बंगालचा धुरळा बसल्यावर भाजप उत्तरप्रदेश निवडणुकांच्या तयारीला लागला आहे…
देशात एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला निवडणूका असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुकांचा धुराळा खाली बसून महिनाचं उलटल्यानंतर आता कोरोना काळात आणखी ५ राज्यांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. यात उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर अशी राज्य तर आहेतच.
पण त्याशिवाय या यादीत देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशचा देखील समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार इथं नवीन वर्षाच्या सुरुवातील नियोजित वेळेत निवडणुका पार पडणार आहेत.
त्यामुळे सध्या याच उत्तरप्रदेश निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरु करण्यात आल्याचं चित्र बघायला मिळतं आहे.
मध्यंतरी देशात ५ राज्यांच्या निवडणूक सुरु असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांवर कोरोना काळात मोठं मोठ्या प्रचारसभा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील आता पुन्हा एकदा भाजपनं आपला मोर्चा तयारी करण्याकडे वळवला आहे.
आता तुम्ही म्हणालं हे आम्ही कसं म्हणतोय? कोणत्या आधारावर आम्ही हा दावा करतोय? तर भिडू मागच्या काही दिवसातील घडामोडी बघितल्यानंतर तुला देखील ही गोष्ट अगदी सहजचं लक्षात येऊ शकेल. त्यात कोणताही रॉकेट सायन्स नाही.
मग आता कोणत्या घडामोडी घडल्या आहेत मागच्या काही दिवसात? ज्या वरून आपण म्हणून शकतो कि भाजपनं निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे?
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी – दत्तात्रय होसबळे बैठक :
मागच्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांचा दिल्ली दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक बैठक पार पडली. या बंददाराआड झालेल्या चर्चेत गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, संघटना मंत्री सुनील बंसल हे देखील उपस्थिती होते.
हि बैठक भाजप आणि संघ या दोघांसाठी देखील अत्यंत महत्वाची यासाठी होती, त्याचं कारण म्हणजे याच बैठकीनंतर होसबळे यांनी आपला २६ – २७ मे रोजीचा पूर्वनियोजित मुंबई दौरा रद्द करून आपला मुक्काम चार दिवसांसाठी लखनऊला हलवला होता.
२. सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांचा लखनऊ दौरा :
सध्या उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या विरोधात जाणाऱ्या दोन प्रमुख घडामोडी घडल्या आहेत. यात प्रामुख्याने कोरोना मृतांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारची देशभरात झालेली बदनामी, आणि दुसरी घडामोड म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसलेला झटका.
याच सगळ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि त्या गोष्टींचा परिणाम नवीन वर्षात होणाऱ्या निवडणुकांवर पडू नये, म्हणून काय उपाययोजना करता येतील याची रणनीती ठरवण्यासाठी होसबळे यांनी हा दौरा केला असल्याचं सांगितलं जातं.
या दौऱ्यादरम्यान होसबळे यांनी मंत्रिमंडळातील अनेक जेष्ठ मंत्री आणि राज्यातील संघाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडून याबाबत अधिकची माहिती, यावर सल्ला आणि भविष्यासाठी मार्गदर्शन देखील केलं. याच बैठकांमध्ये उत्तरप्रदेश मंत्रिमंडळातील खांदे पालटा बद्दल देखील चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.
३. बीएल संतोष यांचा उत्तरप्रदेश दौरा :
गेल्या सोमवारी आणि मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बीएल संतोष यांनी देखील उत्तरप्रदेशचा दौरा केला. आता या दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी काय काय केलं तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांच्या कामाच्या बाबतीमधील माहिती घेतली.
यानंतर याच बैठकीत आगमी निवडणुकीच्या दृष्टीने अशा कोणत्या योजना आखता येतील ज्यामधून अधिकाधिक लोकांना आकर्षित केलं जाईल, आपल्या खात्यांमध्ये कोणते नवीन बदल करावे लागतील ज्यामुळे लोक सरकारशी जोडले जातील या सगळ्याचा आढावा घेण्यात आला. सोबतच सरकार आणि अधिकारी यांचे संबंध, समन्वय देखील बघण्यात आला.
या बैठकीत त्यांनी केलेला एक प्रश्न माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला. तो प्रश्न म्हणजे
अगर आज की तारीख में चुनाव कराए जाए तो क्या परिणाम आएंगे?
४. मोहन भागवत ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा आजपासून ३ दिवसीय दिल्ली दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यात भाजपचे अनेक पदाधिकारी, संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सरसंघचालक यांच्या नेतृत्वात पाच जून पर्यंत चालणाऱ्या या बैठकांमध्ये मोहन भागवत, सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे, पाच सहसरकार्यवाहक अनुक्रमे कृष्ण गोपाल, मनमोहन वैद्य, मुकुंद, अरुण कुमार आणि रामदत्त चक्रधर उपस्थित असणार आहेत.
सोबतच सुरेश सोनी, भैय्याजी जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या बैठकांमध्ये पश्चिम बंगाल निवडणुकीवर मंथन, आगामी उत्तर प्रदेश मधील निवडणुकांचे नियोजन याबाबत चर्चा होणार आहे. सोबतच कोरोनाची सध्याची परिस्थिती, तिसरी लाट यावर आणि संघाचे आगामी १ महिन्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन ठरणार आहे.
५. कोरोनामुळे झालेल्या डॅमेज कंट्रोलला सुरुवात :
या सगळ्यांच्या बैठकांनंतर कोरोनामुळे झालेल्या डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ सातत्यानं वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना बाधित कुटुंबांना मिळालेल्या मदतीचा आढावा घेत आहेत. मदत मिळाली नसल्यास मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गावागावांमध्ये निरीक्षण आणि सर्वेक्षण समित्या गठीत केल्या आहेत. गावात सरपंच आणि सर्वेक्षण समित्यांकडे जबाबदारी देण्यात येत आहे. कोरोना टेस्टिंग वाढवण्यात आल्या असून आतापर्यंत तब्बल ५ कोटी टेस्टिंगचा टप्पा पूर्ण केला आहे. सोबतच कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्स यांच्या बाबत देखील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळेच या सगळ्यावरून आपल्याला म्हणता येऊ शकते कि आता नक्कीच उत्तरप्रदेश निवडणुकांची चाहूल लागली असून पुढच्या काही दिवसांमध्ये या बैठका आणि दौऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हे हि वाच भिडू.
- उत्तरप्रदेशात ऑक्सिजन मागणाऱ्या हॉस्पिटलवरच योगीजी FIR दाखल करत आहेत
- महिला व दलित अत्याचारांच्या केसेसमध्ये उत्तरप्रदेश सर्वात पुढे आहे..
- हैद्राबादचं जावुदे, अजय सिंग बिश्टचे योगी आदित्यनाथ कसे झाले ते वाचा..