ऑफिसमध्ये आलेला तो चंदू नावाचा गुंड बघून रामगोपाल वर्मासुद्धा गांगरून गेला होता……

अगर कंपनी मेरे बिना चल सकती है ना….तो मैं भी कंपनी के बिना चल सकता हूं…२००२ साली आलेल्या कंपनी सिनेमातला हा डायलॉग.

विवेक ओबेरॉय, अजय देवगण अशा स्टारकास्टने नटलेला हा सिनेमा होता. तेव्हा सिनेमा भरपूर चालला पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विवेक ओबेरॉयच्या अभिनयाची. विवेक ओबेरॉयचा हा पहिलावहिला सिनेमा होता पण या सिनेमातला त्याचा चंद्रकांत नागरे चांगलाच भाव खाऊन गेला.

पण सुरवातीला जेव्हा विवेक ओबेरॉय रामगोपाल वर्माकडे या सिनेमासाठी गेला तेव्हा फक्त चांगला दिसतो म्हणून रामूने त्याला सिनेमातून कट केलेलं. पण तेव्हा विवेक ओबेरॉयने रामूकडे १५ दिवस मागितले आणि सांगितलं कि आपण आता १५ दिवसांनंतर भेटू. हि ती वेळ होती जेव्हा विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय हे अब्बास मस्तान यांच्या सोबत विवेकला लॉन्च करणार होते. पण विवेक ओबेरॉयने याला स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं कि जे काय हिरो बनायचं ते मी माझ्या हिंमतीवर बनेल. 

तेव्हा विवेक रामूच्या ऑफिसला गेला आणि चंदूच्या ऑडिशनचा पार्ट मला द्या म्हणून लागला. तोवर त्याने रामूला सांगितलं नव्हतं कि मी सुरेश ओबेरॉयचा मुलगा आहे. पण रामूने त्याच्या चांगल्या दिसण्याने आणि तो रोल तुला सूट होणार नाही म्हणून त्याला रिजेक्ट केलं. १५ दिवसांची मुदत विवेकने मागितली होती त्या १५ दिवसात विवेकने काय काय केलं ?

सगळ्यात आधी त्याने मुंबईत एका झोपडपट्टीत १५ दिवसांसाठी एक खोली भाड्याने घेतली. सामान्य टपोरी लोकांसारखं तो वागू लागला आणि त्यांचं निरीक्षण करू लागला. जमिनीवर झोपणे, सार्वजनिक शौचालयामध्ये जाणे. तिथल्या लोकांच्या भाषेचा लहेजा आत्मसात करणे असे सगळे उद्योग विवेक ओबेरॉयने केले. विवेक ओबेरॉयने त्याच्या मानाने भरपूर तयारी केली होती.

शेवटी तो दिवस उजाडला. विवेक ओबेरॉय राम गोपाल वर्माच्या ऑफिसला पोहचला. ऑफिसमध्ये जाण्या अगोदर त्याने थोडी माती  चेहऱ्यावर लावली. एकदम गुंडाच्या चालीत तो राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये घुसला. तेही तोंडात त्याने बिडी शिलगावलेली होती. केबिनमध्ये गेल्यावर त्याने खुर्चीत बैठक मारली आणि एकदम हिरोवाणी आपले पाय राम गोपाल वर्माच्या डेस्कवर ठेवले आणि रामूला म्हणाला ए क्या थोबडा देख रहा है…….

विवेक ओबेरॉयला अगोदर रामूने ओळखलंच नव्हतं. उलट हा कोण गुंड आपल्या केबिनमध्ये घुसलाय म्हणून तोही जरा गांगरूनच गेला होता. पण रामूला सेम असाच व्हिलन आपल्या सिनेमात हवा होता.

पुढे राम गोपाल वर्माने चंदूचा रोल विवेक ओबेरॉयला दिला कारण त्याची स्टाईल आणि बोलण्याचा लेहजा रामूला फार आवडला होता. कंपनी सिनेमा शूट झाला आणि चांगलाच हिट झाला. विवेक ओबेरॉय आपल्या पहिल्याच सिनेमात हिट झाला होता. एका दुसऱ्या सिनेमाचं शूटिंग चालू असताना ३-४ हजाराचा क्राउड विवेक ओबेरॉयकडे चंदू चंदू म्हणून झेपावला होता तेव्हा विवेक ओबेरॉयला जाणवलं कि आपण खऱ्या अर्थाने सुपरस्टार झालोय. 

यानंतर विवेक ओबेरॉयने अनेक जबरदस्त रोल केले शूटआऊट ऍट लोखंडवाला मधला माया डोळस अजूनही लोकांना विसरणं अशक्य आहे. रक्तचरित्रामधला अभिनयसुद्धा विवेक ओबेरॉय एक जबरदस्त अभिनेता असल्याची प्रचिती देतो. पण रॅम गोपाल वर्मासुद्धा घाबरून गेला होता जेव्हा चंदूच्या अवतारात त्याने विवेकला पाहिलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.