडियावर होतं.

पण वीर दासचा विषय इतका गंभीर होता, की राजकीय नेत्यांनी पण यात उडी घेतली. वीर दास विरोधात गुन्हाही दाखल झाला. त्यात अभिनेत्री कंगना राणावतनं देशाला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती, असं बेताल वक्तव्य केलं. मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाची री ओढली आणि हुशार कार्यकर्त्यांची ट्यूब लगेच पेटली.

की.. बात निकली है, तो दूर तलक जायेगी…

ज्यांनी ज्यांनी हा अंदाज लावला होता, तो शंभर टक्के खरा ठरलाय, कारण ‘टू इंडियाज’ कवितेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणारी वक्तव्य आता थेट राजकीय नेत्यांकडूनच होतायत. असंच एक वक्तव्य केलंय, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी.

त्या म्हणाल्यात, देशात दोन प्रकारचे हिंदू आहेत…

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या ‘द लाइट ऑफ एशिया: द पोएम दॅट डिफाइन्ड बुद्धा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मीरा कुमार यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली.

त्या काय म्हणाल्यात हे आधी सांगतो –

पुजारी आजही गोत्र विचारतात

“आता आपण २१ व्या शतकात आलो आहोत. आजूबाजूच्या अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत, हे आपण पाहतोय. देशातल्या पायाभूत सुविधा सुधारताना दिसत आहेत. आपल्याकडचे रस्ते चकचकीत झालेत, मात्र त्या रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांचे विचार कधी चकचकीत होणार? मी अशा वातावरणात वाढले आहे, जिथं जात मानली जात नाही. पण मी आजही मंदिरात गेले, की पुजारी माझं गोत्र विचारतात.”

वडिलांच्या आठवणीही जागवल्या

“माझे वडील जगजीवन राम यांनी चुकीची सामाजिक व्यवस्था आणि जातीय भेदभावाविरोधात लढा पुकारला होता.त्यामुळं अनेक लोकांनी त्यांना सल्ला दिला की, तुम्ही हिंदू धर्म सोडा. पण त्यांचा धर्म सोडण्यास नकार होता. त्यांचं म्हणणं होतं, की धर्म बदलला तरी माझी जात बदलणार आहे का?”

देशात दोन प्रकारचे हिंदू…

”आजही देशात जातीव्यवस्था कायम आहे. आपला भारत दोन प्रकारच्या हिंदू समाजांमध्ये विभागला गेलाय. एक हिंदू समाज असा आहे, जो मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊ शकतो आणि दुसरा हिंदू समाज असा आहे, ज्याला अजूनही मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नाही. वेगवेगळ्या धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी आपण शिकायला हव्यात, स्विकारायलाही हव्यात; कारण हाच आपला वारसा आहे.”

मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतही काम केलं होतं. त्यांनी रामविलास पासवान आणि मायावती यांना टक्कर देत बिजनौरमधून विजय मिळवला. पुढं दिल्लीतल्या करोल बाग मतदार संघातून त्या तीनदा विजयी झाल्या. आपल्या वडिलांचा वारसा चालवत त्यांनी बिहारमधल्या सासाराम मतदार संघातून निवडणूक लढवत जोरदार बहुमत मिळवलं. २००९ मध्ये त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं, पण लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यांच्या या वक्तव्यामुळं आणखी नव्या वादाला तोंड फुटणार का? याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.