प्रत्येकाचा बाजार उठवणारी हि “कोब्रा पोस्ट” काय भानगड आहे.

तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार तुमच्या ट्विटर अकाऊंटवरुन करा त्याबद्दल आम्ही तुम्हाला दणदणीत पैसे देतो,

तथाकथित बनावट PR कंपनीकडून आलेल्या ऑफरला बॉलीवुडचे क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचारी भुलले. त्याला काय होतय च्या लिस्टमध्ये शक्ती कपुर, कैलास खेर, अभिजीत भट्टाचार्य, सनी लिओनी आणि चक्क आमचे आधारस्तंभ भिडू जॅकी श्रॉफ देखील होते.

काहीकाळ हे असच चालत का म्हणून वाईट वाटलं. नंतर त्यांच्या ट्विटर हॅन्डेलवरुन एक झलक मारली. अनेकवेळा वेगवेगळ्या ब्रॅण्डची जाहिरात ते करतच असतात. कधी सहज एखाद्या मुलाखती ठराविक कंपनीचा शूज नाचवला जातो तर कधी टेबलवर एखाद्या ब्रॅण्डची कॉफी ठेवण्यात येते. 

असे प्रकार करुन पैसै मिळतात हे आत्ता जगाला माहित झालच आहे, पण पक्षाचा प्रचार सुद्धा असा होवू शकतो हे नविन होतं. काही राजकिय पातळ्यांवर तज्ञ समजल्या जाणाऱ्या लोकांना अस होतं हे माहित होतं पण पुरावा नव्हता. कोब्रा पोस्टने पुन्हा एकदा लोकांच्यासमोर संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा विश्वास बसला.

आत्ता झाल्या-गेल्या प्रकारात कायदेशीर चुक काय हे वकिल ठरवतील, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की,

  • आतल्या भानगडी चव्हाट्यावर मांडण्याचा पत्कुरा घेतलेली हि क्रोबा पोस्ट नेमकी काय भानगड आहे? 
  • आजपर्यन्त या क्रोबा पोस्टने किती जणांचा बाजार उठवला आहे? 
  • आणि कोब्रा पोस्टचा चालक-मालक कोण आहे? 

आत्ता असे प्रश्न पडणं, लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण असतं म्हणा. म्हणूनच आम्ही म्हणलं चला आज बोलभिडू कार्यकर्त्यांना कोब्रा पोस्टची भानगड उलगडून सांगावी.

कोब्रा पोस्ट हे दूसरं तिसरं काही नसून एक न्यूज वेब साईटच आहे. म्हणजे जस BBC, स्क्रोल, वायर, सत्याग्रह सारख्या वेबसाईट आहेत अगदी तसच. आत्ता वेबसाईट असली की त्यात देखील पोटप्रकार पडतात. म्हणजे कोणी फक्त मज्जाक मज्जाक करत राहतं तर कोणी एकदम डिपमध्ये जावून केसस्टडी करतं. प्रत्येक साईटची एक वेगळी शैली असते.

या कोब्रा पोस्टची विशेष शैली म्हणजे, ठिगभर माणसं लावून वर्ष दोन वर्ष पाठीमागे लावून सनसनाटी होईल अशी आतली भानगड वरती काढणं. आत्ता थोडक्यात सांगायचं झालं तर हे आत्ता झालं सिनेकलाकारांच ऑपरेशन. कोब्रा पोस्टने या ऑपरेशनला, “ऑपरेशन कराओके” अस नाव ठेवलेलं.

त्यासाठी पत्रकारांमार्फत एक खास PR  कंपनी काढण्यात आली. PR म्हणजे पब्लिक रिलेशन. अर्थात पैसै घेवून प्रसिद्ध करणारी माणसं. तर हे PR वाले या कलाकारांना भेटले, त्यांना ऑफर दिल्या. काही कलाकर होय म्हणले काही कलाकार नाही म्हणले आणि प्रकरण छुप्या कॅमेऱ्यातून जगापुढं आलं.

आत्ता या प्रकाराला पत्रकारतेच्या भाषेत शोध पत्रकारिता म्हणतात.

जागतिक पातळ्यांवर हिट झालेलं पहिलं शोध पत्रकारतेच उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात नोंदवलं गेलय. वॉटरगेट नावाच प्रकरण इतकं गाजलं की त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यायला लागला होता. भारतातलं उदाहरण सांगायचं झालं तर अंतुले यांचा सिमेंट घोटाळा देखील याच प्रकरणात आला होता. त्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई झाली नेमकं ते प्रकरण काय होतं ते बोलभिडूने अंतुलेंचा सिमेंट घोटाळा नेमकं काय होतं ते प्रकरण ? या ठिकाणी लिहलच आहे.

सध्या मुद्दा हा कि शोधपत्रकारिता म्हणजे काय? 

