मुंबईत दहशत पसरवणारी माकडवाला गॅंग विजय साळस्करांनी एका रात्रीत संपवली होती

मुंबईत ८०-९० च्या दशकात गुन्हेगारीने आणि गॅंगवॉरने कळस गाठला होता. गुन्हेगारही इतके क्रूर होते कि खुद्द पोलिसही त्यांच्यावर कारवाई करायला धजावत नसे. कारवाई केली तर जीव जाण्याचाच धोका जास्त असल्याने या मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांच्या दहशतीखाली पोलीस वावरत असे.

या गुन्हेगारी क्षेत्रातली त्यावेळची सगळ्यात भयंकर आणि क्रूर समजली जाणारी गॅंग म्हणजे माकडवाला गॅंग. सुभाष कुंचीकुर्वे आणि गणेश कुंचीकुर्वे या दोन भावांनी माकडवाला गॅंग बनवली आणि तिची दहशत सामान्य लोकं तर सोडाच पण पोलिसांच्या मनातही अशी बसवली कि कुणी त्यांच्या नादी लागत नसे.

पण सब इन्स्पेक्टर विजय साळसकर यांनी एका रात्रीतच हि गॅंग कायमची मुंबईतून संपवली आणि मुंबईने सुटकेचा निश्वास टाकला. पण नक्की माकडवाला गॅंग आणि साळसकर यांच्यात कशी चकमक झाली , माकडवाला गॅंग कशी तयार झाली हे बघू.

दक्षिण-मध्य मुंबईतील धारावी परिसरात कुंचीकुर्वे हा समाज झाडू- केरसुण्या बनवण्याचा व्यवसाय आणि माकडांचे खेळ करून दाखवत असे.  हा समाज शांत आणि साधा स्वभाव असलेला म्हणून ओळखला जायचा पण या समाजातील दोन भाऊ पुढे जाऊन इतकी भयानक दहशत करतील असं कुणालाही वाटलं नसेल.

सुभाष कुंचीकुर्वे हा मुंबईतील सगळ्यात आक्रमक आणि क्रूर मारेकऱ्यांपैकी एक होता. सुभाषच्या हातात झाडू नव्हे तर एके-५६ होती. त्यावेळी मुंबईला ऑटोमॅटिक बंदुकांची माहीतीदेखील नव्हती. मुंबई पोलिसचं त्यावेळी १९४० च्या जुन्यापुराण्या रायफल वापरत असे.

दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अनिल परबच्या टोळीत सुभाष माकडवाला होता. सुभाषच्या नावावर २५ खून जमा होते. त्यातले बहुतेक खून त्याने निर्दयपणे आणि उगाच गोळ्यांची बरसात करून केले होते. दिवसाढवळ्या मोठमोठ्या लोकांचे खून पडू लागल्याने मुंबई पोलीसांच्या अंगावर भीतीने शहारे येत असत.

पावसाळ्यात लोक छत्री घेऊन हिंडतात तसा सुभाष हातात एके-५६ घेऊन फिरायचा. बारमध्ये गेल्यावर बंदूक टेबलावर ठेवायचा. त्याच्या साथीदारांना त्याची आणि त्याच्या बंदुकीची दहशत वाटायची. अगदी किरकोळ कारणावरूनही तो बेधुंद गोळीबार करायचा.

मुंबईत व्यावसायिकांमध्ये माकडवाला बंधूंची जबर दहशत निर्माण झाली होती. बांधकाम व्यावसायिक, हॉटेलमालक, शेअर ब्रोकर्स, चित्रपट निर्माते, वितरक आणि अभिनेत्यांना खंडणीसाठी धमक्या हि गॅंग देत असे. सुभाष हा सगळ्यात जास्त त्रासदायक होता.

