रोमँटिक सिनेमांचा बादशाह जेव्हा लाहोरमध्ये विस्फोट घडवून आणणार होता

भारतीय सिनेसृष्टीत रोमँटिक सिनेमांचा एक सुंदर असा प्रवाह आहे. राजेश खन्ना, देव आनंद पासून ते अगदी शाहरुख खान पर्यंत रोमँटिक कलाकारांची एक मोठी फळी भारतीय सिनेसृष्टीत पाहायला मिळते. मुळात एखादा कलाकार ज्या पद्धतीच्या भूमिका करतो , ज्या धाटणीचे सिनेमे करतो त्यानुसार त्याची एक छबी प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते.

पण भिडूंनो, नव्या – जुन्या अनेक पिढीतील प्रेक्षकांना रोमँटिक सिनेमे बघायची ज्या दिग्दर्शकाने सवय लावली तो दिग्दर्शक म्हणजे यश चोप्रा.

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण रोमँटिक सिनेमे बनवणाऱ्या यश चोप्रांनी सुरुवातीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी केल्यामुळे, त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली त्यांचा जन्म झाला. या काळात देशात असलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा खूप दूरगामी परिणाम चोप्रा कुटुंबियांवर झाला. पंजाब आणि बंगाल येथे झालेल्या दंगली, हिंसा, देशाची फाळणी अशा सर्व गोष्टी चोप्रा कुटुंबीयांनी पाहिल्या.

या वातावरणात एका घटनेत यश चोप्रांच्या वडिलांचं निधन झालं. अशा परिस्थितीमध्ये यश चोप्रांची वाढ होत होती.

तेव्हा चोप्रा कुटुंबीय लाहोरमध्ये रहात होते. आसपासच्या कुटुंबामधली मुलं संघात जायची. यश चोप्रा सुद्धा शाखेचे सदस्य बनले. दररोज उठून शाखेमध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये यश चोप्रांचा सहभाग असायचा.

तो भारत पाकिस्तान फाळणीचा काळ होता. जिनांनी वेगळा पाकिस्तान मागून डायरेक्ट ऍक्शन डे वगैरे दंगली सुरू केल्या होत्या. विशेषतः पंजाब प्रांत पेटून उठला होता.

 वाढत्या वयात आसपास वातावरणाचा यश चोप्रांच्या आयुष्यावर एक वेगळाच आणि विपरित प्रभाव पडला.

एकदा यश चोप्रांच्या घरी तंदुरी जेवणाचा बेत केला होता. त्यासाठी यश चोप्रांच्या वहिनीने जेवण बनवण्यासाठी तंदुरीची शेगडी जशी पेटवली तसा घरात मोठा विस्फोट झाला.

या मोठ्या विस्फोटाला कारण असं की, यश चोप्रांनी दंगलीमध्ये जे बॉम्ब वापरतात ते बॉम्ब तंदूर शेगडीमध्ये लपवून ठेवले होते.

सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही.

स्वातंत्र्यानंतर फाळणी झाली, चोप्रा कुटुंब लाहोर वरून लुधियानाला आलं.

वय वाढेल तशा यश चोप्रा यांच्या करामती वाढत चालला होत्या. काहीच दिवसांनी एका लुटारू टोळीसोबत त्यांनी एका दुकानात चोरी करून त्या मालाचा काही भाग घरात लपवून ठेवला.

यश चोप्रांच्या आईने मुलाची ही करामत पकडली.

एकूणच यश चोप्रा त्यांच्या स्वभावामुळे आणि हरकतींमुळे घरच्यांना नाकीनऊ आणत होते. यामुळे आईकडून त्यांना बेदम मार मिळायचा. मुलाच्या आयुष्यावर आसपासच्या घटनांचा वाईट परिणाम होऊ नये, म्हणून त्यांना घरच्यांनी दिल्ली जवळ रोहतक शहरात त्यांच्या बहिणीजवळ पाठवले.

तिथं गेल्यावर सुधारलेल्या यशजींनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

त्यांना इंजिनियरिंग करायची होती व पुढील शिक्षणासाठी लंडनला जायची इच्छा होती.

दुसरीकडे यश चोप्रांचा मोठा भाऊ बी. आर. चोप्रा मुंबईत आले होते. त्यांनी यशला सुद्धा मुंबईला बोलावून घेतले. मुंबईत आल्यावर इकडच्या वातावरणाचा यश चोप्रांवर असा काही परिणाम घडला की इंजिनिअरिंग साठी
लंडनला जाण्याचा विचार बाजूला राहिला.

