डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सरेंडर करण्याची वेळ का आली?

तिसऱ्यांदा निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले असे राष्ट्राध्यक्ष ठरले ज्यांना कुठल्या तरी प्रकरणात अटक करण्यात आली. मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना का अटक करण्यात आली? अटक करण्यात आल्यानंतर त्यांची सुटका लगेच कशी झाली? हे जाणून घेऊयात.

सुरवातीला आपण पाहू डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्याचं कारण काय होतं ते..

तर २०२० मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. एकदा राष्ट्राध्यक्ष राहिलेले डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी संघर्ष होणार होता. ३ नोव्हेंबर २०२० ला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर ६ जानेवारी २०२१ ला या निवडणुकीचा निकाल लागणार होता. त्यानुसार  कॅपिटल हिल म्हणजेच अमेरिकन संसदेत निकाल जाहिर करण्यात आला. या निकालात जो बायडन यांना ३०६ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ इलेक्टोरल मतं मिळाली. त्यामुळे अमेरिकन संसदेत जो बायडन विजयावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरु होती.

याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला आणि त्यांनी तिथे तोडफोड करण्यास व गोंधळ करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनीच त्यांच्या समर्थकांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मतमोजणीमध्ये भ्रष्टाचार झाला असून प्रत्यक्षात आपलाच विजय झाल्याचं त्यांनी समर्थकांना सांगितलं त्यामुळे समर्थकांनी चिडून कॅपिटल हिलवर हल्ला केला असा आरोप आहे.

याशिवाय आता ट्रम्प यांच्यावर नव्याने एक आरोप करण्यात आलाय तो म्हणजे बनावट इलेक्ट्रॉल तयार केल्याचा. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी २ पातळ्यांवर मतदान होतं. एक म्हणजे जे सर्वसामान्य करतात ते आणि दुसर म्हणजे त्या त्या राज्यातून निवडून आलेल्या प्रतिनीधींनी केलेलं मतदान. याच मतांना इलेक्ट्रॉल मत म्हणतात.

अमेरिकेतल्या एऱिझोना,जॉर्जिया, मिशीगन, न्यु मेक्सिको, नवादा, पेनसिलवेनिया आणि विस्कान्सिन या राज्यांमधली मतं दोन्ही उमेदवारांना विजयासाठी महत्त्वाची होती.

ट्रम्प यांनी याच ७ राज्यातून काही बनावट मतं तयार करून ती ग्राह्य धरण्यात यावीत यासाठी कट रचला. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर निकाल फिरवण्याचाही आरोप नव्याने लावण्यात आला होता. ट्रम्प यांच्यावर सध्या अमेरिकेची फसवणूक करण्याचा कट रचणे, कारवाईमध्ये अडथळा आणणे, नागरिकांच्या हक्काविरोधात कट रचणे, साक्षीदारांवर दबाव टाकणे असे ४ आरोप लावण्यात आलेले आहेत. हे सगळे अरोप पहाता त्यांना शुक्रवार दुपारपर्यंत सरेंडर होण्याची मुदत देण्यात आली होती.

त्यांना देण्यात आलेल्या आदेशानुसार काल डोनाल्ड ट्रम्प हे सरेंडर झाले आणि त्यानंतर २० मिनीटांनी त्यांची सुटकाही करण्यात आली.

ट्रम्प यांनी २०२० मध्ये जॉर्जियाच्या निवडणुकांत गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर अटक होण्याची टांगती तलवार होती. मात्र, ते गुरुवारी  सरेंडर होत पोलिस ठाण्यात हजर झाले. या ठिकाणी त्यांचे आरोपीसारखे फोटो देखील काढण्यात आले. यानंतर अटलांटा येथील फुल्टन काउंटी तुरुंगातून तब्बल २० लाख  रूपये रोख आणि इतर अटींसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. सरेंडर केल्यानंतर त्यांच्या सर्व समर्थकांनी पोलिस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. ट्रम्प २० मिनटानंतर बाहेर आल्यावर मिडीयाशी बोलताना म्हणाले, “माझ्यावर लावलेले सर्व अरोप खोटे आहेत आणि हा न्यायाचा घात आहे.”

 डोनाल्ड ट्रम्प यांची अटक होण्याची ही पहिली वेळ असली तरीही याआधीही ट्रम्प  पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिएलला पैसे दिल्याच्या प्रकरणात अडकले होते.

त्यांना या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. आरोपांमध्ये म्हटल्याप्रमाणे स्टार्मी डॅनिएल आणि ट्रम्प यांचं अफेअर होतं आणि हे प्रकरण लपवण्यासाठी ट्रम्प यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक प्रचारात अफरातफर करत डॅनिएलला पैसे दिले. त्यांनी त्यांचे वकिल मायकल कोहेन यांच्यामार्फत डॅनिएलला पैसे  दिले आणि नंतर हिशोबात फेरफार करून ते पैसे फेडले.

त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे गोपनीय कागदपत्रे लपवल्याबद्दल त्यांच्यावर करण्यात आलेला खटला.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतरही देशाच्या सुरक्षेशी संबधित असलेले कागदपत्रं स्वतःजवळ बाळगली होती.

ट्रम्प यांनी ही कागदपत्रं  बाथरूम, स्टोअररूम, बेडरूम अशा ठिकाणी लपवून ठेवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.याशिवाय ट्रम्प यांचं चर्चेत आलेलं प्रकरण म्हणजे एका मासिकाच्या लेखिका इ.जीन कॅरल यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तन आणि बदनामीचा अरोप लावला होता. या प्रकरणात न्यूयॉर्कमधील एका न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. याशिवाय न्यायायलायने त्यांना ५० लाख दंडदेखील ठोठावला होता. यापैकी काही प्रकरणांवर आजही सुनावणी सुरु आहे. आज जरी त्यांची सुटका झाली असली तरी अनेक आरोपा संदर्भात अजूनही सुनावण्या सुरू आहेत.

त्यामुळे हे सर्व आरोप सिध्द झाले तर डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडणूक लढवण्याचं व पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनण्याच स्वप्न भंगू शकतं.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.