मुस्लिम धर्मातील लोक लाखोंच्या संख्येने गोळा होतात तो इज्तेमा नेमका काय असतो
अहमदनगरच्या बाराबाभळीमध्ये जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या आवारात तब्बल १०० एकर जमिनीवर मंडप तयार करण्यात आला आहे. निव्वळ मंडपच नाही तर यात तब्बल १ लाख लोकांच्या मुक्कामाची, खाण्या-पिण्याची आरोग्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या तयारीचं कारण म्हणजे बाराबाभळी मदरशाच्या आवारात दोन दिवसाच्या इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या इज्तेमामध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास १ लाख मुस्लिम धर्मियांना दिल्ली आणि पुण्यातील धर्मगुरू मार्गदर्शन करणार आहेत. काल सकाळी सुरु झालेल्या या इज्तेमाचं आज संध्याकाळी होणाऱ्या दुवानंतर समारोप होणार आहे. परंतु मुस्लिम समाजातील व्यक्ती इतक्या मोठ्या संख्येने गोळा होत असल्यामुळे साहजिक प्रश्न पडतो की हा इज्तेमा म्हणजे नेमका काय प्रकार आहे?
तर इज्तिमा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो एकत्र येणे. मुस्लिम समुदायातील अनेक लोक जेव्हा एकत्र येऊन प्रार्थना करतात त्याला इज्तिमा किंवा इज्तेमा असं म्हणतात.
इज्तेमांबद्दल सांगायचं झाल्यास याचं आयोजन तबलिगी जमातीकडून केलं जातं.
या तबलिगी जमातचा अर्थ होतो, अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे. हा समूह देवबंदी विचारांना मान्य करतो.
तबलीगी जमात ही एक धार्मिक संस्था आहे. १९२६ सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास कांधलवी यांनी ही संस्था स्थापन केली होती. तबलीगी जमातीचा पहिला जाहीर कार्यक्रम १९४१ मध्ये झाला होता. त्यावेळी अंदाजे २५ हजार लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तबलीगी जमात ही मुसलमानांची जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. त्यांचे केंद्रं १४० देशात आहेत.
सध्या अमीर मौलाना साद हे या संस्थेचे प्रमुख आहेत. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरू असतो, म्हणजेच लोक इथं येत-जात राहतात.
परंतु मोठ्या संख्येने घेण्यात येणारा इज्तेमा हा साधारणपणे २ वर्षांच्या आड घेण्यात येतो. यात भोपाळ, निजामुद्दीन, मुंबईजवळ नेरुळ, बुलंदशहर यूकेमध्ये ड्यूजबरी, बांग्लादेशात ढाका आणि पाकिस्तानात लाहोरजवळच्या रायविंडी शहरात घेण्यात येणाऱ्या मरकजला सगळ्यात जास्त गर्दी असते.
या मोठ्या शहरांच्या पाठोपाठ देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये दर दोन वर्षानंतर इज्तेमाचं आयोजन केलं जातं. यात महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर इत्यादी शहरांचा समावेश आहे.
लाखोंच्या उपस्थितीत केल्या जाणाऱ्या या इज्तेमाचा उद्देश फक्त एकच असतो तो म्हणजे धर्मप्रचार करणे.
इथे हे स्पष्ट केलं पाहिजे की, धर्मप्रचार आणि धर्मप्रसार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. धर्मप्रचार करणे म्हणजे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टी किंवा धार्मिक वचने दुसऱ्याला सांगणे होय. तर धर्मप्रसार म्हणजे दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला धर्मांतरित करणे होय.
तबलीगीच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम आहेत –
कलमा – कलमाचं वाचन करणे
सलात – दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
इल्म – इस्लामचं शिक्षण घेणे
इकराम ए मुस्लीम – मुस्लीम समुदायातील लोकांचा सन्मान करणे
इख्लास ए नियत – प्रामाणिक उद्देशाने काम करणे
दावत ओ तबलीग – इस्लामचा प्रचार करणे
या इज्तेमा मध्ये धर्मप्रचार करण्याची पद्धत ठरलेली असते.
जमातीतील आठ ते दहा लोकांचा एक गट केला जातो. नंतर कोणत्या गटाने कुठं प्रचारासाठी जावं, हे सांगितलं जातं. ठरल्याप्रमाणे हे लोक गावोगाव जातात आणि तिथं इस्लामचा प्रचार करतात. जे लोक त्यांच्यात सामील होतात त्यांना इस्लामचं महत्व सांगितलं जातं, नमाज पठाण झाल्यानंतर कुराणचं महत्व सांगितलं जातं.
यात मुस्लिमांनी भौतिक आयुष्यापेक्षा धार्मिक आयुष्य कसं जगावं याचे उपदेश केले जातात. यात इस्लामच्या मान्यता, इस्लामचे नियम, इस्लाम धर्मात विवाहसंबंधी असलेले नियम याची माहिती दिली जाते. कोणत्या गोष्टी धर्माला अनुसरून आहेत आणि कोणत्या गोष्टी इस्लामच्या विरोधी आहेत याची शिकवण लोकांना दिली जाते.
