तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो ?

नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला जातो. तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो.

अंबाबाईला हा मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा फार जुनी नाही. ही परंपरा अलीकडच्या काळात म्हणजेच २५ वर्षांपूर्वी सुरु झालीय. त्याच परंपरेनुसार यंदा पण तिरुपती देवस्थानकडून हा शालू अंबाबाईला अर्पण केला. मिलिंद नार्वेकर यांनी हा शालू देवीच्या चरणी अर्पण केला.  

पण हा शालू अंबाबाईला अर्पण करण्याच्या परंपरेवरून अनेकदा मोठे वाद सुद्धा निर्माण झालेले आहेत. 

२०१५ मध्ये भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले होते की, कोल्हापूरची अंबाबाई ही श्रीलक्ष्मी नसून अंबाबाई अर्थात पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे ज्या आख्यायिकेनुसार तिरुपती बालाजी मंदिराकडून अंबाबाईला श्रीलक्ष्मी समजून शालू पाठवण्यात येतो ती आख्यायिका चुकीची आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. या विरोधानंतर सुद्धा परंपरा चालूच आहे… 

पण या परंपरेमागे सांगण्यात येणारी आख्यायिका आणि देवीच्या मुळ स्वरूपाच जो दावा केला जातो त्याबद्दल ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ काय आहेत. त्यावरूनच सगळं कोडं उलगडेल.

कोल्हापूरच्या समग्र इतिहासावर लिहिण्यात आलेल्या ‘युगयुगीन करवीर’ या पुस्तकात सुहास मधुकर जोशी यांनीश्री करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या मूलस्वरूपाचा शोध’ हे प्रकरण लिहिलंय.

यात पहिल्यांदा देवीच्या अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावांचा अर्थ समजून घ्या.

अंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या शब्दापासून झालीय. 

जसे देवाला परब्रह्म किंवा जगत्पिता असे नाव आहेत अगदी त्याचप्रमाणे देवीला जगत अंबा म्हणजेच जगदंबा म्हणतात. पण काळाच्या ओघात जगदंबा शब्दातील जगत् हा शब्द नाहीसा झाला आणि केवळ अंबा हा शब्द रूढ झाला. याच अंबा शब्दाला बाई या स्त्रीदर्शक शब्दाची जोड मिळाली. त्यातूनच अंबाबाई हा शब्द निर्माण झाला आणि प्रचलित झाला.

महालक्ष्मी नावाचा अर्थ सकल अनादी व सर्व ईश्वरांची स्वामीनी असा होतो

ती ब्रह्मरुपाने निराकार आहे तसेच त्रिगुणाने नानाविध नावं धारण करून जगात नांदत आहे. ज्याप्रमाणे सर्व देवांमध्ये महादेव जसे एकमेव सर्वश्रेष्ठ आहेत. त्याचप्रमाणे सर्व लक्ष्मीगणांमध्ये महालक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावांचा अर्थ एकसारखाच आहे. 

देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असा होतो त्यामुळेच देवीला ब्रह्माडांची निर्माती मानलं जातं.

महालक्ष्मीने म्हणजेच जगदंबेनेच जगातील सर्व देवी देवतांची निर्मिती केली असं मानलं जातं. महालक्ष्मीने स्वतःच्या तमतत्वापासून महाकाली तर शुद्ध तत्त्वापासून महासरस्वती या दोन देवता उत्पन्न  केल्या. त्यानंतर महालक्ष्मीप्रमाणेच महाकालीची स्वतःमधून श्रीशंकर आणि स्वर या देवतांची निर्मिती केली तर महासरस्वतीने श्रीविष्णू आणि सतिगौरी या दोन जोड्या निर्माण केल्या. त्यामुळे महालक्ष्मीला जगन्माता मानलं जातं. 

आता महत्वाचा प्रश्न हा आहे की कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णुपत्नी आहे का? 

तर नाही…

कारण कोल्हापुरात महालक्ष्मीचं मंदिर आहे तर विष्णुपत्नीचं नाव श्रीलक्ष्मी आहे. 

आख्यायिकेनुसार, भृगुऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवतांच्या लोकात गेले. तेव्हा ब्रह्मदेव आणि महादेवाला श्राप दिल्यानंतर भृगुरूशी वैकुंठात गेले. तेव्हा श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते म्हणून दोघांनीही भृगुऋषीकडे लक्ष दिलं नाही. 

