सुहास कांदेंचं मत कोर्टाने ग्राह्य धरलं तर राज्यसभेच्या निकालावर काय परिणाम होईल..?

राज्यसभेचा निकाल लागून चार-पाच दिवस उलटले आहेत तरी त्याचं वारं शांत होण्याची काही चिन्हं दिसत नाहीयेत. राज्यसभेच्या वादाची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा ‘यंदा निवडणूक होणार’ हे जाहीर झालं. तब्बल २४ वर्षांनी राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली. ६ जागांसाठी ७ जण उभा राहिले.

१० जूनला दिवसभर मतदानाचा धुमाकूळ सुरु होता. एक-एक मत गरजेचं असताना शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं.

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्याची मागणी भाजपने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष आमदार रवी राणा यांचं मत बाद ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. 

मात्र निवडणूक आयोगाने या पाचही जणांत केवळ सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं. त्यामुळे “माझं मत का बाद ठरवण्यात आलं?” हा प्रश्न घेऊन सुहास कांदे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज ते सुनावणीसाठी दाखल झाले. 

न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष तर लागलंच आहे. मात्र सुहास कांदे याचं मत ‘ग्राह्य’ धरण्याचा निर्णय जर न्यायालयाने दिला तर राज्यसभेच्या निवडणुक निकालावर त्याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न इथे पडतोय.

मात्र ते समजून घेण्याआधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, सुहास कांदे यांचं मत का बाद करण्यात आलं होतं? आणि त्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा जो अट्टहास सुहास यांनी केलाय, त्याचं नक्की कारण काय?

राज्यसभा निवडणुकीत मतदानावेळी काही नियम असतात ज्यांचं पालन करणं सक्तीचं असतं. त्याच नियमाचं उल्लंघन शिवसेनेचे आमदार कांदे यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असताना ती त्यांनी घातली नाही. तसंच कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 

यानंतर मतमोजणीला विलंब झाला. बरीच चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा १ वाजता सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. 

यावर कांदे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. 

“निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे, जो मला मान्य नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. म्हणून पक्षांच्या वरीष्ठांशी चर्चा करून मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.” 

असं कांदे म्हणाले होते. 

कांदे यांच्या याच याचिकेवर आज १५ जूनला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

मात्र त्यांच्या एका मताला ग्राह्य धरण्याचा निर्णय झाला तर निवडणुकीच्या निकालात काय बदल होऊ शकतो? हे बघूया…

राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं. त्यामुळे २८४ आमदारांचं मत गृहित धरण्यात आलं आणि मतमोजणीला सुरुवात झाली.

सुहास कांदे यांचं एक मत बाद झाल्याने २८४/७+१ = ४०.५८ असं मतमोजणीचं गणित झालं. म्हणजे मतांचा कोटा ४१ झाला. कोट्यानुसार पहिल्या पसंतीची ४१ मतं ज्या उमेदवाराला पडणार तो उमेदवार विजय होणार, हे निश्चित झालं.

११ जूनला पहाटे निकाल जाहीर झाला तो काहीसा असा होता…

संजय राऊत ४१, प्रफुल्ल पटेल ४३, इम्रान प्रतापगढी ४४, पियुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८ आणि धनंजय महाडिक ४१.५

निकालावरून स्पष्ट झालं की, भाजपने शिवसेनेला हरवत सहावी जागा मिळवली.

पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मतं मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. ज्यात त्यांना ४१.५ मतं मिळाली होती.

सुहास कांदे यांनी पहिल्या पसंतीचं मतदान संजय राऊत यांना केलं होतं. तर दुसरी पसंती त्यांनी कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिलं होतं. तेव्हा कांदे यांचं मत जर आता ग्राह्य धरलं तर गणित होईल… 

संजय राऊत आणि संजय पवार यांच्या मतात +१ मत. म्हणजे संजय राऊत ४२ आणि संजय पवार ३४ असं समीकरण होईल. 

याचा निकालावर काही परिणाम होऊ शकतो का? तर नाहीच. कारण तेव्हा लढत २८५ आमदारांच्या मतांची होईल, ज्यात निर्णय हाच राहील. विजयी उमेदवार सारखेच राहतील आणि संजय पवार हरलेलेच राहतील. 

मग सुहास कांदे तरीही न्यायालयाकडे का गेलेत? हा प्रश्न राहतोच. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणं आणि मालिन झालेली स्वतःची प्रतिमा परत मिळवण्यासाठी हा अट्टहास असल्याचं कांदे यांनी सांगितलं आहे. मात्र यामागे अजून एका गोष्टीचा अट्टहास आहे. तो म्हणजे…

संजय राऊत यांच्या नावावर लागलेला ‘काठावर पास’ हा ठपका मिटवणं.  

जेव्हा निकाल लागला होता तेव्हा प्रवीण दरेकर आनंदाच्या भरात पळत आले होते आणि चंद्रकांत पाटलांसहित उभ्या असलेल्या भाजप नेत्यांना सांगत होते…

“आपला विजय झालाय, धनंजय महाडिक यांचा विजय झालाय. सहावी जागा मिळाली आहे. मुख्य म्हणजे महाडिकांना संजय राऊतांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत आणि संजय राऊत यांना एक मत जर कमी पडलं असतं तर ते स्पर्धेतून बाहेर असते”

असं दरेकर सांगत होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. 

त्यानंतर राऊतांवर ‘काठावर पास’ म्हणून खिल्ली उडवण्यात आली. महाडिकांना राऊतांपेक्षा ०.५ मत जास्त मिळालं होतं. ज्यामुळे अजूनही शिवनसेनेला आणि राऊतांना यावरून विरोधी पक्षांचं भरपूर ऐकून घ्यावं लागत आहे. 

अशात सुहास कांदे यांचं मत ग्राह्य धरलं जाणं आता शिवसेनेसाठी आणि राऊतांसाठी महत्वाचं झालं आहे. कारण जर त्यांचं मत ग्राह्य धरलं तर संजय राऊतांच्या मतांची संख्या होते ४२. जी साहजिकच काठावर पेक्षा १ ने जास्त आहे. शिवाय महत्वाचं म्हणजे हा आकडा महाडिकांच्या ४१.५ पेक्षा देखील मोठा आहे. 

निवडणूक होण्यापूर्वी “आमचे सगळे उमेदवार नक्कीच निवडून येतील” असं म्हणणारी शिवसेना आणि कांदे यांचं मत बाद झाल्याचं समजल्यावर देखील “याचा मोठा फरक शिवसेनेला पडणार नाही, दोन्हीही उमेदवार नक्कीच निवडून येतील”, असं ठणकावून सांगणारी शिवसेना जेव्हा निकाल आला तेव्हा मात्र तोंडघशी पडल्याचं दिसलं.

एक उमेदवार हरला तर एक काठावर पास असं चित्र राहिलं.

भलेही याचं खापर शिवसेना अपक्ष आमदारांच्या डोक्यावर फोडत असेल तरी आता प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला आहे. पक्षाचाही आणि पक्षाचे सक्रिय नेते राऊत यांच्याही. म्हणून कांदे यांच्या मतावर बोली लावण्याचं ठरवण्यात आलं आहे आणि त्यानुसार कांदे आज कोर्टात पोहोचले असल्याचं दिसतंय.

न्यायालयाच्या निकालाने निवडणुकीच्या निकालात काही फरक पडणार नाहीये, हे स्पष्टच आहे. मात्र निकाल जर होकारार्थी लागला तर संजय राऊतांवर खूप परिणाम होणार आहे, हे देखील तितकंच स्पष्टपणे दिसतंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.