एक पाकिस्तानी गायिका सुभाषच्या नजरेत भरली. त्याने त्या अभिनेत्रीचा बराच काळ उपभोग घेतला. तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तो तिला गाणं म्हणायला लावायचा. तिला त्याची इतकी भीती वाटत होती कि सुभाषविरुद्ध पोलिसात तक्रार करायचीसुद्धा तिची हिंमत झाली नाही.

पोलीस हतबल होते. माकडवाला बंधू बेलगाम झाले होते, सुभाष तर  उघडपणे म्हणायचा ‘ विशेष कृती पथकाखेरीज कुणीही आम्हाला अटक करू शकणार नाही. गुन्हे शाखेच्या बांद्रा पथकाला सुभाष आणि त्याचे साथीदार घाटकोपरमधल्या अमृत नगर भागातील एका फ्लॅटमधून बाहेर पडणार आहेत अशी माहिती मिळाली आणि मग पोलिसांची कारवाई सुरु झाली.

इन्स्पेक्टर शंकर कांबळे यांना आयुक्त हसन गफूर यांनी आदेश दिला कि माकडवालांना पकडा- जिवंत किंवा मृत. सहा मे १९९३. शंकर कांबळे यांनी धाडसी अधिकाऱ्यांना सोबत घेतले. त्यात उपनिरीक्षक विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा हे धडाडीचे अधिकारी होते. साळसकर गाडीचे ड्राइव्हर म्हणून बसले .९ मिमी कार्बाईन मांडीवर ठेवून शर्मा त्यांच्या शेजारी बसले.

पोलिसांची गाडी त्या इमारतीजवळ पोहचली तेव्हा निळी मारुती तिथून नुकतीच बाहेर पडत होती. साळस्करांनी सुभाषला ओळखले. त्याच्या गाडीसमोर गाडी आडवी घालून त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मारुतीच्या ड्राइव्हरने जाऊ देण्याचा इशारा दिवा दाखवून केला मात्र साळस्करांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

मारुतीच्या ड्राइव्हरने गाडी मागे वळवून सुसाट वेगाने दुसऱ्या दिशेला चालवायला सुरवात केली. साळस्करांनी आपलं गाडी चालवण्याचं कौशल्य पणाला लावले. ऍक्सलरेटरवर ते अक्षरशः उभे राहून गाडी वेगात चालवत होते. गाडीला गाडी घासत होती, धडकत होती, दोन गाड्यांमध्ये शर्यत सुरु झाली. रस्त्यांवर दिवे नव्हते.

साळस्करांनी शर्मा यांना बाजूच्या खिडकीतून डोके बाहेर न काढता गोळ्या झाडायला सांगितल्या. अचानक सुभाषची मारुती गाडी झाडाला जाऊन आदळली. सुभाषने त्याच्या एके-५६ मधून गोळीबार सुरु केला. त्या गोळ्यांनी पोलिसांच्या गाडीच्या काचांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

शर्मानी चपळाईने हालचाल करून कार्बाईन मधून गोळ्यांचा पाऊस पाडायला सुरवात केली. रात्रीच्या शांततेत गोळीबाराचा आवाज निनादत होता. साळसकर आणि कांबळे यांनी .३८ पिस्तुलं काढून गुंडांवर गोळीबार सुरु केला. थोड्या वेळात समोरच्या गाडीतून गोळीबार यायचा थांबला. सगळं शांत झालं.

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माकडवाला गॅंग एका रात्रीत संपवली. या चकमकीत सुभाष माकडवालाच्या गाडीच्या डिकीत २ एके-५६ , असंख्य काडतुसं आणि बॉम्ब सापडले. मुंबईतील व्यापाऱ्यांनी फटाके उडवून गोडधोड करून हा आनंद साजरा केला.

विजय साळसकर यांनी त्या रात्री मोठी कामगिरी बजावली. गुन्हे शाखेवर कौतुकांचा वर्षाव झाला आणि मुंबईतील एक खतरनाक टोळी कायमची संपवली गेली.

संदर्भ ; भायखळा ते बँकॉक – हुसेन झैदी 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.