जगभरातील हिंदू पिंडदान करतात, त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी या बिहार ला गेल्या होत्या. हा त्यांचा खासगी दौरा होता.  त्यांनी आईवडीलांसोबत गयाच्या फाल्गु नदीच्या किनाऱ्यावरील देवघाटावर पितरांसाठी पिंडदान आणि तर्पण केलं.

तसेच घाटावरील विष्णुपद मंदिरात पूजा अर्चना केली. मुळात निर्मला सीतारामन दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या आहेत. परंतु त्यांनी पितरांचं पिंडदान बिहारच्या विष्णुपद मंदिरात केलंय.

मात्र इतक्या दूरवरून इथे पिंडदान करण्यासाठी आलेल्या निर्मला सीतारामन या एकट्याच नाहीत, तर जगभरातील हिंदू पिंडदानासाठी या मंदिरात येतात. 

मॉरिशस, सूरिनाम, फिजी, यूके, अमेरिका, श्रीलंका, जापान, कोरिया अशा वेगवगेळ्या देशांमध्ये वसलेले भारतीय वंशाचे हिंदू पिंडदान करण्यासाठी गयाच्या या मंदिरात येतात. अलीकडेच इस्कॉनच्या माध्यमातून हिंदू धर्म स्विकारणाऱ्या काही रशियन महिला सुद्धा पितरांचं पिंडदान करण्यासाठी या मंदिरात आल्या होत्या. 

पण लोकं पिंडदान करण्यासाठी काशी, नाशिक, रामेश्वरम यांसारख्या प्रसिद्ध शिवमंदिराच्या जागी बिहारच्या या विष्णू मंदिरात का येतात?

तर यामागचं कारण आहे या मंदिराची आख्यायिका…

आख्यायिकेनुसार भस्मासुराचा भाऊ गयासुराने ब्रह्मदेवाची घोर तपस्या केली. गयासुराच्या तपस्येवर प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला दर्शन दिलं आणि इच्छेनुसार वरदान मागायला सांगितलं. 

तेव्हा गयासुराने ईश्वराकडे एक आगळावेगळा वरदान मागितला. 

“माझं शरीर सुद्धा देवी देवतांप्रमाणे पवित्र व्हावं. जो कुणी मला बघेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गची प्राप्ती होईल.”

ब्रह्मदेवाने सुद्धा गयासुराच्या इच्छेनुसार त्याला वरदान दिलं आणि ते अंतर्धान झाले. 

मात्र गयासुराच्या या वरदानामुळे प्रचंड दुष्परिणाम दिसायला लागले. 

गयासुराच्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होतात त्यामुळे लोकांनी आणि असुरांनी बेसुमार पाप करायला सुरुवात केली. यामुळे पृथ्वीवर पाप करणाऱ्यांची संख्या वाढत होती. दिन दुबळ्यांवर अत्याचार वाढत होते. तसेच पाप मुक्त झाल्यामुळे स्वर्गप्राप्ती होणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढायला लागली. 

तेव्हा देवी देवतांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि सगळी आपबिती त्यांना सांगितली. तेव्हा देवी देवतांच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णू गयासुराचा वाढ करायला पृथ्वीवर अवतरले. त्यांनी ऋषी मरीची यांची आई धर्मशील यांच्याकडून एक शिळा घेतली. ती शिळा गयासुराच्या हृदयावर ठेवली आणि स्वतःच्या पायाने हृदयावर दाब दिला. 

विष्णूंच्या भारामुळे गयासुराचं शरीर जमिनीत गाडलं जाऊ लागलं होतं, तेव्हा त्याने भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली की माझ्या मृत्यूनंतर सुद्धा माझं शरीर लोकांना मुक्ती देणारंच राहावं. त्यावर विष्णूंनी गयासुराला वरदान दिला. तेव्हापासून लोक पितरांच्या स्मरणार्थ गया येथे पिंडदान करतात आणि गयासुराला नैवेद्य दाखवतात. 

विष्णूंनी गयासुराला मारण्यासाठी ज्या शिळेवर पाय ठेवलं होतं तीच शिळा या मंदिरात आहे. विष्णूंनी शिळेवर पाय ठेवल्यामुळे त्यांच्या पायाची खून या शिळेवर उमटली. यावरूनच मंदिराला विष्णुपद मंदिर असं म्हणतात.

या मंदिराचं महत्व अनेक हिंदू पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. 

महाभारतानुसार या मंदिरात दर्शन केल्याने पाप नष्ट होतात. पितरांचं पिंडदान आणि तर्पण केल्यास पितरांना मोक्ष मिळतो असं सांगितलं जातं. रामायण ग्रंथानुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर राम आणि सीतेने राजा दशरथाचं पिंडदान आणि तर्पण याच ठिकाणी केलं होतं. त्यांनी दशरथाचं पिंडदान करतांना फाल्गु नदीच्या वाळूपासून पिंड तयार केलं होतं त्यामुळे आजही इथे पिंडदान करतांना वाळूचं पिंड तयार करण्याची परंपरा पाळली जाते.

रामायण आणि महाभारत पुराणांसोबतच विष्णू पुराण आणि वायू पुराणात सुद्धा गया येथील विष्णुपद मंदिराचं महत्व सांगितलेलं आहे. दरवर्षी पितृपक्षात इथे मोठी यात्रा भरते आणि लोकं पितरांचं पिंडदान करण्यासाठी इथे येतात.

सतयुगापासून पूजा केल्या जाणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. 

हे मंदिर प्राचीन असल्यामुळे काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. रामानुज, माधवाचार्य, चैतन्य महाप्रभु, श्री रामकृष्ण इत्यादी महान संतांनी वास्तव्य केलेल्या या मंदिराची पडझड झालेली पाहून, अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अतरी येथील दगडाच्या खाणीतून शाळीग्राम दगड आणले आणि या भव्य मंदिराची उभारणी केली. 

१०० फूट उंच असलेल्या या मंदिराच्या सभागृहात एकूण ४४ स्तंभ आहेत. गर्भगृगात ४० सेंटीमीटर लांब असलेलं विष्णूचरण स्थापन करण्यात आलेलं आहे. विष्णूचरणाच्या साबोवताल ५० किलो चांदीचं अष्टपाहालं बनवण्यात आलं आहे तर गर्भगृहाच्या छताला लागून ५० किलो चांदीची छत्री बसवली आहे. मंदिरावर ५० किलो सोन्याचा कळस आणि ५० किलो सोन्याचा ध्वज आहे.   

पौराणिक आख्यायिका असलेल्या या मंदिराला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे नवं स्वरूप मिळालं आणि मराठी माणसाची नाळ या मंदिराशी जुळली गेली. दरवर्षी जगभरातील अनेक हिंदू परंपरेनुसार या मंदिरात पितरांसाठी पिंडदान आणि तर्पण करतात. त्यामुळेच निर्मला सीतारामन त्यांच्या आईवडिलांना घेऊन या मंदिरात आल्या आणि पितरांसाठी पिंडदान केलं. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.