‘वरणभात आवाज आहे’, असं म्हणत दिलीपकुमारनं लतादीदींना डावललं होतं…

सगळं घर शांत आहे, अगदी पिन पडली की आवाज होईल इतकी शांतता, अशाच धीरगंभीर शांततेत आवाज घुमतो… ‘ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे.’ आपल्या मनातलं सगळं टेन्शन गायब करण्याची ताकद या आवाजात होती. तो आवाज भारतरत्न लता मंगेशकर यांचा.

गेली कित्येक वर्ष या आवाजानं जगभरातल्या चाहत्यांच्या मनावर गारूड केलंय. पु. ल. देशपांडे तर एका भाषणात म्हणाले होते, ‘२४ तासांत असा एक क्षण नसेल, ज्यावेळी लताचा सूर आसमंतात घुमत नसेल.’ त्यांच्या आवाजाची मोहिनीच तशी होती. लतादीदींनी कित्येक वर्ष आपल्या मनावर गारुड केलंय. आजही त्यांचा आवाज कानावर पडल्यावर आपण आठवणीत रमतो.

त्यांचा आवाज आवडत नाही असा माणूस सापडणं तसं विरळाच. पण लतादीदी गायला लागल्या आणि लगेच त्यांना मोठ्या संधी मिळाल्या असं मुळीच झालं नाही. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची कन्या असूनही लतादीदींनाही स्ट्रगल करावा लागला.

मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सगळ्यात मोठ्या. त्या फक्त १३ वर्षांच्या असताना दीनानाथ मंगेशकर यांचं दुःखद निधन झालं. कुटुंबाशी बरीचशी जबाबदारी लतादीदींच्या खांद्यांवर येऊन पडली. लहान वयातच त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांच्या मनात लग्नाचे विचार यायचे, पण काम आणि जबाबदाऱ्यांमुळे त्या लग्नाचं मनावर घेऊ शकल्या नाहीत. बघता बघता वय निघून गेलं आणि मग लतादीदी अविवाहीतच राहिल्या.

सांगून आश्चर्य वाटेल, पण स्ट्रगलच्या काळात लतादीदींना नकार मिळण्याचं कारण होतं त्यांचा आवाज. मास्टर गुलाम हैदर हे लतादीदींचे गुरू.  मास्टर गुलाम हैदर हे लतादीदींचे गुरू. त्यांनी एक गोष्ट फार आधीच पारखली होती, ती म्हणजे लतादीदींची धून पक्की आहे. त्यात त्यांचा गळाही प्रचंड गोड. त्यांनी शहीद सिनेमातल्या गाण्यांसाठी लतादीदींना संधी मिळावी म्हणून एस. मुखर्जी यांच्याकडे नेलं. मुखर्जी यांनी शांतपणे गाणं ऐकलं आणि ते म्हणाले, ‘यांना मी सिनेमात काम देऊ शकत नाही, कारण यांचा आवाज फार पातळ आहे.’ पण यामुळे ना लतादीदी हताश झाल्या न गुलाम हैदर. 

एकदा लता मंगेशकर, दिलीपकुमार आणि गुलाम हैदर ही तिन्ही दिग्गज माणसं मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत होती. गुलाम हैदर यांना वाटलं की, दिलीप कुमारला लताचा आवाज ऐकवायला हवा, न जाणो त्यामुळे लताला एखादं काम मिळेल. 

लतादीदींनी गाणं सुरू केलं, त्यावर दिलीप कुमारनं प्रतिक्रिया दिली की, ‘मराठी लोकांच्या आवाजाला वरणभाताचा वास येतो.’ लतादीदींचा आवाज आणि त्यांच्या उच्चाराला दिलीप कुमार यांनी मारलेला तो टोमणा होता.

यामुळं लतादीदी पेटल्या खऱ्या, पण त्यांनी ते दाखवून दिलं आपली कृतीमधून. त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषा शिकण्यासाठी एका शिक्षकाची मदत घेतली आणि आपलं उच्चारण सुधारलं. त्यानंतर फक्त मराठी आणि हिंदीच नाही, तर लतादीदींनी ३६ पेक्षा जास्त भाषांमधून गाणी गायली.

वरणभाताच्या टिपण्णीमुळे लता मंगेशकर दिलीपकुमारशी बराच काळ बोलल्या नाहीत असंही म्हणलं जातं. पण याच लतादीदी दिलीप कुमारला राखीही बांधायच्या. त्यांच्यातले मतभेत फारसे गाजले नाहीत, गाजली ती त्यांची गाणी आणि बहीण-भावाचं निर्मळ नातं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.