ई सिगरेट काय भानगड असते, सरकार त्यावर बंदी का आणतय..?

एखाद्या गोष्टीवर बंदी आणली की ती गोष्ट आपणाला कळती. कोणतरी मोठ्ठा माणूस म्हणून गेला आहे संधीअभावी माणसं चारित्र्यवान राहतात. व्यसन न करणारे आपण देखील तसेच चारित्र्यवान असाल. नसाल तरी गायछाप पासून ते जॉईन्ट पर्यन्त आपला प्रवास सुखाचा झाला असेल. पण ई सिगरेट पासून आजवर आपण लांबच असाल. महाराष्ट्रात ई सिगरेट वापरणाऱ्यांच प्रमाण तसही जास्त नाही.

कारण काय तर आत्ता कुठेतरी हे फॅड वाढत होतं. तोपर्यन्त त्यावर बंदी देखील आली. आत्ता बंदी आली म्हणजे इतकच फरक पडतो की ती गोष्ट सार्वजनिक विकली जाणार नाही. म्हणजे कस आत्ता विमलची पुडी जसा पानपट्टीवाला हाताखाली दाबून देतो. तशीच ई सिगरेट देखील गुप्तपणे देण्याचा प्रयत्न होईल. 

पण हे ई सिगरेट काय मॅटर आहे, बंदी आणण्याएवढं यात काय असत. वगैरे वगैरे प्रश्न सोडवण्यासाठी हा लेख.

ई सिगरेटवर बंदी कशासाठी? 

सिगरेटमध्ये काय असत तंबाखू. तंबाखूत काय असतं तर निकोटीन. ते निकोटीन चढत. ई सिगेरटमध्ये तंबाखू नसते. थेट निकोटीन असतं. पण तंबाखूच्या निकोटीनला मान्यता आहे. तंबाखूव्यतिरिक्त कृत्रिम निकोटीनला मान्यता नाही. म्हणून ई सिगरेटवर बंदी. आत्ता हि बंदी कुठल्या कायद्यात बसते तर ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक एक्ट १९४०. म्हणजे ब्रिटीशांचा कायदा. 

ई सिगरेट म्हणजे नेमक काय असतय? 

ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेट. याचा शोध चीनच्या हॉन लिकने २००३ ला लावला. लागलीच पेटंट घेवून २००४ पासून ई सिगरेट बाजारात आणली. 

ई सिगरेटमध्ये बॅटरी, निकोटीनचे कार्टेज आणि हिटर असतो. या तीन गोष्टी एकत्र करून त्याला कधी सिगरेट सारखा तर कधी किचेन सारखा आकार दिला जातो. म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या असतील पण या तीन मुख्य गोष्टी त्याच्यात असतातच. एकदा ई सिगार चार्ज केली की बॅटरी फुल्ल होते. बॅटरी असली की बटन दाबताच हिटर चालू होता. हिटर आतल्या आत निकोटीन कार्टेजमधून निकोटीन घेतो आणि त्यांच रुपांतर बाष्पात करतो. 

साध्या सिगरेटमध्ये धूर होतो. धूरात टार असतो. कुठलाही पिक्चर बघायला गेल्यानंतर सिगरेटमुळे वर्षांभरात किती टार गोळा होता ते तुम्ही बघितलच असेल. अहो धडधाकट मुकेश तिथं शेवटचा घटका मोजत बसतो. तर असा टार ई सिगरेटमध्ये तयार होत नाही. कारण काय तर इथे धूर नाही. बाष्प आहे. म्हणजे हवा. त्यामुळे सिगरेट पिताना जसा ठसका लागू शकतो, धुर आत घेतल्याचा फिल येतो तसा प्रकार इथे नसतो. बाष्प आत घ्यायचं आणि सोडायचं. सर्दी झाल्यावर कसं निकोटिक्स टाकून गरम हवा आत घेत असता एकदम तशीच हवा. पण ती तितकी गरम नसते. 

आत्ता प्रश्न पडतो की सिगरेट पेक्षा तर ई सिगरेट बरच आहे. त्यात टार नाही. फुप्फुसाला काय होवू शकणार नाही. मग कशाला बंदी. 

जस सिगरेटच्या रोलमध्ये नेहमी तंबाखूच असते अस नसत भिडू लोकांना. तिथे खास “माल” टाकणारे देखील असतात. तसच इथं असतय इथे निकोटीनच्या कार्टेजमध्ये दूसरं जास्त घातक ड्रग्स देखील टाकता येतील. लक्षात घ्या ई सिगरेट फक्त एक उपकरण आहे. चांद्रयान पाठवायला कस रॉकेट लागतं. खरं माल तर विक्रम ऑरबिटर असतो. तस हे असतय. ई सिगरेटचा वापर करुन दूसऱ्या घातक ड्रग्स वापरले जातील म्हणून यावर बंदी आणण्याची  मागणी होते. 

त्याचसोबत इथे जे निकोटीनं असत ते आर्टिफिशियल असतं. ते ड्रग्सच्या मानकात बसत नाही. त्यात फॉर्मेल्डिहाईड नावाचा घटक असतो. दोघं मिळून तुम्हाला अटॅक पासून कॅन्सरपर्यन्त जे काय हवं असेल ते मोकळ्या मनाने देवू शकतात. त्यामुळेच बंदी. 

हि बंदी कुठल्या कुठल्या देशात आहे. 

सिंगापूर, ब्राझील देशात बंदी आहे तर अमेरिका, कनाड्डा सारख्या देशात यावर रिस्ट्रिक्शन लावण्यात येत आहेत.  WHO या आरोग्य संस्थेने देखील ई सिगरेट बंद करण्यासंबधित अहवाल दिले आहेत. 

पण हि बंदी तर भाजप शासनाने लावली आहे. तुम्ही जर भाजपविरोधी असाल तर इतकच म्हणून शकता की, या ई सिगरेटमुळे सिगरेट उत्पादक कंपन्याना तोटा होत आहे. आपल्या तरुणाईला मुकेशच्या दिशेने हे सरकार घेवून जात आहे. मुकेश अंबानीची स्वप्न दाखवण्याऐवजी हे सरकार त्यांना मुकेश हराणेचा मार्ग दाखवत आहे. 

पण यातून हाती विशेष लागणार नाही, वास्तविक वाघ म्हणलं तरी खाणारा वाघोबा म्हणलं तरी खाणार असा प्रकार आहे हा. सो सिगरेट काय किंवा ई सिगरेट काय कॅन्सर तर होणार भिडू.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.