धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवारांनी पुढे आणलेले बबन गित्ते नेमके कोण आहेत?

७०० गाड्यांचा ताफा, ताफ्यातल्या एका गाडीत लांब केस, मोठी लांब लचक दाढी आणि पांढरे शुभ्र कपडे असणारे व्यक्ती आणि प्रत्येक गाडीत हजारो युवक तरूण. आता तुम्ही विचार करत असाल की मी एखाद्या साऊथच्या सिनेमाची स्टोरी सांगत आहे किंवा मग एखाद्या राजकीय बड्या नेत्याच्या इंन्ट्रीची वर्णन सांगत आहे. पण, असं काहीच नाही.

राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवारांनी दौरे सुरू केले. पहिली सभा नाशिकच्या येवल्यात झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये. पण, या सभेत ७०० गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्याने. राष्ट्रवादीच्या कुठल्याचं मोठ्या नेत्याचं आत्तापर्यंत एवढ मोठं शक्तीप्रदर्शन बीडमध्ये झालं नाही.

शरद पवारांची सभेत पण चर्चा झाली ती परळीचे युवा नेते बबन गिते यांची.

धनंजय मुंडे अजित पवार गटात गेल्या नंतर परळी विधानसभा मतदारसंघ असो किंवा मग एकूण बीड जिल्हा असो, राष्ट्रवादीच्या ४ आमदारांपैकी ३ आमदार अजित पवार गटात गेले आणि शरद पवार गटाची गच्छंती झाली. शरद पवारांना धनंजय मुंडे यांना टक्कर देणारा एक चेहरा हवा होता आणि शरद पवारांनी मोहरा शोधला तो बबन गित्ते यांच्या रूपाने.

७०० पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा घेऊन बीडमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेत राष्ट्रवादीत हजारो कार्यकर्त्यांनसह बबन गित्तेंनी प्रवेश केला आणि एका रात्रीत धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून बबन गित्ते समोर आले.

बरं काल पासून संपुर्ण मिडीया ज्यांच्या अवती-भवती फिरते आहे ते  बबन गित्ते आहेत तरी कोण? त्यांची परळीत ताकद किती? त्यांच्या प्रवेशाने बीड आणि परळीच्या राजकारणातील समिकरणं काय असतील? हेच जाणून घेऊया. सुरवातीला आपण पाहू याआधी कधीही चर्चेत न आलेलं नाव म्हणजे बबन गित्ते हे कोण आहेत?

शशिकांत पांडूरंग गित्ते उर्फ बबन गित्ते परळीच्या राजकारणातील मुंडे बंधू-भगिनीच्या नंतरचं नाव. जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पोहचलेलं नाव. २०१९ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकीत बबन गित्ते यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या सभापती झाल्या. परळी पंचायत समितीच्या सभापती म्हणून बबन गित्ते यांच्या पत्नी उर्मिला गित्ते काम पाहत होत्या.

पण, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांची सभापती पदावरून हकालपट्टी झाली. बबन गित्ते यांनी  जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं. गित्ते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला. गित्ते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात अशी त्यांची इमेज बिल्ड झाली. परळीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत बबन गित्ते यांना सोबत घेणं गरजेचं बनलं.

बबन गित्तेंची परळीच्या राजकारणातली ओळख हिच बबन गित्तेंची ताकद आहे. बबन गित्ते यांची स्थानिक स्वराज्य संस्थेत ताकद आहे. हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही हे चांगलंच माहीत आहे.

कालच्या भाषणात बबन गित्ते बोलताना म्हणाले की..

“२०१४ च्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांना मी पाठींबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला ते निवडून आले आणि मंत्री झाले”

त्यांचा म्हणण्याचा उद्देष होता की त्यांना मी पाठींबा दिला म्हणून ते निवडून आले. परळी विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणूकीत धनंजय मुंडे यांचा प्रचार बबन गित्ते यांनी केला होता. धनंजय मुंडेंच्या विजयात बबन गित्तेंचा सर्वात मोठा वाटा असल्याचं स्थानिक पत्रकाराचं म्हणंण आहे.

