जे निलेश लंकेंना जमतं ते इतर आमदार, खासदारांना का जमत नाही..?

राज्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून सर्वात जास्त हवा आहे ती निलेश लंके यांची. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार आहेत. पण कोरोनाच्या काळात ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

अगदी राज्यात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते यांच्याहून अधिक ग्लॅमर आमदार निलेश लंके यांच आहे. 

अगदी एक उदाहरण देवूनच सांगायचं झालं तर शुक्रवारी पुण्यात झालेल्या अजित पवारांच्या कोरोना आढावा बैठकीचं देता येईल. झालं अस की या बैठकी दरम्यान एक दिव्यांग कार्यकर्ता आला आणि अजित पवारांना म्हणाला,

मला निलेश लंके यांना मदत करायची असून तुम्ही हा मदतीचा चेक त्यांच्यापर्यन्त पोहचवा.

पक्षाच्या एका प्रमुख नेत्याकडेच किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीजवळ चेक सोपवून तो आमदाराला देण्यास सांगणं ही तशी खूप मोठ्ठी गोष्ट आहे. पण निलेश लंके हे नाव येताच मात्र सर्व प्रोटोकॉल, पक्षीय मतभेद बाजूला पडूल लोक चांगल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

अगदी काल बोलभिडू मार्फत कोणते आमदार, खासदार, नगरसेवक या कोरोनाकाळात तुमच्या मदतीला आले असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सर्वांधिक लोकांनी आमदार निलेश लंके यांच्याच नावाला पसंती दिल्याचे दिसून येते. 

https://www.facebook.com/BolBhiduCOM/photos/3025699744373640

आत्ता मुद्दा हा राहतो की निलेश लंके यांनी खरच इतकं मोठ्ठ काम केलं आहे का?

तर याचं उत्तर होय असच आहे. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने १ हजार १०० बेडचं कोव्हिड सेंटर उभारलं आहे. कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत उभारलेलं हे कोव्हीड सेंटर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सुरू केले आहे. विशेष म्हणजे हे कोव्हिड सेंटर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय उभारल्याचं सांगण्यात येत. 

या कोव्हीड सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेड आहेत. सोबतच जेवण, उपचार निशुल्क करण्यात येत आहेत. अंडी, दुध, नाष्टा, दोन वेळचं जेवणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे अशा प्रकारची सोय रुग्णांची करण्यात आलेली आहे. दिनांक १४ एप्रिल रोजी हे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले ज्यामधून आजपर्यन्त अडीच हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेवून गेले आहेत अस सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे ही सर्व सोय निशुल्क आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारत नसल्याचे आमदार निलेश लंके सांगतात. 

कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत सर्वात महत्वाची गोष्ट ठरलेय ती बेड मिळणं. बेड, ऑक्सिजन बेड अशा सुविधा ग्रामीण भागातील लोकांना मिळणं तर अशक्य वाटत आहे. अशा वेळी निलेश लंके यांच्या प्रयत्नातून कोव्हिड सेंटर उभारल्याने लोकांना समाधान वाटत आहे. त्यातही इथे उपचार व जेवणासाठी शुल्क आकारले जात नसल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांनी तर निलेश लंके यांना देव मानण्यास सुरवात केली आहे.

एखाद्या रोजंदारीवर जाणाऱ्या कुटूंबात खाणाऱ्या लोकांची संख्या व अशा संकटाच्या काळात हॉस्पीटलमध्ये खर्च होणारी रक्कम यांचा अंदाज घेतला तर तुम्हाला देखील ही किती मोठ्ठी आणि महत्वाची गोष्ट आहे याची कल्पना येवू शकते.

