सलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.

सलीम – जावेद या जोडीने बॉलिवूडचं एक पर्व गाजवलं आहे. दोघांनी लिहिलेले शोले, दीवार, जंजीर सारखे सिनेमे हे पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पुढेही करत राहतील. काळ पुढे गेला की काही सिनेमे नव्या जमान्यात पाहणं हे काहीसं कालबाह्य वाटतं. परंतु सलीम – जावेद यांचे सिनेमे आजही जर थेटर मध्ये प्रदर्शित झाले, तर ते प्रेक्षकांच्या हमखास टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करतील.

सलीम – जावेद यांच्या लेखणीतून साकार झालेला आणखी एक वेगळा सिनेमा म्हणजे त्रिशूल. ही कहाणी त्रिशूल सिनेमा कसा घडला याची.

जेव्हा एखादा लेखक सिनेमा लिहित असतो, तेव्हा खूपदा कथा चांगली कशी होईल या गोष्टीवर त्याचा भर असतो. हीच कथा जेव्हा मोठ्या पडद्यावर साकार होते, तेव्हा लेखकाला खूप वेळेस लिखणामध्ये असणाऱ्या उणीव जाणवत असाव्यात. लिहिताना राहून गेलेल्या गोष्टी लक्षात येत असणार.

सलीम – जावेद यांच्या बाबतीत सुद्धा त्रिशूल च्या वेळेस अशीच गोष्ट घडली.

ही गोष्ट १९७८ ची. संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शशी कपूर या तीन महान अभिनेत्यांना घेऊन यश चोप्रा यांनी ‘त्रिशूल’ सिनेमा बनवायला घेतला. सलीम – जावेद यांनी सिनेमा लिहिला होता. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं. एके दिवशी त्रिशूल चे निर्माते गुलशन राय, दिग्दर्शक यश चोप्रा आणि सलीम – जावेद हे चौघे सिनेमा पाहायला बसले. सिनेमा पाहून पूर्ण झाला. थोड्याच दिवसात सिनेमा रिलीज करायचा हे ठरलं. सलीम – जावेद मात्र शांत होते.

सिनेमाचा रफ कट पाहून झाल्यावर निर्माते गुलशन राय गप्पा मारायला लागले.

“तुम्हाला सांगतो, मागच्या आठवड्यात एक सिनेमा रिलीज झाला होता. मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला.”

इतका वेळ शांत असलेले जावेद अख्तर बोलले,

“गुलशन साब तुम्ही अजून फ्लॉप बघितला आहे कुठे? जेव्हा त्रिशूल रिलीज होईल तेव्हा तो सर्वात मोठा फ्लॉप होईल.”

सिनेमाचे लेखक अशी नकारात्मक गोष्ट बोलायला लागल्यावर गुलशन राय यांना विचित्र वाटलं. त्यांनी यामागचं कारण विचारलं.

“सिनेमाच्या सेकंद हाफ मध्ये फार गडबड झाली आहे.” असं सलीम – जावेद यांनी गुलशन राय यांना सांगितलं. तुम्हा लेखकांना असं वाटत असेल तर यावर काहीतरी उपाय करायला हवा, असं गुलशन साब म्हणाले. तेव्हा जावेद अख्तर गंमतीत म्हणाले,

“माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही त्रिशूल रिलीज करू नका.”

सर्वांना चिंता वाटली. परंतु सलीम – जावेद यांनी पुन्हा एकदा पटकथेवर काम केलं.

सिनेमाचा इंटरवल नंतरचा गडबडलेला भाग पुनश्च व्यवस्थित लिहून काढला. आणि नंतर यश चोप्रा यांनी सिनेमाचं आणखी १५ दिवसाचं शूटिंग ठेवलं. तेव्हा कुठे फ्लॉप च्या मार्गावर वाटत असलेला ‘त्रिशूल’ सलीम – जावेद यांच्या अपेक्षांवर खरा उतरला. त्रिशूल रिलीज झाला.

दोघांच्या लेखणीची जादूची कांडी फिरली आणि फ्लॉप होईल असे वाटणारा त्रिशूल सुपरहिट झाला.

सलीम – जावेद या लेखक जोडीच्या कारकिर्दीमधला त्रिशूल हा एकमेव सिनेमा आहे, जो या दोघांनी पुन्हा लिहिला. या जोडीचं विशेष कौतुक यासाठी, दोघांनी अगदी परखडपणे स्वत:च्या कामाची समीक्षा केली. आणि काम नीट होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. यामध्ये त्यांना दिग्दर्शक, कलाकार यांचं सुद्धा मोलाचं योगदान लाभलं. शेवटपर्यंत लिहिलेलं काम हे चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारे सलीम – जावेद आणि त्यांचे सिनेमे म्हणूनच ग्रेट आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.