चांद्रयान-३ यशस्वी, आता इस्रोची पुढची झेप असेल सूर्याकडे…

इस्रोने मंगलयान चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आणि चांद्रयान ३ ने सुद्धा यशस्वी लँडिंग केलं. आता इस्रोचं पुढचं लक्ष्य आहे सूर्य. होय, इस्रो आता सूर्याशी संबंधित रहस्य शोधण्यासाठी सज्ज आहे.

‘आदित्य-L1’ नावाच्या या मोहिमेद्वारे, इस्रो उपग्रहाच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करणार आहे.

भारताने पहिल्यांदाच अशी मोहीम हाती घेतली आहे, जी सूर्याच्या अभ्यासाशी संबंधित आहे. इतकंच नाही तर आजवर फक्त अमेरिका, युरोप आणि जपाननेच सूर्याजवळ उपग्रह सोडले आहेत आणि भारत जर यात यशस्वी झाला तर भारताचं सुद्धा नाव या तीन देशांसोबत जोडलं जाईल.

‘आदित्य-L1’ मोहीम नक्की काय आहे? ही मोहीम कशी आखली गेली आहे? याविषयी जाणून घेऊ.

आदित्य-एल1 मिशनचं नाव आधी आदित्य-1 मिशन होतं, पण नंतर त्याचं नाव लॅग्रेंज पॉईंट वरून बदलण्यात आलं. कारण इस्रोने हा उपग्रह लॅग्रॅन्गियन पॉईंटच्या सर्वात जवळ असलेल्या हॅलो ऑर्बिटवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय?

लॅग्रेंज पॉईंट हा असा पॉईंट आहे जिथे सूर्य आणि पृथ्वी किंवा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं गुरुत्वाकर्षण बल समान आहे. म्हणजेच जर एखादी वस्तू या लॅग्रेंज पॉईंटवर असेल तर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तिला स्वतःकडे खेचू शकत नाही आणि ती वस्तू त्याच ठिकाणी राहते. हे लॅग्रेंज पॉईंटस L1, L2, L3, L4, L5 याप्रकारचे आहेत.

आता हॅलो ऑर्बिट (प्रभामंडल) म्हणजे काय ते पाहू?

आदित्य-L1 अंतर्गत, उपग्रहाला लॅग्रेंज पॉईंटजवळच्या हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. या हॅलो ऑर्बिटमध्ये L 1, L2, L3 हे पॉइंट्स आहेत. यातल्या L1 पॉईंटवर आदित्य-L1 स्थित करण्यात येणार आहे. हॅलो ऑर्बिट पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे L 1 पॉईंटवर उपग्रह स्थित केल्याने एक फायदा होईल तो म्हणजे, इथे जर उपग्रह योग्यरित्या पाठवण्यात आला, तर फक्त सूर्याचं ग्रहणाच्या दिवशीच नाही इतरही दिवशी कोणत्याही अडथळ्याशिवाय निरीक्षण करता येऊ शकतं. इतकंच नाही, आदित्य- L1 मिशनमुळे इस्रोची संशोधनाची व्याप्ती सुद्धा वाढणार आहे.

आदित्य L1 द्वारे कसला अभ्यास केला जाणार आहे?

आदित्य-L1 च्या माध्यमातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून सोलार कोरोना म्हणजे सूर्याचा सगळ्यात वरचा वायूच्या थराचा अभ्यास करता येणार आहेच पण सोलार कोरोनासोबतच सूर्याभोवतालच्या वायूचा सगळ्यात खालचा थर म्हणजे फोटोस्फियर आणि सोलार कोरोनाच्या खालोखाल असलेला थर म्हणजे क्रोमोस्फियर यांचाही अभ्यास करणं आणि त्यावर लक्ष ठेवणं आदित्य-L1 मुळे शक्य होणार आहे.

तसच सूर्याच्या भोवताली असलेलं आवरण अनेक प्रकारच्या वायूंनी वेढलेलं आहे.