अशाच प्रकारचं काम आमदार निलेश लंके यांच्यामार्फत कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील झालेलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये टाकळी ढाकेश्वर येथे १००० बेडस् कोव्हीड सेंटर उभारलं होतं. या कोव्हिड सेंटरमधून ५ हजार रुग्ण बरे होवून गेले होते. तशाच पद्धतीचं काम दूसऱ्या लाटेत देखील झाल्याने लोकांनी व माध्यमांनी त्यांच कौतुक करण्यास सुरवात केली.

या कामासाठी पैसे कुठून येतात..?

साहजिक आहे कारण निलेश लंके हे स्वत: पैशाकडून श्रीमंत नाहीत अस सांगण्यात येत. निलेश लंके हे पूर्वी हंगा स्टेशनवर छोटे हॉटेल चालवायचे. आजही त्यांची परिस्थिती तितकी मोठ्ठी नाही. शिवाय ११०० बेड्स कोव्हिड सेंटर चालवणं हा देखील बिनपैशाचा उद्योग नाही अशा वेळी प्रश्न पडतो तो हा खर्च कोण करतं.

तर यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान मार्फत खर्च करण्यात येत आहे. लोकांनी दिलेल्या देणगीतून हा खर्च भागवण्यात येतो. निलेश लंके यांचे प्रामाणिक काम पाहूनच देश विदेशातून पैसे मिळत आहेत. आजवर परदेशातून आलेल्या मदतीचा आकडा हा १ कोटींच्या वरती गेल्याचं सांगण्यात येतं. या पैशातूनच कोव्हिड सेंटरच काम सुरू आहे.

निलेश लंके यांना इतकी प्रसिद्धी का मिळत आहे..?

निलेश लंके यांच काम आहेच पण त्यांना प्रसिद्धी मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांना ते देत असणारी ट्रिटमेंट. या कोव्हिड सेंटरमध्येच ते झोपायला असतात. स्वत: गादी टाकून इथेच झोपतात. रात्री अपरात्री काही लागलं तर स्वत: धावपळ करतात. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासण्यापासून अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी ते स्वत: येत असल्याने त्यांना प्रसिद्धी मिळत आहे.

दिनांक ५ मे रोजी निलेश लंके यांनी कोव्हीड सेंटरवरील काही फोटो शेअर केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्व माध्यमांच लक्ष त्यांच्याकडे अधिक प्रमाणात गेल.

https://www.facebook.com/NileshLankeOfficial/photos/pcb.4124445217607783/4124444387607866/

त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच नाव चर्चेला येवू लागलं. एक आमदार स्वत: कोव्हिड सेंटरवर तळ ठोकून असल्याने हे कौतुक साहजिक होतं.

आत्ता शेवटचा मुद्दा राहतो तो निलेश लंकेना जे जमलं ते इतर आमदारांना का जमत नाही..?

याच उत्तर देखील निलेश लंके यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत आहे. निलेश लंके हे तळागाळातून आलेलं नेतृत्व आहे. त्यांची कार्यकर्त्यांना भेटण्याची पद्धत ही खांद्यावर हात टाकूनच सुरू होते. कोरोनाच्या पुर्वीपासून लोकप्रतिनिधींमार्फत कार्यकर्त्यासाठी वापरला जाणारा फिजिकल डिस्टन्स हा प्रकार निलेश लंके यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत नाही.

दूसऱ्या आमदारांबाबत बोलायचं तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही आमदारांनी कोव्हिड सेंटर उभा केलेली आहेत. पण तिथे जातीने लक्ष घालणं हे प्रत्येकालाच जमत नाही अशी माहिती मिळते.

काही आमदार जातीने लक्ष्य घातल असतीलही पण कोव्हिड सेंटरला चोवीस तास उपस्थित राहून काम करणं हे फक्त निलेश लंकेच करत असताना सध्यातरी दिसून येतात. अशा वेळी एकच वाटतं ते म्हणजे पक्ष कोणताही असो, राज्य कोणतही असो पण प्रत्येक लोकप्रतिनिधीने कोरोनासारख्या संकटात तरी निलेश लंके पॅटर्न स्वीकारला पाहीजे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.