त्यामुळेच रागाच्या भरात भृगुऋषींनी श्रीविष्णूच्या छातीवर लाथ मारली. प्रहाराने सावध झालेल्या श्रीविष्णूने भृगुऋषींना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. छातीवर प्रहार केल्यामुळे पायाला त्रास झालं असेल म्हणून श्रीविष्णूंनी ऋषींचे पाय धुवून त्याची सेवा केली. यामुळे भृगुऋषींचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी श्रीविष्णू जगात सर्वोत्तम आहेत असं पृथ्वीवर सांगितलं. 

मात्र ज्या हृदयात श्रीलक्ष्मीचा वास आहे तिथे लाथ मारणाऱ्या भृगुऋषींची श्रीविष्णूने सेवा केली. यामुळे श्रीविष्णूंवर नाराज झालेल्या श्रीलक्ष्मीने वैकुंठ सोडला आणि करवीरला आल्या. 

याबद्दल सुहास जोशी हे लिहितात की,

“कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया आहे तर तिच्यापासून तयार झालेली श्रीलक्ष्मी ही तिची मुलगी आहे. त्यामुळे श्रीविष्णू हे महालक्ष्मीचे जावई ठरतात. तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मीपासूनच झालेली आहे त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात. तसेच श्रीलक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजेच माहेरी आल्या होत्या.” असं सुहास जोशी लिहितात. 

दहा महाविद्यासमूहातील कमला देवीची निर्मिती ही समुद्र मंथनातून झालेली होती. तसेच त्यांनी महाविष्णुंशी विवाह केला असा उल्लेख आढळतो. त्यामुळे भृगुऋषींच्या अपमानाने तीच कमला कोल्हापुरात आल्यामुळे महालक्ष्मीचे मुळस्थान कोल्हापुरातच असल्याचा दावा सुहास जोशी यांनी केलाय.

या पौराणिक संदर्भाच्या आधारावर तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू दिला जातो. 

१९८३ सालात तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली. हळूहळू अनौपचारिक पद्धतीने ही परंपरा रुळायला लागली होती. परंतु १९९७ सालात अंबाबाईला पाठवण्यात येणाऱ्या शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली होती. 

याबद्दल कांचीकामकोटीचे शंकराचार्य देवेंद्र भरती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्र लिहिले होते.

“तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हलक्या दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी. तसेच तो शालू अतिशय उत्तम पद्धतीचा आणि देवीला शोभेल असा असावा” अशी मागणी शंकराचार्यांनी केली होती.   

त्यांच्या मागणीनंतर तिरुपती मंदिराकडून अतिशय महागडा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला दरवर्षी पाठवण्याची परंपरा सुरु झाली, ती आजगायत चालू आहे. 

पौराणिक संदर्भासोबतच अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि शिलालेखांवरून कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव महालक्ष्मी असल्याचे आढळून येते. याबद्दल डॉ. गो. ब. देगलूरकर, ऋताताई ठाकूर यांनी ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून करवीरला ज्या देवीचे मंदिर आहे ते महालक्ष्मीचेच आहे असे सांगितलेय.

याबद्दल ऋताताई ठाकूर लिहितात की, “करवीरवर राज्य करणाऱ्या शिलाहार राजवंशाच्या राजांनी स्वतःस श्रीमहालक्ष्मीलब्धवरप्रसादादी म्हणून भूषवले होते. तर अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर शिलालेखात यादव राजा सिंघण यांचा अधिकारी लक्ष्मण याने “महालक्ष्मीच्या पूजाअर्चेसाठी जी दानधर्मे केलीत त्याचा उल्लेख आहे.”

तसेच शक्तिपीठांच्या आख्यायिकेनुसार, कोल्हापुरात देवी सतीच्या हृदयाच्या वरील भाग पडलेला होता त्यामुळे अंबाबाईचा संबंध पार्वती आणि शंकराशी जुळलेला आहे. तसेच पार्वतीचा उल्लेख सुद्धा अनेक ठिकाणी महालक्ष्मी असा केला जातो असे ऐतिहासिक संदर्भात दिसून येते. त्यामुळे देवी अंबाबाईला पार्वती आणि महालक्ष्मी हे दोन्ही संबोधन लागू पडतात असं संशोधक सांगतात.

परंतु महालक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी ही दोन नावं सारखीच वाटत असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे विष्णुमाता आणि विष्णुपत्नी यात संभ्रम तयार होतो असे जाणकार सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.