गेल्या अडीच वर्षात तीन वेळा उद्धव ठाकरे TOP 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत आलेत..

बंडखोरीच्या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह आलेले. तेव्हा त्यांनी लाकुडतोड्याच्या गोष्टीसोबत आपण अनेकदा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत आलो होतो असही सांगितलं. आपण खूप कामं केली म्हणूनच हा सन्मान मिळाला असही सांगितलं.

आदित्य ठाकरेंनी देखील काल-परवा आपले मुख्यमंत्री टॉप 5 आहेत हे सांगितलं आहे.

पण खरच उद्धव ठाकरे असे यादीत आले आहेत का तर हो…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशभरातून ३ वेळेस टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं.

त्यातील पहिली वेळ म्हणजे, जून २०२० मधील रँक.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आलं आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षात म्हणजेच २०२० च्या जून महिन्यात बातमी आली की,  

उद्धव ठाकरे हे देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एक ठरले होते.

आयएएनएस-सी व्होटरने हे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात ठाकरे यांना देशातील पहिल्या पाच सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळाले होते. या सर्वेक्षणात त्यांना  ७६.५२ टक्के इतकं रेटिंग मिळालं होतं.

दुसरी वेळ, ऑगस्ट २०२० मध्ये…

ऑगस्ट २०२० मध्ये कार्वी इनसाइट्स आणि इंडिया टुडे या संस्थांमार्फत ‘मूड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे झाला होता. या सर्व्हेत कोविडच्या काळात विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची कामगिरी याबाबत मतदान केलेलं.

यात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या पसंतीचे मुख्यमंत्री बनले, तर दुसऱ्या नंबरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, तिसऱ्या नंबरला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या नंबरला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पाचव्या नंबरवर उद्धव ठाकरे यांना पसंती दिली होती.

या बाबतचा अहवाल पाहिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता गेल्या सर्व्हेच्या तुलनेत वाढल्याचं पाहायला मिळालं.

तिसरी वेळ, जुलै २०२१ मधील सर्व्हे.

जुलै २०२१ मध्ये प्रश्नम या संस्थेनं सर्व्हे केलेला. यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले होते. 

या सर्व्हेच्या अहवालानुसार, देशातल्या १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिली पसंती मिळाली होती. प्रश्नम या संस्थेनं सर्व्हेसाठी देशातील १३ राज्ये निवडली होती. त्यात महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता.

सर्व्हेत मतदान केलेल्या ४९ टक्के मतदारांनी ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे रेटिंग दिले होते. त्यांच्यानंतर दुसऱ्या पसंतीचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान आणि तिसऱ्या पसंतीचे मुख्यमंत्री राजस्थानचे अशोक गेहलोत ठरले होते.

 

चौथी वेळ, जानेवारी २०२२ मध्ये

२०२२ च्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आलेला. 

इंडिया टुडे आणि सी व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे केला होता. यात जनतेला देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? अशा प्रश्न केल्यानंतरचा अहवाल समोर आला अन यात प्रथम क्रमांक ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पटकावला होता.

तर क्र. २ ला ममता बॅनर्जी, क्र.३ ला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि क्रमांक ४ वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थान होते. 

त्यानंतर अनुक्रमे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा समावेश होता. 

थोडक्यात आदित्य ठाकरे म्हणाले तसं, सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे चार वेळा टॉप रँकिंगमध्ये राहिले आहेत. विशेष म्हणजे, आपल्या मणक्याची शस्त्रक्रिया आणि कोविड दरम्यानही त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे, हे विशेष.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.