LIC चा IPO येतोय पण किंमत निम्म्यावर म्हणजेच 12 लाख कोटींवरून 6 लाख कोटी कशी झालेय
LIC चा IPO येणार येणार अशा बऱ्याच दिवस चर्चा झाल्या. भारतातल्या सगळ्यात मोठ्ठ्या कंपन्यांनपैकी एक असलेल्या LIC च्या IPO ची बाजारात पण उत्सुकता होती. आता IPO सारखं शब्द काढल्यावर तुम्ही ह्यो सगळा शेअर बाजाराचा हिशेब आहे असं समजून विषय सोडू नका.
आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर IPO आणण्याच्या प्रक्रियेद्वारे LIC च्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरु होणार आहे.
सरकारनं आता या प्रक्रियेचे संपूर्ण डिटेल्स दिले आहेत. त्यामध्ये IPO ची जी किंमत आहे आणि त्यावरून LIC चं जे वॅल्युएशन झालंय त्यावरून टीका होऊ लागलेय.
त्यामुळं बघूया हा सीन नक्की काय आहे.
तर LIC ने बुधवारी जाहीर केले की त्यांनी त्यांच्या आगामी IPO साठी ९०२-९४९ रुपये प्रति शेअर प्राईझ बँड निश्चित केला आहे.
LIC मधील ३.५ टक्के भागिदारी विकून २१,००० कोटी रुपये मिळतील असा सरकारचा अंदाज आहे. LIC आता २ कोटी २१ लाख इक्विटी शेअर्स विकण्याचा विचार करत आहे. याआधी ३ कोटी सोळा लाख शेअर्स विकण्याचा सरकारचा विचार होता. इश्यू साइझ सुदधा नियोजित ५% वरून ३.५% इक्विटी पर्यंत कमी केला आहे.
आणि सगळ्यात मेन म्हणजे गव्हर्नमेंटने LIC चं वॅल्युएशन अर्ध्याने कमी केलं आहे.
फायनांशियल एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार सरकार LIC चे मूल्यांकन १२ लाख कोटींवरून ६ लाख कोटी रुपयांवर आणलं आहे.
सरकारच्या याच निर्णयावर आता जोरदार टीका केली जात आहे. केरळचे माजी अर्थमंत्री आयझॅक थॉमस यांनी याच कारणामुळं या प्रकरणाला ‘Mother Of All Scam’ असं म्हटलं आहे.
“एलआयसीचा आयपीओ सुरुवातीला १० टक्के होल्डिंगसाठी होता, नंतर तो ५ टक्के झाला आणि आता ३.५ टक्के झाला आहे. एलआयसीचे बाजार मूल्य २० लाख कोटींवरून ६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली घसरलं आहे.
त्यामुळं इशू साइझ ६०,००० कोटी रुपयांपासून २२,००० कोटी रुपयांपर्यंत आली आहे. कुठल्याही किंमतीत LIC विकायला सरकार एवढं का उतावळं झालाय?”
मात्र मार्केटमधले जे तज्ञ आहेत त्यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. सरकारच्या LIC चं मूल्यांकन कमी करण्यामागचं महत्वाचं सर्वात महत्वाचं कारण सांगण्यात येतं मार्केटमध्ये साध्य असलेली अस्थिरता.
यावर ज्येष्ठ पत्रकार माधवन नारायणन बोललेत,
“जागतिक स्तरावर बाजार थोडा अनिश्चित मूडमध्ये आहे. जर तुम्ही आजची महागाई पाहिली तर ऑस्ट्रेलियाची महागाई २० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे आणि भारताची महागाई दर डबल डिजिट झाला आहे.
त्यातच युक्रेन युद्ध देखील चालू आहे. या युद्धात तर आण्विक युद्धापर्यंतचे अंदाज बांधले जात आहेत.”
ही सर्व कारणं पाहता LIC चा IPO स्वस्तात आणणं गरजेचं होतं असं सांगण्यात येतं.
त्याचबरोबर वॅल्युएशन कमी केल्यानं LIC चा स्टॉक घेणं रिटेल इन्वेस्टर्सना देखील शक्य होईल आणि त्याचबरोबर स्टॉक कॉम्पेटेटिव्ह देखील होईल.
सध्या मार्केटमध्ये मंदी आहे. देशाबाहेरून येणारी इन्व्हेस्टमेंट देखील आटली आहे. उलट बाहेरच्या फायनांशियल इन्स्टिट्यूट्सनी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळं १२ लाखांऐवजी ६ लाख वॅल्युएशन करून IPO आणल्याने रिटेल आणि इन्स्टिटूशनल असे दोन्ही इन्वेस्टर्स LIC च्या स्टॉकमध्ये इंटरेस्ट दाखवतील असं तज्ञ सांगतात.
यामध्ये असाही एक मतप्रवाह आहे ज्यांचं म्हणणं आहे की LIC चं जे वॅल्युएशन आहे ते ना कमी आहे ना जास्त.
त्यांच्या म्हणण्यानुसार LIC चं अगदी योग्य योग्य वॅल्युएशन झालं आहे. असंही अनेकदा वॅल्युएशन हे अंदाजे होत असतं त्यामुळं वॅल्युएशनचा नेमका आकडा सांगता येत नाही.
त्याचबरोबर LIC ही एक भरवशाची कंपनी आहे. भारतल्या इंशुरन्सचं ६०% मार्केट आजही LIC च्या ताब्यात आहे. त्यामुळं LIC ही ग्यारेंटेड रिटर्न्स देणारी कंपनी आहे. आणि त्यातच सरकारने IPO ची किंमत कमी ठेवल्यानं लॉंग टर्मसाठी गुंतवणूकदार इन्व्हेस्ट करतील असं सांगण्यात येत आहे.
सरकारनं २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ६५,००० कोटींचं डिसइन्वेस्टमेन्ट टार्गेट ठेवलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी सरकारला LIC चे शेअर्स विकणं भाग आहे.
म्हणूनच मार्केट डाऊन असताना देखील सरकार IPO आणत आहे.
म्हणजे ओव्हरऑल सांगायचं तर अगदी आयझॅक थॉमस म्हणतायेत तशी सरकारला LIC चं खाजगीकरण करण्याची घाई तरी असल्याचं दिसतंय आणि त्यासाठीच मार्केटची कंडिशन लक्षात घेऊन सरकारनं LIC च्या IPO चि किंमत ही अपेक्षेपेक्षा कमी ठेवली आहे.
हे ही वाच भिडू :
- एलआयसीच्या IPO चा जीवन विम्याची पॉलिसी घेतलेल्यांवर काय फरक पडेल
- भारतातली पहिली इन्श्युरन्स कंपनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली होती…
- आणि भारतात सरकारी कंपन्यामधला हिस्सा विकायला थेट मंत्रालय स्थापन झालं..