गाजावाजा करत ऑनलाईन स्वरूपात सुरु झालेले टिचिंग प्लॅटफॉर्म आता ऑफलाईनकडे वळलेत

नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान बनले होते तेव्हा त्यांनी ‘डिजिटल इंडिया’चं स्वप्न समोर ठेवलं होतं. मात्र ते इतक्या लवकर पूर्ण होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कारण भारतात अनेकांना अँड्रॉइड मोबाईल देखील ठाऊक नव्हते. मग डिजिटल होणं तर फार दूरची गोष्ट. पण आता सगळं कसं ऑनलाईन झालं आहे. काहीही हवं असेल, द्यायचं असेल ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेच. 

अगदी शॉपिंगपासून ते शिकण्यापर्यंत सगळे पर्याय ऑनलाईन झालेत. बायजुज, वेदांतू, अनअकॅडमी अशा ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म्सच्या सध्याच्या यशावरून ते कळून येतंय.

बायजुज ही भारतातली सगळ्यात जास्त मूल्याची स्टार्टअप कंपनी झाली आहे. तिचं मूल्यांकन १७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत अनअकॅडेमीचं व्हॅल्युएशन ३.४४ अब्ज डॉलर्सवर गेलं होतं. तर बंगळुरूस्थित एडटेक कंपनी वेदांतूने सप्टेंबर २०२१ मध्ये १ अब्ज डॉलर्सच्या घरात प्रवेश करत युनिकॉर्न क्लबचा हिस्सा बनली आहे. 

ऑगस्ट २०२१ मध्ये अपग्रॅड कंपनीचं मूल्य १.२ अब्ज डॉलर्स होऊन तिचा युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश झाला आहे. तर नुकतच जून महिन्यात फिजिक्स वाला या कंपनीचं मूल्य १.१ अब्ज डॉलर्स झालंय आणि ती देखील युनिकॉर्न कंपनी बनली आहे. 

अशा या कंपन्या झटाझट युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल होण्यामागे मुख्य कारण आहे – 

कोरोना

२०२० मध्ये अचानक कोरोना महामारी आल्यामुळे सगळं जग बंद झालं. तेव्हा यातील अनेक स्टार्टअप आधीच अस्तित्वात होते. मात्र काही कोरोनामुळे अस्तित्वात आले. कारण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. शाळा बंद राहिल्याने नुकसान होत होतं. अशात शाळा ऑनलाईन शिफ्ट झाल्या तसं या कोचिंगलाही भाव आला. 

हे चित्र बघून अनेक तज्ज्ञांनी देखील हाच अंदाज दिला होता की यापुढे ऑनलाईन शिक्षणाचं मार्केट असणार आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत जाईल आणि २०२५ येता येता ऑनलाइन शिक्षणाची एकूण बाजारपेठ ३५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यासोबतच ऑफलाईन शिक्षण बंद होऊ शकतं, अशा चर्चा देखील झालेल्या.

मात्र गेल्या दोन वर्षांत फॉर्ममध्ये आलेल्या आणि नवीन रेकॉर्ड तयार करत भारताच्या शैक्षणिक भविष्याचं नवीन चित्र निर्माण करणाऱ्या या एडटेक क्षेत्रांबाबतचे हे अंदाज चूक ठरताना दिसत आहेत. 

कारण अचानक या ऑनलाईन कोचिंग ॲप्सने त्यांचा मोर्चा ऑफलाईन शिकवणीकडे वळवला आहे. 

एड-टेक कंपनी बायजूजच्या मालकीची आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस त्यांच्या देशभरातील शाखेच्या संख्या वाढवणार आहे. सध्या ३०० असलेल्या या संख्येत अजून १०० ची भरती येत्या वर्षभरात होईल, अशी माहिती आहे. वेदांतू देखील लवकरच या ऑफलाईन मार्गाकडे वळत आहे. तर फिजिक्सवाला या अलीकडच्या युनिकॉर्नने देखील हाच पॅटर्न अवलंबल्याची माहिती आहे. 

ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडेमीची जुलैच्या मध्यापर्यंत नऊ शहरांमध्ये १५ ऑफलाइन केंद्र असतील, अशी माहिती कंपीनीने दिली आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफलाईन होण्याचं कारण काय? 

