हे आहेत चंद्रयान-३ मोहीमेचे खरे हिरो

भारताच्या चंद्रयान-३ साठी आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज भारताचं चंद्रयान-३ संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. या यानाच्या सर्व सिस्टिमची वेळोवेळी पाहणी केली जात आहे.

चंद्रयान-३ च्या सर्व गोष्टी म्हणजे चंद्रयान-३ बनवण्यापासुन ते चंद्रयान यशस्वी उड्डाण करेपर्यंत असो किंवा मग आता चंद्रयान चंद्रावर यशस्वी पोहचवण्यापर्यंत या सर्व प्रकियेचे हिरो कोण आहेत ?

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) प्रमुख आणि वैज्ञानिकांनी मिळून चंद्रयान-३ मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ आणि त्यांच्या टीमचा सहभाग आहे. चंद्रयान-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे VSSC डायरेक्टर सुद्धा या टीमचा भाग आहेत.

या सगळ्यात पहिलं नाव येत ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ याचं.

१४ जानेवारी २०२२ रोजी इस्रोची कमान सोमनाथ यांना देण्यात आली. त्यांचा हा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. इस्रोच्या प्रमुख पदासोबत ते अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष देखील आहेत. या पोस्टिंगपूर्वी ते तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक होते.

चंद्रयान-३, आदित्य-एल १ सूर्य मिशन आणि गगनयान यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांनी त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेग घेतल्याचा आपल्याला पहायला मिळतोय. सोमनाथ स्पेसक्राफ्ट लॉन्च व्हेईकलचे डिझाईन, अभियांत्रिकी, स्ट्रक्चरल डिझाईन, यंत्रणा, पायरोटेक्निक आणि एकत्रिकरण यांमध्ये पारंगत असल्याच सांगितलं जातं. इस्रोचे अध्यक्ष या नात्याने ते या महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी सांभाळत आहेत.

या सगळ्यात दुसरं महत्वाचं नाव आहे रितू करिधल, चंद्रयान-३ उतरवण्याची जवाबदारी त्यांची असणार आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील रितू करिधल, ज्यांना भारताची रॉकेट वुमन म्हणून ओळखलं जातं. अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इस्रोने रितू यांना चंद्रयान-३ चे मिशन डायरेक्टर बनवलं आहे. याआधी त्या चंद्रयान-२ च्या मिशन डायरेक्टर आणि अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांच्या भाग राहिलेल्या आहेत, विशेष म्हणजे रितू करिधल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा अनुभव पाहता २०२० मध्येच इस्रोने ठरवलं होतं की चांद्रयान-३ ची मोहीमही रितू यांच्या हातात असेल.

या मोहीमेतील अजून एक महत्वाचं तिसरं नाव आहे ते म्हणजे, पी. वीरमुथुवेल

चांद्रयान-3 मिशन संपूर्ण प्रकल्पाची देखरेख पी. वीरमुथुवेल करत आहेत. वीरामुथुवेल हे तामिळनाडूच्या विल्लुपुरम भागातील आहेत. वीरमुथुवेल यांनी त्यांचे शालेय शिक्षण विल्लुपुरममधील रेल्वे स्कूलमधून केले आणि खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या खासगी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतला.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ वीरमुथुवेल हे चंद्रयान-३ चे प्रमुख आहेत आणि सध्या चंद्र मोहिमेचे प्रकल्प संचालक म्हणून काम सांभाळत आहेत.

चंद्रयान-२ लँडर चंद्रावर सॉफ्ट-लँड करण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी एम वनिता यांची चंद्रयान मिशन डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली होती. या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून त्यांनी हे स्थान मिळवल. चंद्रयान-३ मोहिमेचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त, वीरमुथुवेल यांनी चंद्रयान-२ मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली. चंद्रयान-२ प्रकल्पामागील शक्यता आणि विज्ञान यावर त्यांनी नासासोबत समन्वय साधला.

या सगळ्या मोहीमेतील महत्वाचं चौथ नाव एस. उन्नीकृष्णन नायर.

एस उन्नीकृष्णन नायर हे विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे डायरेक्टर आहेत. त्यांनी केरळ विद्यापिठातून इंजीनरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मॅकेनिकल इंजीनरिंगमध्ये पीएचडी केली. एस. उन्नीकृष्णन नायर आणि त्यांच्या टीमने जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल GSLV मार्क-III मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. याला लाँच व्हेईकल मार्क-III रॉकेट असेही म्हणतात आणि केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील थुंबा येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केले आहे. एस उन्नीकृष्णन नायर हे VSSC चे प्रमुख आहेत आणि नायर आणि त्यांची टीम मिशनची विविध प्रमुख कामं हाताळतात.

यामधील महत्वाचं पाचवं नाव म्हणजे मोहन कुमार.

मोहन कुमार चंद्रयान-३ मोहिमेचे निर्देशक म्हणून काम बघत आहेत. मोहन कुमार हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. त्यांनी याअगोदरही काही महत्वाच्या भुमिका बजावल्या आहेत. चंद्रयान-३ मध्येही ते निर्देशक म्हणून महत्वाची भुमिका बजावत आहे.

सहावं नाव आहे ए. राजराजन.

ए राजराजन, एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक आहेत. राजराजन हे कंपोझिट क्षेत्रातील खुप मोठे तज्ज्ञ आहेत. सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक या नात्याने त्यांच प्राधान्य म्हणजे घन मोटर उत्पादन पूर्ण करणं आणि मानवयुक्त अंतराळ कार्यक्रम आणि SSLV च्या प्रक्षेपणासह इस्रोच्या प्रक्षेपणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कठीण पायाभूत सुविधा सुरू करण हे त्याचं मह्तवाचं काम आहे.

यामधील सातव नाव म्हणजे चायन दत्त.

चायन दत्त हे तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी होते. ते अंतराळ विभागाच्या यूआर राव उपग्रह केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. उपप्रकल्प संचालक म्हणून ते ऑन बोर्ड कमांड टेलीमेट्री, डेटा हँडलिंग आणि स्टोरेज सिस्टम, लँडर या गोष्टींमध्ये चंद्रयान-३ चे नेतृत्व करत आहेत.

चंद्रयान मिशन-३ जर यशस्वी झालं तर एस सोमनाथ, रितू करिधल, पी. वीरमुथुवेल, एस. उन्नीकृष्णन नायर, मोहन कुमार, ए. राजराजन, चायन दत्त तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सर्व सदस्य यांचा हे मिशन यशस्वी करण्यात मोलाचा वाटा असणार आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.