बी. आर. चोप्रा १९५३ साली ‘शोले’ सिनेमा दिग्दर्शित करत होते.

या ‘शोले’ मध्ये किशोर कुमार, बिना राय हे कलाकार होते. छोट्या भावाला सिनेमाविषयी अधिक जाणून घेता यावं, शिकता यावं म्हणून त्यांनी आय. एस. जोहर यांच्याकडे यशला सहाय्यक म्हणून कामाला ठेवले. काही दिवसांनी मोठ्या भावाने छोट्या भावाला स्वतःसोबत काम करण्यास घेतले.

बी. आर. चोप्रा यांनी ‘चांदनी चौक’ सिनेमासाठी यशला सहाय्यक म्हणून कामाला ठेवले.

यशचा पगार निश्चीत करण्यात आला. ‘एक ही रास्ता’, ‘नया दौर’, ‘साधना’ अशा अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये यशने मोठ्या भावासोबत सहाय्यक म्हणून काम केले. हे सर्व सिनेमे हिट झाल्याने बी. आर. चोप्रा फिल्म्स कंपनीला विश्वासार्ह सिनेनिर्मिती संस्था म्हणून ओळख मिळाली.

सहाय्यक म्हणून यश चोप्रा जवळपास ७ वर्ष काम करत होते.

एव्हाना सिनेमा बनवण्यासाठी आवश्यक अशा सर्व बाजू यश चोप्रांना माहीत झाल्या होत्या. सात वर्ष मोठा भाऊ छोट्या भावाला पाहत होता. त्यामुळे बी. आर. चोप्रांनी पुढच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यश चोप्रांना दिली. १९५९ साली आलेल्या बी. आर. चोप्रा फिल्म्स कंपनीचा ‘धुल का फुल’ हा यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा.

पहिल्याच सिनेमातून एक अफलातून दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी स्वतःची ओळख मिळवली.

यानंतर बी. आर. चोप्रा फिल्म्स कंपनी अंतर्गत ‘आदमी और इंसान’, ‘इत्तेफाक’, ‘वक्त’ यांसारखे सिनेमे यश चोप्रांनी दिग्दर्शित केले. १९६५ साली आलेल्या ‘वक्त’ चा विशेष उल्लेख अशासाठी की, हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील पहिला मल्टीस्टारर सिनेमा मानला जातो. छोटा भाऊ इंडस्ट्रीत बऱ्यापैकी स्थिरावला होता पण तो अविवाहित होता.

शेवटी बी. आर. चोप्रांच्या पुढाकाराने १९७० साली वयाच्या ३८ व्या वर्षी २० ऑगस्ट १९७० रोजी पामेला सिंग यांच्याशी यश चोप्रांनी विवाह झाला.

लग्न झाल्यावर मोठ्या भावाच्या सावलीतून मुक्त होऊन स्वतःची कंपनी निर्माण करून मुक्तपणे आभाळात भरारी मारण्याची यश चोप्रांना इच्छा होती. अखेर १९७१ साली यश चोप्रा यांनी ‘यशराज फिल्म्स’ची स्थापना केली. राजेश खन्ना, शर्मिला टागोर यांची भूमिका असलेला ‘दाग’ हा यशराज फिल्मची निर्मिती असलेला पहिला सिनेमा.

दोन भाऊ वेगळे झाल्याने त्यावेळी इंडस्ट्रीत बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. परंतु या दोन भावांनी कधीही एकमेकांविरुद्ध कोणतंही वक्तव्य केलं नाही.

पुढे यशराज फिल्म्स च्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम सिनेमांची निर्मिती करण्यात आली. ‘दिवार’, ‘त्रिशूल’ यांसारखे यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आजही भारतीय सिनेसृष्टीतील दर्जेदार सिनेमे म्हणून ओळखले जातात.

सुरुवातीच्या आयुष्यात वाईट वळणावर जाणारे यश चोप्रा आज रोमँटिक सिनेमाचे बादशाह म्हणून ओळखले जातात.

भारतीय सिनेमांच्या इतिहासात यश चोप्रा यांनी करून ठेवलेल्या अफाट कामाची कायमच ठळक शब्दांमध्ये नोंद घेतली जाईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.