१५ ऑगस्टला ध्वजारोहण करतात आणि २६ जानेवारीला ध्वज फडकवतात; दोन्हींतला फरक जाणून घ्या…

यंदाचा स्वातंत्र्य दिन हा डबल पावरने सगळे साजरा करणार आहेत. प्रसंगच तसा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्ष पूर्ण होतायेत. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये लोकांचा सहभाग त्यांचा उत्साह दाखवून देतोय. अनेकांच्या व्हाट्सअप प्रोफाइलवर तिरंगा झळकतोय. रस्त्यावरून जाताना आतापासूनच देश भक्तीपर गीत ऐकू येऊ लागले आहेत.

भारतीय जवानांची परेड, आर्मी, एरफोर्स आणि नेव्ही अशा तिन्ही सैन्याचं शक्तिप्रदर्शन डोळ्यांच्या समोर उभं राहतंय. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला असे शब्द काढले की सहज लक्षात येणारं हे दृश्य आहे.

जरी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला बऱ्याच गोष्टी सारख्या केल्या जात असल्या तरी यांच्यात खूप बेसिक फरक आहे. झेंडा फडकावणं, तो फडकवण्याचा मान कोणाला असणं आणि त्याची जागा कोणती असणं? यात महत्वाचे फरक आहेत. अनेक भारतीयांना अजूनही हे फरक माहित नाहीये.

तेच फरक जाणून घेऊ..

१) ध्वज फडकावणं की ध्वजारोहण करणं?

भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि स्वतंत्र भारताला स्वतःचं संविधान मिळालं तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन.

१५ ऑगस्टला ध्वजारोहण होत असतं.

१९४७ साली याच दिवशी इंग्रजांना भारतातून पळ काढणं भाग पडलं होतं.  इंग्रजांचा झेंडा खाली उतरला गेला होता आणि भारताचा झेंडा वर चढवला गेला होता, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. 

यावेळी राष्ट्रीय ध्वज हा खांबाच्या तळाशी बांधलेला असतो. मग दोरीने वर चढवला जातो आणि फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने याकडे बघितलं जातं. 

२६ जानेवारीला झेंडा फडकावला जातो. 

भारताचा झेंडा आधीच खांबावर असतो. यावेळी फक्त त्याची गाठ सोडून तो पुन्हा एकदा हवेत मोकळा केला जातो. यालाच झेंडा फडकवणं असं म्हणतात. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्याने राज्य चालत होतं. म्हणून जेव्हा १९५० ला आपली राज्यघटना आली तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीयांच्या कायद्याने राज्य चालणार याचं प्रतीक म्हणून हा झेंडा २६ जानेवारीला फडकावला गेला.

 आपला देश आधीच स्वतंत्र आहे हे चिन्हांकित करण्यासाठी हा उपक्रम केला जातो.

२) मान कोणाला दिला जातो?

१५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करत असतात. सरकारचे प्रमुख म्हणून त्यांना हा मान दिला जातो. यामागे इतिहास आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा पहिल्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती हे पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं. लॉर्ड माऊंटबॅटन हे अजूनही भारताचे गव्हर्नर जनरल होते. हे पद रद्द होण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या बरोबरीचे होतं. 

मात्र नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी भारताच्या नागरिकानेच पार पाडावी हे ठरलं होतं. राष्ट्रपती पद नव्हतं मात्र तेव्हा सर्वमान्य असं पंतप्रधान पद होतं. जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्यांना मान्यता देण्यात आली होती. म्हणून तेव्हा पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं. 

तेव्हापासून १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात. 

तर २६ जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवत असतात. घटनात्मक प्रमुख असल्याने देशाचे प्रथम नागरिक म्हणून ते ध्वज फडकवतात. 

३) समारंभाची जागा कोणती असते?

१५ ऑगस्टला पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण  करतात आणि ‘लाल किल्ला’च्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. 

२६ जानेवारीला दिल्लीतच राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. यावेळी तिन्ही भारतीय सुरक्षा दलं म्हणजेच भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना परेड करतात. तसंच भारताच्या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ राजपथावर परेडसाठी उतरवले जातात.

हे फरक खूप बेसिक आहे मात्र ते भारताचे जबाबदार नागरिक म्हणून ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.