अँड्रॉईडला टक्कर द्यायला भारत स्वदेशी BharOS आणतंय…
अँड्रॉईड आणि आयओएस हे दोन शब्द सगळ्यांनीच ऐकलेले असतील. या शब्दांबद्दल साधारणपणे आपल्याला काय माहिती असतं? तर, अॅप्पलच्या फोनमध्ये iOS असतं आणि बाकीच्या फोन्समध्ये अँड्रॉईड असतं. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन ऑपरेटींग सिस्टीम आहेत. एखादं डिव्हाईस चालण्यासाठी त्यात ऑपरेटींग सिस्टीमची गरज असते.
आता या अँड्रॉईड आणि आयओएससोबतच मार्केटमध्ये भारताची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम आली आहे.
BharOS असं या सिस्टीमचं नाव आहे. याचा फूल फॉर्म अर्थातच भारत ऑपरेटिंग सिस्टीम असा आहे. हे भारोस एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ते आयआयटी मद्रासद्वारे डेव्हलप केलं गेलंय.
भारोसची वैशिष्ट्य काय आहेत ते बघुया.
सगळ्यात पहिलं म्हणजे एखाद्या डिव्हाईसमध्ये भारोस ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर, त्या डिव्हाईसमध्ये प्री इन्स्टॉल्ड अॅप्स नसतील. म्हणजे कसं? आपण नवा मोबाईल घेतो तेव्हा आपल्याला मोबाईलचं स्टोरेज दाखवलं जातं ६४ जीबी आणि मोबाईल घरी आणला आणि सुरू केला की, त्या ६४ जीबीमधलं थोडं स्टोरेज आधीच वापरलेलं असतं. मग आपल्याला ते ६४ जीबी मिळत नाही.
हे स्टोरेज कुठं जातं? तर ते प्री इन्स्टॉल्ड अॅप्समध्ये जात असतं. आता हे भारोस प्री-इन्स्टॉल्ड अॅप्स देणार नाही असं सांगितलं गेलंय त्यामुळे या सिस्टीमच्या फोन्समध्ये जास्त स्टोरेज मिळणार आहे.
दुसरा मुद्दा आहे तो सिक्युरिटीचा. भारोसची ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या डिव्हाईसेसमध्ये कोणतंच प्री-इन्स्टॉल्ड अॅप नसणार आहे. तसंच, सरसकट कोणतंही अॅप इन्स्टॉलसुद्धा करता येणार नाहीये. वापरकर्त्यांच्या डेटा सिक्युरिटीचा विचार करून ही अशी सिस्टीम डेव्हलप केली गेलीये असं भारोस डेव्हलप करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
या विषयी बोलताना भारोस डेव्हलप करणाऱ्या व्यक्तिने म्हटलंय,
“एखादं अॅप विश्वासार्ह आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी ऑटोमॅटेड सिस्टीमवर आमचा विश्वास नाही. माणसांवर आम्ही विश्वास ठेवतो. त्यामुळे, एखादं अॅप इन्स्टॉल करण्यापुर्वी ते अॅप सेफ आहे किंवा नाही हे मॅन्युअली वेरिफाय केलं जाईल.”
इतकंच नाही तर, या सिस्टीममध्ये स्वत:चं अॅपस्टोअर सुद्धा असणार आहे.
याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये भारतीय भाषांची एक मोठी यादी आहे. या भारतीय भाषांमध्ये तुम्ही काम करू शकता. अगदी बोली भाषेतसुद्धा काम करणं शक्य होणार आहे. त्यामुळे खास भारतासाठी बनवलेल्या या ऑपरेटिंग सिस्टीम ही अतिशय युजर फ्रेंडली असणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ही सिस्टीम बनवणाऱ्यांकडून आधीच या सिस्टीमसोबत काम करण्यासाठी गूगल पिक्सल आणि इतरही काही कंपनीज तयार असल्याचा दावा केलाय.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सिस्टीम अतिशय कस्टमायझेबल आहे. त्याचा फायदा असा आहे की, सरकारी एजन्सीज किंवा संस्था, कंपनीज् यांना त्यांचा प्रेफरंसप्रमाणे यातले फीचर्स कमी करता येऊ शकतात, वाढवता येऊ शकतात.
आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नासाठी ही सिस्टीम महत्त्वाची.
आपला देश आत्मनिर्भर असावा असं स्वप्न भाजप सरकारचं आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर व्हा असा संदेशही दिलाय. आता हा आत्मनिर्भरपणा हा प्रत्येकच क्षेत्रात असायला हवा. त्यामुळेच टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठीचं हे मोठं पाऊल असल्याचं बोललं जातंय.
ही सिस्टीम अँड्रॉईड सिस्टीमला टफ देण्यासाठी मार्केटमध्ये आणली असल्याच्याही चर्चा आहेत. तर, ही सिस्टीम तितकी कॅपेबल असल्याचंही बोललं जातंय. पण मूळ मुद्दा असा आहे की, ही सिस्टीम आतापर्यंत ओपन मार्केटमध्ये आलेली नाहीये.
ही सिस्टीम सध्यातरी फक्त सरकारी कर्मचारी आणि संस्थांसाठी वापरता येतेय. त्यामुळे, सध्यातरी अँड्रॉईडला कॉम्पिटीशन म्हणून ही सिस्टीम आतातरी समोर येऊ शकत नाही हे नक्की. याशिवाय, ओपन मार्केटमध्ये उतरल्यावर या सिस्टीमला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे ही पाहावं लागणार आहे.
हे ही वाच भिडू:
- एकीकडे देशभरात नवीन मेट्रोची लाइन लागलेय मात्र त्याचवेळी मुंबईची मोनोरेल का फेल झाली?
- टाटा, अदानी, अंबानींसारखे श्रीमंत भारतात असूनही भारतात टॉपच्या मोबाईल कंपन्या का नाहीत
- कॅशमध्ये आयफोन घेतला तरी, या जमाना गाजवलेल्या मोबाईल्सची सर त्याला येणार नाही…