देशात कोविडचे रुग्ण कमी झाल्याने आता शाळा आणि महाविद्यालये परत पूर्ववत सुरू झाली आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या मागणीत घट झाली असल्याचं दिसतंय. त्यामुळे भारतातील एडटेक कंपन्यांना फटका बसत आहे. या कंपन्यांनी अनेक लोकांना जॉब वरून काढून टाकलं आहे.

मे २०२२ मध्ये आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, वेदांतू या ऑनलाइन ट्यूटोरिंग प्लॅटफॉर्मने २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. अनअकॅडमीने एप्रिलमध्ये त्यांच्या ६०० कर्मचाऱ्यांना ‘खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग’ म्हणून काढून टाकलं आहे. 

जुनमध्ये बायजूजच्या मालकीचं एडटेक स्टार्टअप व्हाईटहॅट ज्युनियरने जागतिक स्तरावर सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. ज्याचं कारण देण्यात आलंय – वाढता खर्च जो त्यांना आता झेपत नाहीये.

या कंपन्यांचा खर्च वाढणं आणि त्यांना कर्मचारी परवडेनासे होणं याचं कारण या कंपन्यांची कमाई कमी झाली आहे. जरी युनिकॉर्म कंपन्यांच्या क्लबमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला असेल तरी आता ऑफलाईन जीवनाकडे शैक्षणिक क्षेत्र वळलं असल्याने दिवसेंदिवस विद्यार्थी संख्येची आणि त्यांच्या मेम्बरशिप घेणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली आहे.

म्हणून आता या कंपन्यांनी तग धरून ठेवण्यासाठी ऑफलाईन क्षेत्राकडे झेप घेतली आहे, असं बोललं जातंय.

तर या कंपन्यांचं ऑफलाईनकडे वळण्याचा दुसरं कारण एडुरेकाचे बिझनेस हेड हिमांशू दांडोतिया यांनी सांगितलंय… 

ऑनलाइन-ओन्ली या शिक्षणाच्या वातावरणाला अनेक मर्यादा आहेत. यामध्ये गट-आधारित शिक्षण (group-based learning) होत नाही, सामाजिक-कौशल्य विकासास अडथळा येतो, प्राध्यापकांशी व्यक्तिशः संवाद होऊ शकत नाही म्हणून शिक्षा आणि विद्यार्थ्यांमधील कनेक्शन राहत नाही. हे दूर करायचा प्रयत्न केला जात आहे.

याशिवाय काही क्षेत्र जिथे इंटरनेट पोहोचू शकत नाही तिथल्या मुलांना चान्गल्या दर्जाच्या शिक्षणाची उपलब्धता व्हावी अशी आमची इच्छा असून हळूहळू त्याकडे मार्गक्रमण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं, एडुरेकाचे हिमांशू दांडोतिया म्हणालेत.

ऑफलाईन कोचिंगची मागणी कोणत्या विद्यार्थ्यांची आहे हे अनअकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाल यांनी सांगितलंय.

इंजिनिअरिंगसाठीची जेईई परीक्षा आणि मेडिकलसाठीची एनईईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना बाहेर पडून कोचिंग घ्यायचं आहे. त्यांनी प्रत्यक्ष शिक्षकांसोबत राहून शिकावं, अशी पालकांची इच्छा आहे. कोणत्याही पर्यवेक्षणाशिवाय पूर्णपणे घरीच अभ्यास करणं हे आव्हानात्मक असल्यासारखं त्यांना वाटतं. त्यामुळे आपल्या पाल्यांना ऑफलाइन शिक्षणाच्या ठिकाणी ते पाठवत आहेत.

अशात आपण जर ते देण्याचा प्रयत्न केला, तर काही गैर नाही. मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या कोचिंगने ऑफलाईनकडे वळणं म्हणजे ते संपले असं नाही, असं गौरव मुंजाल म्हणालेत. 

पुढे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइनचे संयोजन, असं वेदांतूचे सीईओ आणि को-फाउंडर वामसी कृष्णा म्हणालेत.

असो, ऑफलाईन असो की ऑनलाईन दर्जेदार शिक्षण मिळणं हा मुख्य मुद्दा आहे. तेव्हा आता हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफलाईन झाल्याने त्यांची किती बढती होते आणि ते विद्यार्थ्यांची किती बढती करतात, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.