एका बातमीने भावी पंतप्रधान रेसमधून बाहेर फेकले गेले…

दिल्लीच्या राजकारणात बातम्यांना फार महत्व आहे. 

कोण कोणाच्या विरोधात कशा बातम्या छापून आणतो या गोष्टींवर राजकारणाची बरीच सुत्र फिरतात. म्हणजे हल्लीच उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांच संभाव्य पंतप्रधानपद देखील एका बातमीमुळे हुकलं होतं. 

असच काहीसं वसंतराव साठेंच्या बाबतीत झालं होतं. वसंतराव साठेंनी जेव्हा रंगीत टिव्ही आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सुरवात केली तेव्हा ते इंदिरा गांधींच्या जवळचे व्यक्ती म्हणून गणले जावू लागले.

अशा वेळी त्यांच्या विरोधात बातम्या पेरल्या जावू लागल्या. अगदी त्यांचे एका महिला पत्रकारांसोबत संबंध आहेत असही छापून आणण्यात आलं. 

तिसरा किस्सा म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा. बाबू जगजीवन राम जेव्हा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्या मुलाचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो सुर्या मॅक्झिनमध्ये छापून आणण्यात आले. त्यामुळे ते देखील या स्पर्धेतून बाहेर पडले. 

थोडक्यात काय तर रितसर गेम करणे ही दिल्लीची खासियत आहे… 

असो तर अशा प्रकरणांमधला सर्वात जूना किस्सा सांगायचा झाला तर तो नेहरूंच्या अकाली निधनानंतरचा. 

किस्सा सांगण्यापूर्वी संबंधित माणसाच्या महत्वकांक्षा सांगण देखील महत्वाचं ठरणार आहे. तर या व्यक्तीचं नाव होतं मोरारजी देसाई. मोरराजी देसाई ही व्यक्ती नेहरूंना आपल्या मंत्रीमंडळात पाहीजे होती. त्यासाठी त्यांना १९५६ मध्ये नेहरूंनी दिल्लीत बोलावून १४ नोव्हेंबर १९५६ रोजी देशाचं उद्योग व वाणिज्य मंत्रीपद दिलं. १९५८ साली टिटी कृष्णमाचारींना राजीनामा द्यावा लागला व त्यांच्या अर्थमंत्रीपदावर मोरारजी देसाई यांची नियुक्ती झाली. 

या काळात दिल्लीच्या राजकारणाला मोरारजी सराईत झाले. त्यांच्या इच्छा, आकांक्षा वाढू लागल्या.. 

ती तारिख होती २७ मे १९६४ 

या दिवशी पंडीत जवाहरलाल नेहरूंच निधन झालं. 

नेहरू यांच्यानंतर कोण असा प्रश्न उभा राहिला. यावर अनेक नावे चर्चेत आली. कोण इंदिरा गांधींच नाव चर्चेत आणू पहात होतं तर कोणी लालबहादूर शास्त्रींना दावेदार ठरवत होतं. अशाच काळात मोरारजी देसाई यांच्या नावाची देखील चर्चा होवू लागली. याच चर्चेनंतर दूसऱ्या दिवशी म्हणजे २८ तारखेला एका थोरल्या पत्रकाराने मोरारजी देसाई यांच घर गाठलं.. 

या भल्या थोरल्या पत्रकाराचं नाव होतं कुलदीप नय्यर.. 

कुलदीप नय्यर मोरारजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. इथे मोरारजी भेटले नाहीत पण त्यांना मोरारजी यांचा मुलगा कांतीभाई भेटला. कांतीभाईच्या हातात एक कागद होता. कुलदीप यांनी कोणता कागद आहे हे विचारताच भोळ्या कांतीभाईने सांगून टाकलं की, 

मोरारजी देसाई यांना पंतप्रधान पदावर बसण्यासाठी जे लोक पाठींबा देणार आहेत त्यांची ही यादी आहे… 

थोडक्यात कार्यक्रम झाला. कुलदीप नय्यर घरी आले आणि त्यांनी एक लेख लिहून टाकला. यूनाइटेड न्यूज ऑफ इंडिया मध्ये हा लेख पब्लिश झाला. त्यानंतर हा लेख एकामागून एक अशा सर्वच वर्तमानपत्रांनी छापण्यास सुरवात केली. 

या लेखात कुलदीप नय्यर यांनी लिहलं होतं की, 

मोरारजी हे पहिले व्यक्ती जे नेतृत्व करण्यासाठी स्वत:हून समोर आले आहेत. उलटपक्षी शास्त्री मागे राहिले आहेत. 

कुलदीप नय्यर यांच्या लेखाचा एकंदरीत सुर हा नेहरूंसारख्या व्यक्तीच्या जाण्यानंतर अशा प्रकारचं राजकारण करणं कितपत योग्य हा होता. त्याचा पाहिजे तो परिणाम झाला आणि मोरारजी देसाईंना पाठींबा देणाऱ्या १०० हून अधिक खासदारांनी माघार घेतली. 

नेहरूंच्या निधनावर सर्वजण शोकाकूल असणाना सत्तेसाठी सारीपाठ मांडण कितपण योग्य आहे असा एकंदरीत सुर निर्माण झाला. आणि मोरारजी देसाईंच नाव मागे पडलं. पण देसाई पण कडवे होते. त्यांच्या नशिबात पंतप्रधान पद लिहलेलं होतं फक्त ते मिळवायला त्यांना पुढची २० वर्ष खर्ची करावी लागली. 

ही सल मोरारजी देसाई यांच्या मनात मात्र राहिली होती. अरविंदर सिंह यांच्या पुस्तकात लिहलं आहे की, कुलदीप नय्यर यांना एका प्रश्नाचं उत्तर देताना मोरारजी देसाई त्यांना म्हणाले होते, 

१९६४ साली तूम्ही मला पंतप्रधान बनून दिलं असतं तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.