पंकजा मुंडे असो किंवा मग धनंजय मुंडे असो यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन गित्तेंचा पाठींबा आवश्यक असतो असं बोललं जातं. सामाजिक कामात बबन गित्ते धावून येतात आणि सर्वसामान्य माणसांसाठी कामं करतात अशी त्यांची ओळख आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकारणातला सर्वात मोठा महत्वाचा दूवा हा तरूण वर्ग मानला जातो, जो की बबन गित्तेंच्या अंडर आहे. २०१९ च्या निवडणूकीत मतदारसंघातील ५००० हजार तरूणांना सोबत घेऊन धनंजय मुंडे यांचा प्रचार त्यांनी केला होता असं बोललं जातं.

बबन गित्तेंच्या येण्याने परळी तसेच बीडच्या राजकारणातील समीकरणं बदलू शकतात.

बबन गित्ते हे सुरवाती पासूनच मोठ्या पक्षात जाण्याच्या अपेक्षेत होते. स्थानिक राजकारण बघाता त्यांना ती स्पेस मिळत नव्हती. पण, जशी स्पेस मिळाली तसा त्यांनी निर्णय घेतला. बबन गित्ते हे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार गटाचे उमेद्वार म्हणून जर समोर आले. तर, धनंजय मुंडेंची डोकेदुखी अधिक वाढणार आहे. परळीच्या जातीय समीकरणाच्या राजकारणाचा विचार केला. तर, परळीत ४० टक्के मराठा मतदार आहे. ३० टक्के वंजारी मतदार तर उरलेले ३० टक्के मुस्लिम आणि इतर मतदार आहेत. मुंडे बंधू-भगिनी यांना मराठा समाजाच्या मतांशिवाय पर्याय उरत नाही.

आता बबन गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने पंकजा मुंडे यांचा मार्ग सोयीचा झाल्याचं बोललं जात आहे. जर पंकजा मुंडेंनी परत जागेवर दावा केला किंवा दोघही स्वतंत्र लढले तर, वंजारी समाजाच्या मतांचं विभाजन होईल आणि गित्तेंची स्थानिक राजकारणतली पकड त्यांना मत वळवण्यात फायद्याची ठरेल.  शरद पवार यांच्या पाठीमागे परळी मतदारसंघातील मराठा समाजही काही प्रमाणाणात राहीलं ज्याचा फायदा बबन गित्ते यांना होऊ शकतो.

बीडच्या राजकारणाचा विचार केला तर बीडमध्ये वंजारी समाज अधिक प्रमाणात आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे नंतर एक नवा चेहरा म्हणून लोकं बबन गित्ते त्याच्यांकडे पाहू शकतात. बीडच्या राजकारणात परळी हे नेहमीच केंद्रबिंदू ठरलेलं आहे. जर उद्या चालून बबन गित्ते यांची परळीत ताकद वाढली तर बीड जिल्ह्यातही एक राष्ट्रवादीचा किंवा ओबीसीचा चेहरा म्हणून आपसूकच त्याचं नाव पुढं येईल.

पण, मुद्दा येतो धनंजय मुंडे यांचे सहाकारी असलेल्या बबन गित्तेनीं धनंजय मुंडेंच्या विरोधात दंड का थोपडले?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गित्ते यांनी राजकारणाचे धडे घेतले. त्यांच्या नंतर गित्तेंनी पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली. पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना मदत केली. पण, पुढे मतभेद झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्या सोबत गेले. त्यांच्या सोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. पत्नी सभापती असली तरी बबन गित्ते काही कामं स्वत: करायचे. यामुळे त्यांच्यावर आरोप झाले. पुढे काम करण्यात त्यांच्यावर बंधन येऊ लागले. धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला. तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर बबन गित्ते यांच्यावर अनेक आरोपही झाले.

पुढे एका प्रकरणात त्यांना जेलमध्येही जावं लागलं. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच धडा शिकवायचा, असा निर्धार गित्ते यांनी केला.

जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली. हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गित्ते यांनी फिल्डिंग लावली. आमदार क्षीरसागर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली अन् आपला राष्ट्रवादीतला प्रवेश फिक्स केला.

बबन गित्ते हे नाव जरी नवीन असलं. तरीही त्यांचा स्थानिक राजकारणात असला दांडगा जनसंपर्क, तसेच मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद आणि फुटीच्या राजकारणाचा फायदा, हे सारं जर का बघितलं तर येणाऱ्या निवडणूकीत पवारांचा मोहरा म्हणून बबन गित्ते हे धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून उभे राहीले तर आश्चर्य वाटायला नको.

 हे ही वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.