तर शोधपत्रकारिता म्हणजे एखाद्या बातमीचा मुळापर्यन्त जावून शोध घेणं. दरवेळी हि गोष्ट बातमीच असेल अस नाही. छोटीस कागदपत्र, ऐकीव बातम्या, चर्चा यांच्या आधारावर पुराव्याचा शोध घेवून सप्रमाण ती गोष्ट सिद्ध करायची असते. भारतातलं म्हणालं तर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस ही वर्तमानपत्र अशी शोध पत्रकारिता करण्यासाठी फेमस आहेत. आत्ता त्यामध्ये एक नवीन नाव अॅड झालय ते म्हणजे कोब्रा पोस्ट. 

2003 साली तहेलकाचे सहसंस्थापक अनिरुद्ध बहल यांनी कोब्रापोस्ट ही वेबसाईट चालू केली.

त्यांनंतर त्यांनी अनेक वेळा ठिकठिकाणी हात घालून माहिती गोळा केली. स्टिंग ऑपरेशन अंमलात आणली. मार्च 2013 मध्ये ऑपरेशन रेड स्पायडरच्या माध्यमातून मनी लॉंडरिंग करणाऱ्या प्रमुख भारतीय बँकांना उघडं पाडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानंतर ऑपरेशन ब्लू व्हायरस म्हणून निवडक आयटी कंपन्या सोशल मीडियावर नकली ओळख वापरून राजकीय लोकांच्या प्रतिमा मोठ्या करण्याचे काम करत असल्याचे कोब्रा पोस्टने उघडकीस आणले होते.

मे 2013 रोजी,

सामान्य लोकांकडून ठेवींची मागणी करून किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर साधनांचा वापर करुन बँका पैसे कसे मिळवतात आणि कॉरपोरेट कंपन्यांच्या विविध प्रकल्पांना निधी देण्यासाठी या पैशांचा वापर कसा केला जातो हे यांनीच उघड केलं होतं.

3 एप्रिल 2014,

मध्ये कोब्रापोस्टने ऑपरेशन जन्मभूमीद्वारे डिसेंबर 1992 मधील बाबरी मशिदीच्या विध्वंसा पाठीमागील अनेक गोष्टीचा खुलासा केला आणि याच धर्तीवर ऑपरेशन ज्युलियट च्या माध्यमातून कोब्रापोस्टने भारतातील लव्ह जिहादचा देखील खुलासा केला होता.

2013 साली,

कोणा एका साहेबांसाठी अमित शहा एका महिलेवर पाळत ठेवून असल्याच्या बातमीने खळबळ उडवली होती, कॉंग्रेसने हे साहेब म्हणजे खुद्द नरेंद्र मोदी असल्याची टीका केली होती. अमित शहा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मधील या महिलेवर पाळत ठेवण्याबाबत झालेल्या बोलण्याची एका ऑडियो क्लिप कोब्रा पोस्टने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध देखील केली होती.

या सगळ्या ऑपरेशन मध्ये त्यांनी खुद्द आपल्याच क्षेत्रातला बाजार मांडला होता. ऑपरेशन 136 च्या भाग एक व भाग दोन द्वारे हिंदूत्वाचा प्रचार करण्यासाठी खोटी पत्रकारिता करत असल्याचा आरोप पत्रकार व टिव्ही वाहिन्यावर केला होता. आपल्या रिपोर्टमधून त्यांनी अशा माध्यमांना उघडं पाडलं होतं.

इतकं करुन देखील कोब्रा पोस्टच्या माध्यमातून ज्या गोष्टी समोर आल्या त्यावर कारवाई झाली नसल्याचंच दिसून येतं. आत्ता त्याची कारणे आणि परंपरा हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे पण कोब्रा पोस्टने केलेल्या ऑपरेशनमध्ये एक ऑपरशेन अस देखील होतं की ज्याची कारवाई एकदम दणक्यात झाली होती.

त्या ऑपरेशनच नाव होतं, ऑपरेशन दुर्योधन. 

सन 2005 मध्ये ऑपरेशन दुर्योधन नावाने हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी खासदार पैसे घेतात हे या ऑपरेशनमधून उघड करण्यात आलं होतं. 56 व्हिडीओ क्लिप्स आणि 70 च्या सुमारास ऑडिओ रेकॉर्डिंग पब्लिश करण्यात आले होते. या बातमीमुळे 11 खासदारांच निलंबन करण्याची वेळ सरकारवर आली होती.

कोब्रापोस्ट अशाच प्रकारे प्रत्येकाचा बाजार उठवण्याच काम करत असतं, या बाजार उठवण्याच्या खेळात कधी त्यांचाच बाजार उठण्याची वेळ देखील येते. पण कोब्रावाले त्यातून तावुनसुलाखून पुढे जातात. असाच बाजार उठवण्यासाठी कोब्रावाल्यांना शुभेच्छा.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.