उद्धव ठाकरेंसारखीच केसीआर यांच्यावर पण टीका व्हायची, पण त्यांनी त्यावर उत्तर शोधलंय…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि मनसेकडून एक टीका सातत्यानं होत असते ती म्हणजे मुख्यमंत्री ‘वर्षा बंगल्याच्या’ बाहेरचं पडत नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नुकतंच उद्धव ठाकरे यांची घरकोंबडा म्हणतं खिल्ली उडवली होती. तर मागच्या १५ महिन्यांपासून मंत्रालयात न गेल्यानं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जावं म्हणून याचिका करू कि आंदोलन? असा सवाल विचारला होता.

उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका आता होतं आहे अगदी तशीच टीका मे २०२१ पर्यंत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर देखील होत होती. मात्र केसीआर यांनी या टीकेला मनावर घेत सध्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता केसीआर यांच्याकडून काही धडा घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.

पण त्या आधी केसीआर यांच्यावर काय टीका होतं होती आणि त्यांनी काय बदल केला हे बघावं लागतं.

के. चंद्रशेखर राव यांच्या अलीकडील काळातील जीवनात बराच बदल झाल्याच दिसून येत आहे. ‘मिसिंग इन एक्शन’ च्या जागी मुख्यमंत्री आता विविध पातळ्यांवर सार्वजनिक व्यासपीठावर दिसून येऊ लागले आहेत. ते आता सामान्य लोकांसोबत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा लवाजमा बाजूला ठेवत दुपारचे जेवण करताना दिसत आहेत.

मागच्या ६ वर्षाच्या काळात सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नसल्यामुळे के. चंद्रशेखर राव यांना बऱ्याच टीकेला समोर जावं लागलं होतं. यासोबतच आपल्याच मंत्र्यांना वेळ देत नसल्यामुळे पण त्यांच्यावर टीका होत होती. २०१४ पासून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकही सर्वपक्षीय बैठक घेतली नव्हती.

चंद्रशेखर राव यांच्यावर असा हि आरोप व्हायचा कि, ते सचिवालयात न जाता आपल्या हैदराबाद मधील आपल्या भव्य कार्यालयच्या आणि निवासस्थानाच्या चार भिंतीमध्ये बसून राज्य चालवतात. किंवा सिद्दीपेट जिल्ह्यामधील आपल्या फार्म हाऊसवर बसून कारभार हाकतात. विशेष म्हणजे हे फार्म हाऊस शहरापासून तब्बल २ तास लांब आहे.

इतकच नव्हे तर ऑक्टोबर २०२० मध्ये जेव्हा हैदराबादमध्ये महापूर आला होता तेव्हा देखील मुख्यमंत्री म्हणून ते कुठेही बाहेर पडले नव्हते. आपल्या घरातूनच ते सगळ्या परिस्थितीवर नजर ठेऊन होते, त्याबद्दल त्यांच्या भाजप आणि काँग्रेसकडून बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

चंद्रशेखर राव यांच्यात आता काय बदल झालाय?

मात्र मे २०२१ पासून के. चंद्रशेखर राव आता बाहेर पडत आहेत. मे महिन्यात त्यांनी कोव्हिड स्पेशल गांधी हॉस्पिटलचा अखंड कोरोना काळात पहिलाच दौरा केला होता. त्यानंतर जूनमध्ये पहिल्यांदाच त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. सोबतच ते आता आपल्या मतदारसंघाचा दौरा करताना दिसत आहेत. विकास योजनांचा शुभारंभ करण्यासाठी ते राज्यभरात फिरत आहेत.

जूनमध्ये केसीआर यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील विकासाचा आढावा घेण्यासाठी काही जिल्ह्यांचा दौरा केला होता. आपल्या दौऱ्यादरम्यान ते कमीत कमी ४ जिल्ह्यांमध्ये पोहोचले होते. त्यातील एक होता वारंगल जिल्हा. इथं त्यांनी ३० मजली मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलची पायाभरणी केली होती.

त्याच महिन्यात त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या वासलमारी या गावातील दुपारच्या एका सार्वजनिक जेवणात सहभाग घेतला होता. इथं ते कमीत कमी २६०० जणांसोबत जेवण करताना दिसून आले होते. जेवणानंतर त्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये जात काही गावकऱ्यांसोबत चर्चा देखील केली होती.

महिन्याभराच्या काळात ते पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या २६ फुटी पुतळ्याचं अनावरण केलं होतं. या पुतळ्याचं अनावरण समारंभाचं आयोजन नरसिंहराव यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या समारोह संपन्नतेच्या निमित्ताने करण्यात आले होते. तेलंगणा सरकारकडून २०२० मध्ये या समारोहाचा शुभारंभ करण्यात आला होता. 

जुलैमध्ये केसीआर एका गृहनिर्माण योजने अंतर्गत ४०० नव-निर्मित २ बीएचके घरांच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला तिथून त्यांचा मुलगा आणि आयटी मंत्री के.टी. रामा राव हे आमदार आहेत. हि गृहनिर्माण योजना तयार करण्याचं आश्वासन त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं.

या बदलामागची कारण काय आहेत?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, वाढत गेलेला असंतोष आणि तेलंगणामध्ये दिसू लागलेला विरोधी पक्ष या सगळ्यामुळे के. चंद्रशेखर राव हे कदाचित चिंतीत असावेत.

कारण आता पर्यंत चंद्रशेखर राव यांच राज्यावर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती वर्चस्व होते. मात्र अलीकडील हैदराबाद महापालिका निवडणूक आणि दुबक्का जागेवरील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तयार केलेलं आव्हान हे विचार करायला लावणारे होते. कारण एकतर हा मतदारसंघ म्हणजे केसीआर यांचा गड होता आणि तो त्यांचा शेजारचा मतदारसंघ देखील होता. मात्र त्यानंतर देखील भाजपने इथून विजय मिळवला.

अशातच आता अवघ्या २ वर्षांच्या काळात राज्यात आगामी विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. २०२३ मध्ये निवडणुका नियोजित आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे सक्रिय होणे हे नक्कीच चंद्रशेखर राव यांच्यासाठी चिंतेचं कारण आहे. या सगळ्यामुळेच चंद्रशेखर राव यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात बदल केला असल्याचं बोललं जात आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निसर्ग आणि तौकते चक्रीवादळ नुकसान पाहणी, अतिवृष्टी नुकसान पाहणी, महापूर नुकसान पाहणी अशा दौऱ्यांवेळी विरोधकांकडून टीका झालेल्या आहेत. याबाबत बोल भिडूने याआधी लेख देखील लिहिला आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण ते वाचू शकता.

सोबतच आगामी काळात मुंबई सह जवळपास १६ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे देखील केसीआर यांच्याकडून काही धडा घेऊन घराबाहेर पडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.