कोरोना हे सूर्याचं सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. पण सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे कोरोना दिसणं इस्रोला जवळजवळ अशक्य झालं होतं त्यामुळे आता कोरोनाचा अभ्यास फक्त सूर्यग्रहणातच करता येतोय.

कारण या ग्रहणात चंद्र सूर्यप्रकाश लपवतो आणि कोरोना सहज दिसतो. दुसरीकडे, जर आपण कोरोनाच्या तापमानाबद्दल बोललो तर त्याचं तापमान सुमारे ६०००  अंश एवढं आहे आणि हे तापमान इतकं जास्त का आहे हे आजवर शोधता आलेलं नाही. त्यामुळे आदित्य-L1 मिशनच्या माध्यमातून त्याचा अभ्याससुद्धा केला जाणार आहे. आदित्य-L1 फक्त सूर्याच्या वातावरणाशी संबंधित अभ्यास करणार नाहीये, तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये सूर्याच्या धगीमुळे येणाऱ्या समस्यांमागची कारणंसुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आदित्य-L1 मध्ये कोणती उपकरणं वापरली आहेत?

आदित्य-L1 मिशन अंतर्गत सोडण्यात येणार्‍या आदित्य उपग्रहासोबत, अनेक उपकरणंदेखील पेलोड केली जातील. त्यातल्या पहिल्या उपकरणाचं नाव आहे विजिबल एमिशन लाइन कॅरोनोग्राफ म्हणजे VELC आणि ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे IIA द्वारे बनवण्यात येणार आहे. त्याच्या मदतीने सूर्याच्या कोरोनाचं चुंबकीय क्षेत्र आणि त्याचं पॅरामीटर या दोन गोष्टी तपासल्या जातील.

दुसरं उपकरण सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप असेल. ज्याच्या मदतीने सौर किरणांचा फरक मोजला जाईल आणि ते इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे IUCAA द्वारे तयार केलं जाईल. तिसरं उपकरण आहे इन्स्ट्रुमेंट फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे PRL.

या उपकरणाला आदित्य सोलर विंड एक्सपेरिमेंट असं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय त्यामध्ये प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज उपकरण सुद्धा बसवण्यात येणार आहे त्याचसोबत सोलर एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आणि हाय एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर ही उपकरणं सुद्धा इस्रो आदित्य-L1 मध्ये वापरणार आहे.

आदित्य एल -1 अवकाशात कधी पाठवलं जाईल?

पोलार सॅटेलाईट लॉंच वेहिकल म्हणजे  PSLV च्या मदतीने L-1 पॉईंट वर आदित्य-L1 लँड केलं जाईल. या उपग्रहाचं वजन 200 किलोपर्यंत असल्याचा अंदाज आहे. हे मिशन आधी २०१९-२०२० मध्ये होणार होतं. पण तांत्रिक अडचणींमुळे ते त्यावेळेस पूर्ण करता आलं नाही.

पण इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-L1 आता चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लगेचंच आदित्य-L1ला अवकाशात पाठवण्याची तयारी सुरु केली जाईल. शास्त्रज्ञांना अद्याप सूर्याच्या वातावरणाबद्दल सगळ्याच गोष्टी माहित नाहीयेत त्यामुळे आदित्य L1 मिशनद्वारे सूर्याशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्याचबरोबर हॅलो ऑर्बिटच्या L1 पॉईंट मध्ये जाणारा भारत हा पहिलाच देश ठरेल.

त्यामुळे चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर भारताला आदित्य एल – 1 या मोहिमेत सुद्धा यश मिळालं तर इस्रोच्या शास्त्रज्ञांना सूर्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती मिळू शकेल. एवढंच नाही तर  मंगलयान आणि चंद्रयान 3 यांच्यानंतर जर आदित्य L1 मोहीम सुद्धा यशस्वी झाली तर भारताचं आणि इस्रोचं नाव जगात आणखीनच उंचावेल.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.