अलीकडच्या काळात इज्तेमामध्ये धार्मिक गोष्टींबरोबरच दैनंदिन आयुष्यावर देखील चर्चा केली जात आहे असं सांगितलं जातं.
इज्तेमामध्ये गोळा होणारे व्यक्ती समाजात वावरतांना आणि जगतांना त्यांना ज्या समस्या येतात त्यावर चर्चा करतात. अलीकडे लग्नात होणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी अलीकडच्या काळात इज्तेमा मध्ये सामूहिक लग्न देखील लावून दिले जात आहेत. या सामूहिक विवाहांमुळे वधूपक्षाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होत आहे असं सांगितलं जातं.
इज्तेमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी संपर्क साधला.
ते म्हणाले की,
“इज्तेमा हा एक प्रकारचा धार्मिक मेळावा असतो जो तब्लिगी जमातीचे लोक आयोजित करत असतात. या मेळाव्याचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे लोकांना इस्लामचं तत्वज्ञान सांगून त्यांना धार्मिक बनवणे. यात धर्माचे उपदेशक त्यांना कुराण, अल्लाह, मुस्लिम परंपरा यांचे उपदेश करतात. मुस्लिम धर्मातील लोक धार्मिक कर्तव्य म्हणून या इज्तेमामध्ये जात असतात.”
याबद्दल अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितलं की,
“अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे लोकांमध्ये धार्मिक आणि पारलौकिक गोष्टींबद्दलचं आकर्षण वाढतं. सध्याच्या आधुनिक युगामध्ये लोकांपुढे ज्या समस्या आहेत किंवा त्यांनी स्वतःमध्ये ज्या पद्धतीने बदल घडवायला हवा हे मुद्दे मागे पडतात. इस्लाम धर्मामध्ये महिलांबाबतचे जे जुनाट विचार आहेत त्याचा देखील प्रचार या मेळाव्यांमध्ये केला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या मेळाव्यांचे काही दोष देखील दिसून येतात,” असं शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.
तबलिगी जमात आणि लाखोच्या संख्येने भरवले जाणारे इज्तेमा अनेकदा वादात देखील सापडले आहेत.
२०२० मध्ये दिल्लीच्या निजामुद्दिनमध्ये तबलिगी जमातीकडून अशाच एका इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात देश-विदेशातील लोक सहभागी झाले होते. जमावबंदी असतांना देखील हा कार्यक्रम चालूच होता त्यामुळे तब्लिगी जमातीचे लोक कोरोना पसरवत आहेत असे आरोप देखील करण्यात आले होते.
यासोबतच डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात देखील अशाच प्रकारच्या इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बुलंदशहरात गौहत्येवरून हिंसक दंगल भडकली होती, ज्यात एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तेव्हा या प्रकरणामागे इज्तेमामधील लोकांचा हात असल्याचे आरोप करण्यात आले होते.
निव्वळ भारतातच तर नाही परदेशात देखील तबलिगी जमत आणि त्यांच्या इज्तेमा वादात सापडले आहेत.
अनेकदा वादात सापडलेल्या तबलिगी जमातीवर सौदी अरेबियात बंदी घालण्यात आली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये सौदी अरेबियाचे इस्लामिक मंत्री डॉ. अब्दुलल्लातिफ अल शेख यांनी मशिदींना आणि मौलवींना शुक्रवारच्या नमाजादरम्यान तबलिगी संघटनेत सहभागी न होण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले होते.
या गटामुळे ब्रेनवॉश होण्याचा धोका असून दहशतवादाचे हे एक प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या संघटनेटच्या प्रमुख चुका लोकांसमोर आणण्याचे निर्देश मौलवींना देण्यात आले होते. ही संघटना समाजासाठी धोकादायक असून तबलिगीसह इतर पक्षपाती गटांशी संबंध ठेवणे बेकायदेशीर आहे, हे लोकांना सांगण्याचे निर्देश देण्यात आले होते.
परंतु तबलिगी जमातीवर भारतात बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतात भोपाळ, निजामुद्दीन, बुलंदशहर, औरंगाबाद अशा शहरांमध्ये मोठ्या संख्येने भरवले जात असतात. या इज्तेमाची संख्या आणि कालावधी हे सगळं आयोजकांवर अवलंबून असतं.
हे ही वाच भिडू
- आता सौदी अरेबियाने सुद्धा तबलिगी जमातीवर बंदी घातली आहे
- PFI वर बंदी आली, पण देशात ‘या’ मुस्लिम संघटनाही बॅन करण्याची मागणी सुरु आहे…
- इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांच्या हत्येचा ‘इज्तेमा’शी संबंध आहे का..?