लोकेश कनागराजनं काय केलं? तर सुपरस्टार कमल हसनला पुन्हा एकदा ‘सुपरस्टार’ केलं

चहाच्या टपरीवर दोन पोरं चर्चा करत होती. एकजण म्हणला, ‘ब्रह्मास्त्रचा ट्रेलर पाहिला काय? आलिया काय दिसती, कसलेच व्हीएफक्स केलेत… नाद नाही. रणबीर, बच्चन, आलिया आणि लोकं तर म्हणतात शाहरुख पण आहे. बॉलिवूड परत हवा करतंय बघ.’ समोरचं म्हणलं, ‘ब्रह्मास्त्रचा ट्रेलर सोड. तू विक्रम पाहिला का ?’ पहिला गडी जसा नाय म्हणला, तसं या विक्रमवाल्याला चेव चढला. यानं कमल हसनच्या स्टारडमपासून सुरुवात केली, मग विजय सेतुपतीच्या हाणामारीवरुन, फहाद फाझिलचे डोळे आले आणि मुद्दा येऊन थांबला लोकेश कनागराजवर.

कधी काळी साऊथचे पिक्चर बघणाऱ्यांची मापं निघताना आम्ही याच डोळ्यांनी पाहिलं होतं, त्यात प्रेमम फॅन क्लबमध्ये येत असल्यानं हे सोसलंही होतं. हा समोरचा टॉम क्रूझ बॉलिवूडच्या फॅनक्लबची मापं काढतोय म्हणल्यावर आम्ही सुखावलो. ज्याच्या जीवावर हा सोहळा रंगला होता, तो लोकेश कनागराज किती वाढीव आहे हे नंतर बघू, पण आधी बोलू विक्रमबद्दल. 

हा तमिळ पिक्चर ३ जूनला रिलीझ झाला. स्टारकास्ट कोण ? तर स्वतः कमल हसन, विजय सेतुपती आणि फहाद फाझिल. पिक्चर आहे क्राईम-थ्रिलर. त्यामुळं जितकी खतरनाक स्टोरीलाईन, तितकीच खतरनाक मारामारीही. विक्रमनं नुकताच ३०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केलाय.

बाहुबली-२ चे रेकॉर्ड्स या पिक्चरनं मोडलेत, पण याहीपेक्षा कुठली कमाई मोठी ठरली असेल, तर सुपरस्टार कमल हसनचं पुन्हा सुपरस्टार होणं.

२०२० मध्ये एक बातमी आलेली, की कमल हसननं एका बँकेकडून २५ कोटींचं कर्ज घेतलं. एवढा मोठा सुपरस्टार कर्ज घेतो हाच कित्येकांसाठी धक्का होता. त्यानंतर राजकीय आघाडीवर यशस्वी न ठरलेल्या कमल हसनला आर्थिक आघाडीवरही बॅकफूटला जावं लागलंय हे समजलं.

त्याचा बॉक्स ऑफिसवर आलेला शेवटचा पिक्चर होता विश्वरुपम टू, दुर्दैवानं तो खुंखार आपटला.

बॅडपॅच मधून बाहेर येण्याची इच्छा असणाऱ्या कुणालाही एक तगडा चान्स हवा असतो. कमल हसनला तो मिळाला होता, विक्रमच्या रुपानं. १९८६ मध्ये याच नावानं त्याचा एक पिक्चर आला होता. पण आत्ताचा विक्रम हा काही त्याचा सिक्वेल नाही.

त्यात विक्रमचा लेखक दिग्दर्शक लोकेश कनागराजचा हा चौथाच पिक्चर. पण कमल हसननं रिस्क घेतली, त्यानं आपल्याच प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत हा पिक्चर रिलीझ करायचं ठरवलं. 

रम्मी लागली आणि विक्रम हा ६० वर्षांच्या करिअरमधला कमल हसनचा सर्वाधिक कमाई करणारा पिक्चर ठरला.

या यशानंतर कमल हसन म्हणला, ‘मी सगळ्यात आधी माझं कर्ज फेडणार आहे. कुटुंबाला आणि मित्रांना काय हवंय ते देणारे.’

