महाभारतात ऐकू येणारा ‘मैं समय हुं’ हा आवाज या माणसाचा होता..

मैं समय हुं, मेरा जन्म सृष्टी के निर्माण के साथ हुआ था, मैं पिछले युगो में था, हुं ओर् आने वाले यूगो में रहुंगा, अनंत काल से पृथ्वी पर राज करने की लडाई जारी है….

आता जर तुम्ही महाभारत पाहिलेलं असेल तर या ओळी वाचताना तुमच्या मनात थेट तेव्हाचा तो आवाज घुमत असेल आणि डोक्यात एक अनामिक शांतता आणि विविध आठवणींचा बायोस्कोप फिरला असेल.

हा तो काळ होता ज्यात आपण समय किंवा वेळेला ऐकत होतो, पाहत होतो आणि अनुभवत होतो.

टिव्हीवर एकदा का महाभारत लागलं की मैं समय हुं आपल्या मनाचा ठाव घेत असायचा. हा आवाज लोकांवर गारूड करून गेला आणि आजही हा आवाज जर ऐकू आला तर आठवणींचे हजार क्षण डोळ्यांसमोरून तरळून जातात.

90 च्या दशकानंतर लॉक डाऊन मध्ये हा आवाज परत एकदा ऐकायला मिळाला होता. पण मग एक प्रश्न कायम राहिला की भिडू हा आवाज नक्की कोणाचा होता ? म्हणजे असे आवाज युनिक असतात, बिग बॉसमध्येसुद्धा एक आवाज आहे तोही कडक आहे, पण त्याविषयी नंतर कधीतरी आधी हा समय हुं वाला आवाज कोणाचा होता तो शोधुया.

1988 साली बी आर चोप्रा यांनी दूरदर्शनवर महाभारत सिरीयल आणली तेच स्वतः दिग्दर्शक होते.

या सिरीयल मधल्या प्रत्येक पात्राने असा काही अभिनय केला होता की लोकांनी त्यांना थेट देव मानायला सुरवात केली होती. यातले सगळे पात्र आपल्याला माहिती आहेत पण एकच पात्र होतं जे कधी लोकांना पाहायला मिळालं नाही ते म्हणजे मैं समय हुं….

फक्त आपल्या आवाजानेच लोकांच्या मनात जाऊन बसणारे समय साकारणारे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट होते हरीश भिमानी. आज भारतातल्या बऱ्याच लोकांच्या मनात हरीश भिमानी यांचा आवाज घुमत असतो.

हरीश भीमानी यांनी त्यांना हे समय साठी आवाज देणारं पात्र कसं मिळालं याचा एक किस्सा सांगितला होता.

महाभारतांत शकुनी साकारणारे गुफी पेंटल फक्त शकुनी नव्हते तर ते या सिरीयलचे कास्ट सुद्धा सिलेक्ट करत होते. त्यांनी एके दिवशी अचानक हरीश भिमानी यांना बोलावून घेतलं आणि एका कागदावर काही ओळी लिहून दिल्या आणि रेकॉर्ड करा म्हणून सांगितलं. हरीश भिमानी यांना काहीच कल्पना नव्हती की त्यांचा आवाज पुढे जाऊन अजरामर होणार आहे.

यानंतर त्यांना बऱ्याच वेळा स्टूडिओला बोलवण्यात आलं, 6-7 टेक हरीश भिमानी यांनी दिले पण आवाज काय सिलेक्ट होईना. आवाज बदलून बोलायला सांगितलं तरीही काही होईना. शेवटी हरीश भिमानी यांना आवाजाचा टेम्पो वाढवा म्हणून सांगण्यात आलं तेव्हा हरीश यांनी नकार दिला आणि सांगितल की टेम्पो वाढवला तर आवाज पातळ येईल.

शेवटी थोडा वेळ घेऊन हरीश भिमानी यांनी बेसचा आवाज लावला आणि पूर्ण एकाग्रतेने टेक दिला आणि आवाज पास झाला. हीच ती वेळ होती जिथून हरीश भिमानी यांचं नाव समय या पात्राशी जोडलं गेलं.

हरीश भिमानी हे फक्त व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट नाही तर लेखक, दिग्दर्शक आणि कॉर्पोरेटर सुद्धा आहेत. सुकन्या आणि ग्रहण या गाजलेल्या सिरीयल त्यांनी लिहिलेल्या होत्या. आजवर हरीश भिमानी यांनी 22 हजारांपेक्षा जास्त व्हॉईस ओव्हर केलेले आहेत.

विशेष म्हणजे 2016 साली आलेल्या मराठी डॉ्क्यू फीचर फिल्म ‘ मला लाज वाटत नाही ‘ साठी हरीश भिमानी यांना सर्वोत्तम व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

एखाद्याचा आवाज काळजाला भिडणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरीश भिमानी यांचा मैं समय हुं वाला आवाज….!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.