विठ्ठल उमपांचा खणखणीत आवाज ऐकून मन्ना डेसुद्धा फॅन झाले होते….

महाराष्ट्राचा बुलंद खणखणीत आवाज म्हणून अनेक गायक ओळखले जातात त्यापैकी मुख्य म्हणजे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, लोकशाहीर विठ्ठल उमप, लोकगायक आनंद शिंदे, शाहीर नंदेश उमप ही मंडळी ओळखली जातात. हे सगळे आवाज म्हणजे महाराष्ट्राच्या गावागावात परिचित आहेत एवढंच नाही तर हे आवाज लोकांना आपलेसे वाटतात. याच गायकांपैकी एक म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकल्यावर बॉलिवूडचे दिग्गज गायक मन्ना डे सुद्धा विठ्ठल उमप यांचे फॅन झाले होते त्याबद्दलचा हा किस्सा.

विठ्ठल उमप यांचा आवाज तरुणपणात अगदीच पहाडी होता. त्यांच्या तरुणपणात अनेक किस्से झाले त्यापैकीच हा किस्सा. 1963 चं साल होतं. तेव्हा गायनाकडे विठ्ठल उमप व्यावसायिकरित्या वळले नव्हते. त्या काळात विठ्ठल उमप पोस्टात कामाला होते. पोस्टात दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्या मंडळींना नामवंत सेलिब्रिटी लोकांकडून बक्षीस मिळायचं आणि सत्कार केला जायचा. पण सत्कार आणि बक्षीस मिळण्याची वेळ येईपर्यंत आलेल्या मोठ्या नामवंत सेलिब्रिटी पुढे काहीतरी कला सादर करून दाखवावी लागायची.

1963 सालच्या कार्यक्रमाची ही गोष्ट. त्यावर्षी कार्यक्रम हा धोबी तलावाच्या बिर्ला मातोश्री रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. मोठा कार्यक्रम म्हणून सेलिब्रिटी सुद्धा तितकाच मोठा हवा होता म्हणून त्यावर्षी बॉलिवूडचे दिग्गज गायक मन्ना डे यांना बोलावण्यात आलं होतं. सगळ्या जमावाचं लक्ष हे मन्ना डे यांच्याकडे लागून होतं. पोस्टाच्या स्पर्धेमध्ये विठ्ठल उमप यांनी नेहमीप्रमाणे बाजी मारून पहिला क्रमांक पटकावला होता. बक्षीस घ्यायला ते गेले आणि मन्ना डे यांच्यासमोरच त्यांनी आपली कला दाखवायला सुरवात केली.

आपल्या पहाडी आवाजाने त्यांनी गाणं म्हणून दाखवलं आणि दणदणीत टाळ्या मिळवल्या. परफॉर्मन्स चांगला झाला आणि त्या दिवशी विठ्ठल उमप यांचा सुरसुद्धा त्यादिवशी जोरदार लागला होता. एक एक करून सगळ्याच कलाकारांचे परफॉर्मन्स झाले आणि बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. विठ्ठल उमप स्टेजवर गेले आणि उमप यांना बघून मन्ना डे उभे राहिले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत म्हणाले,

आप बहोत ऊंचा सूर में गाये है. हमें भी उंचा गाना पडेगा.

विठ्ठल उमप यांना मन्ना डे सारख्या मोठ्या माणसाची कौतुकाची थाप मोठा आत्मविश्वास देऊन गेली. त्यानंतर मात्र उमप यांनी मागे वळून पाहिल नाही , सिनेमा, नाटक, लोककला अशा अनेक प्रकारातून त्यांनी आपल्या आवाजाची उधळण रसिक प्रेक्षकांवर केली. आजसुद्धा विठ्ठल उमप यांचा आवाज दर्दी कानसेनांच्या काळजाचा ठाव घेतो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.