कर्जाचं माहीत नाही, पण आपल्या मित्रांना गिफ्ट देण्यात कमल हसननं काहीच कसूर सोडलेली नाही. पिक्चरचा डायरेक्टर लोकेश कनागराजला त्यानं लेक्सस गाडी दिली, अभिनेता सूर्याला रोलेक्स दिलं आणि विक्रमसाठी काम करणाऱ्या १३ असिस्टंट डायरेक्टर्सला नवीकोरी बाईक दिली. थोडक्यात कमल हसन पुन्हा आपल्या मूळ रूपात आला, सुपरस्टार तेही लार्जर दॅन लाईफ.

हा एवढा मोठा चेंज घडलाय, तो विक्रमचा डायरेक्टर लोकेश कनागराजमुळं. एकतर तीन मोठ्या सुपरस्टारला घेऊन तो मैदानात उतरला आणि त्यानं नाद केला. 

लोकेश कनागराज या नावानं गेल्या सहा वर्षांत फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त यश पाहिलंय. 

लोकेश मूळचा तमिळनाडूचा. गुणी पोरांसारखं एमबीए पूर्ण करुन गडी बँकेत कामाला लागला होता. पण डोक्यात शिरलेलं पिक्चरचं खूळ मनापासून रमू देत नव्हतं. त्यानं एक कॉर्पोरेट शॉर्ट फिल्म बनवली आणि दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराजला ती लय आवडली. त्यानं लोकेशला प्रोत्साहन दिलं. २०१७ मध्ये लोकेशनं लिहिलेला आणि डायरेक्ट केलेला मानागरम आला आणि हिट झाला. त्यानं पुढचा धमाका केला २०१९ मध्ये कैथी बनवून. हा सुद्धा हिट ठरला.

२०२१ मध्ये मात्र लोकेश कनागराज हे नाव साऊथपासून पार बॉलिवूडपर्यंत कडकमध्ये गाजलं. हा पिक्चर होता, मास्टर. थलपती विजय आणि विजय सेतुपतीला घेऊन केलेल्या या पिक्चरमधल्या ॲक्शननं लोकांना वेड लावलं. मास्टरमध्ये मसाला होता, टिपिकल साऊथ स्टाईल हाणामारी होती आणि सामाजिक संदेशही. लोकेशनं दोन्ही विजयला घेऊन केलेला हा पॅटर्न गाजला.

मात्र विक्रम लिहीणं आणि डायरेक्ट करणं हा मोठा विषय होता. कारण तीन सुपरस्टार्स, तिघांची बलस्थानं वेगळी, तिघांचं स्टारडम वेगळ्या लेव्हलला आणि त्यात कमल हसनचा कदाचित शेवटचा चान्स, ही एवढी सगळी आव्हानं समोर असताना लोकेशनं मैदान मारलं, विक्रम सुपरहिट ठरला आणि कमल हसन पुन्हा एकदा सुपरस्टार.

पण गोष्ट इथंच संपली नाही. लोकेश कनागराज लांबी रेस का घोडाय, हे सिद्ध करणारी गोष्ट म्हणजे त्याचं लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स. आपण मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स, डीसी युनिव्हर्स हे ऐकलेलं असतंय, बॉलिवूडमध्येही प्रियदर्शन आणि रोहित शेट्टी आहेत, पण लोकेशचा विषय वाढीव ए. 

सध्या गाजत असलेला विक्रममधलं कमल हसनचं पात्र त्याच्याच १९८६ मधल्या विक्रम पिक्चरमधून घेतलंय. दुसऱ्या बाजूला कैथीमध्ये दाखवलेला पोलिस विक्रममध्येही दाखवलाय. विक्रमच्या एन्डला सिक्वेल येणार हे सांगितलंय आणि कैथीच्या एन्डलाही.

दोन्ही पिक्चरची स्टोरी वेगळी असली, तरी ती माफियांच्या भोवतीच फिरते. त्यामुळं दोन्हीच्या सिक्वेलमध्ये नेमकं काय असेल? आणि या दोन स्टोऱ्या एकत्र कशा येतील? लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स कसं असेल? हे लोकेशलाच माहिती.

साऊथ वाल्यांनी बॉलिवूडचं मार्केट खाल्लंय, हे आता जगजाहीर झालंय. बॉलिवूड पुन्हा कमबॅक करेल की नाही माहित नाही, पण स्वतःचं सिनेमॅटिक युनिव्हर्स काढत साऊथवाले मोठा जॅक खेळतायत. नाहीतरी केजीएफचा रॉकी म्हणालाच आहे, पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल! लोकेशचं काम आणि साऊथचं यश पाहिलं की हेच खरं वाटतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.