मोदी अमेरिकेत इंग्लिशचा कोर्स करायला आलेले. अटलजी म्हणाले,” परत चला”

गोष्ट फार जुनी नाही. नव्वदच्या दशकातील असेल. वाजपेयी एकदा अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथल्या नेत्यांशी उद्योगपतींशी त्यांना भेटी घ्यायच्या होत्या. काही कॉन्फरन्सना हजेरी लावायची होती. अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांची तिथल्या प्रश्नावर चर्चा करायची होती. वाजपेयींचा कार्यक्रम भरगच्च होता.

अशातच एकदा त्यांना कोणी तरी सांगितलं की आपल्या पक्षाचा एक कार्यकर्ता नेता गेले काही दिवस झाले अमेरिकेतच आहे. कम्युनिकेशन सुधारण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स देखील लावलाय.

वाजपेयींना गंमत आणि उत्सुकता वाटली. त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली आणि त्या नेत्याला भेटायला बोलावलं.

तो नेता राष्ट्रीय स्तरावर आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या बद्दल  भाजपच्या नेत्यांमध्ये एक अफवा पसरली होती की तो जिथे जातो तिथे एक तर सत्ता तरी जाते किंवा पक्ष तरी फुटतो. खुद्द त्याच्या राज्यातून देखील त्याला दिल्लीला हाकलण्यात आलं होतं.

ग्रामीण भागातील असल्यामुळे या नेत्याचं इंग्लिश थोडंसं कच्चं होतं. भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून जम बसवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. पण हिंदी इंग्रजी बोलताना आपल्या बोली भाषेची झाक दिसून यायची. कित्येकदा न्यूज चॅनेलच्या डिबेटमध्ये त्यांना इतर प्रवक्ते वरचढ ठरायचे. फक्त इंग्रजीचा प्रश्न असल्यामुळे त्यांना न्यूज अँकर परत देखील पाठवून द्यायचे.

वारंवार मिळत असलेल्या अपयशाने निराश होऊन हा नेता अमेरिकेला नवीन शिकण्यासाठी आला होता. सगळा खर्च भारतीय जनता पक्षानेच केला होता पण असं म्हणतात कि एकप्रकारे त्यांना दिलेली हि शिक्षाच होती. 

अमेरिकन भेटी दौऱ्यात हा नेता वाजपेयींना भेटायला आला. भेटताच त्यांच्या पायाशी डोकं ठेवलं. अटलजींनी त्यांना आप यहां कैसे? हा प्रश्न विचारला.

तो नेता म्हणाला,

अभी यही हूं. कुछ नया सीख-पढ़ रहा हूं.

यावर वाजपेयी म्हणाले,

अरे नहीं. चलिए-चलिए वापस चलिए. आपकी वहां जरूरत है अभी.

वाजपेयींनी आदेश दिला आणि या नेत्याला भारतात परतावं लागलं. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेचं काम जोरात सुरु केलं. 

पुढे काही दिवसांनी या दोन्ही नेत्यांची पुन्हा भेट झाली. काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांचं अपघाती निधन झालं होतं.  त्यावेळी त्यांच्यासोबत काही पत्रकार देखील होते. यातील एका टीव्ही पत्रकाराच्या अंत्यसंस्कारावेळी तो भाजप नेता देखील हजर होता. अचानक त्याला वाजपेयींचा फोन आला. त्यांनी त्या नेत्याला तातडीने पंतप्रधान निवास येथे भेटायला बोलावून घेतलं.

नेत्याला आश्चर्य वाटलं.  तो अटलजींना भेटायला गेला तर वाजपेयी थोड्या घुश्श्यात त्यांना म्हणाले,

“इथे दिल्लीत पंजाबी जेवण खाऊन खाऊन जाड झाला आहेस. जराही वेळ न दवडता इथून जा.”

नेत्याने विचारलं कुठे जाऊ? वाजपेयीनी एका वाक्यात उत्तर दिलं,

“गुजरात. तुला तिथला मुख्यमंत्री व्हायचं आहे.”

एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल, तो नेता म्हणजे भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा किस्सा सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवला आहे. ते आजही गंमतीने म्हणतात,

“कहा जा सकता है कि अगर वाजपेयी वहां अमरीका में मोदीजी को वापस न बुलाते, तो आज शायद वह पीएम न होते. न्यूयॉर्क के मेयर भले ही बन जाते. “

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.