“समय बडा बलवान होता हैं..” जोशींवर आलेली वेळ आज उद्धव ठाकरेंवर आली.

“उद्या जर का तुम्हाला मीही नको असेन तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे.”.. 

हे वाक्य होतं उद्धव ठाकरेंच..

तारिख होती 13 ऑक्टोंबर 2013 आणि स्थळ होतं शिवाजी पार्क दादर. उद्धव ठाकरे तेव्हा घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांकडे पहात म्हणाले होते उद्या जर का तुम्हाला मीही नको असेन तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे.

उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं त्यामागे खूप मोठ्ठं राजकारण होतं. काही पडद्यामागं शिजलं होतं तर काही उघड उघड पण वेळेची ताकद काय असते हे समजून घेण्यासाठी हा किस्सा समजून घ्यायला हवा.. 

शिवसेना तेव्हा सत्तेत नव्हती. बाळासाहेबांच निधन झालं होतं. शिवसेना आत्ता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात होती. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस लागत होता. जुन्याजाणत्यांना पक्षात स्थान देताना गटतट पाहिले जात होते. बाळासाहेबांची निष्ठा किंवा शिवसेनेची निष्ठा याहून महत्वाचा फॅक्टर ठरत होता तो उद्धव ठाकरेंची निष्ठा.. 

पण याच काळात मनोहर जोशींनी उघडपणे उद्धव ठाकरेंच्या विरोधात स्टेटमेंट देण्यास सुरवात केली. त्यांच्या नाराजीचा प्रमुख सूर होता तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच स्मारक रखडण्याचा मुद्दा. अशातच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. ही भेट जुन्याजाणत्या नेत्यांना रुचली नव्हती. मनोहर जोशींनी यावर उघड नाराजी व्यक्त करत बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा छेडला. 

ते म्हणाले,

जर बाळासाहेब असते तर त्यांना आपल्या वडिलांच्या स्मारकासाठी इतका वेळ लागला नसता.. 

ही गोष्ट उद्धव ठाकरेंना टोचणारी होती. जोशी विरुद्ध ठाकरे राजकारणात असणाऱ्यांनी उद्धव ठाकरेंचे कान भरले. इथेच ठिणगी पडली. 

जोशी सरांच्या विरोधात उट्टे काढण्यासाठी जे मैदान निवडण्यात आलं ते होतं शिवाजी पार्क आणि वेळ ठरवण्यात आली होती ती दसरा मेळाव्याची.. 

13 ऑक्टोंबर 2013 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यास सुरवात झाली. मंचावर सुभाष देसाई, दिवाकर रावते, प्रभु, अरविंद सावंत असे नेते बसले होते. या गर्दीत मनोहर जोशी कुठेच दिसत नव्हते. जोशी सर मेळाव्याला येणार की नाही याबद्दलच सांशकता होती… 

अशातच जोशी सर व्यासपीठावर आले. जोशी सरांना पाहताच शिवसैनिकांकडून जोशी सरांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरवात करण्यात आली. अगदी ठरवल्याप्रमाणे एकसुरात या घोषणा सुरू होत्या. जोशींना व्यासपीठावरून यांना खाली जाण्यासाठी सुचवण्यात आलं. जोशी सर उठले.. 

व्यासपीठावरून खाली जावू लागले. गर्दी हुर्रे करत होती, घोषणा देत होती हे सर्व उद्धव ठाकरे पाहत होते. आपल्याच पक्षाचा एक माजी मुख्यमंत्री, एक जेष्ठ नेता मंचावरून पायउतार होत असताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्याची गरज होती. पण तस झालं नाही.. जोशी व्यासपीठावरून उतरले आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उद्धव ठाकरे गर्दीकडे पाहत म्हणाले, 

“उद्या जर का तुम्हाला मीही नको असेन तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे.”..

न भुतो न भविष्यती अस एकनाथ शिंदेंच बंड आणि दसरा मेळाव्यावरून सुरू असणारे दावे पाहता आज उद्धव ठाकरे जोशींना पाहून जे म्हणाले होते ते खरोखर घडताना दिसत आहे. इथले हिशोब इथेच द्यावे लागतात म्हणूनच म्हणावं लागतं. समय बडा बलवान होता हैं…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.