१६ वर्षांच्या गुजराती पोरानं मुंबईच्या डबेवाल्यांना हाताशी घेऊन १४ कोटींचा बिझनेस उभा केला

आपल्याकडं एक म्हण आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं गुजरात्यांच्या बाळांचे बहुतेक धंद्यात दिसतात. तुमचं वय काय तुम्हाला अनुभव किती हे असले प्रश्न गुजरात्यांना बिझनेस उभा करताना पडत नाहीत. कारण त्यांचं डोकं धंदा म्हटलं की लय पुढं धावत असतं. मग वय किती पण कमी किंवा किती पण जास्त असो.

अशाच एका मुंबईच्या गुजराती पोट्ट्यानं लय मोठा बिझनेस लय बारक्या वयात उभा केला होता, त्याचं नाव आहे तिलक मेहता. वय वर्ष सोळा.

आता तुम्हाला बरेच प्रश्न पडले असणारेत. ह्यानं एवढ्या लहान वयात, असं फ्यूजा उडण्यासारखं केलंय तरी काय? नक्की बिझनेस उभा केलाय कसला?

तर मुंबईच्या १६ वर्षांच्या तिलक मेहताने एक कुरियर सर्विस सुरू केली होती.  नाव, Paper n Parcels.

काय? विशेष असं काय वाटलं नाय? पुढे ऐका.

ही कुरियर सर्व्हिस त्याने मुंबईच्या जवळ जवळ ३०० डबेवाल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून २०१८ साली सुरू केली. म्हणजे काय, तर मुंबईचे डबेवाले ह्या सर्व्हिसमध्ये स्वतः पार्सल्स पोहोचवण्याचं काम करत असत. बरं ह्या बिझनेसची सगळ्यात महत्वाची आणि खास गोष्ट अशी की ही कुरियर सर्व्हिस एका दिवसांत पार्सल पोहोचवायची आणि तेही अवघ्या ४० रुपयांत. दिवसाला जवळ जवळ १२०० ते १५०० पार्सल्सची डिलिव्हरी केली जायची.

आता उडल्या न फ्यूजा?

तर आता जरा सुरवातीपासून आणि जरा विस्कटून ह्या पोराचा बिझनेस नीट समजून घेऊ.

हे पोरगं आठवीत होतं. एकदा भावाकडे गेलं असताना आपली पुस्तकं तिथच विसरून आलं. परीक्षा जवळ आलेली. अभ्यास अर्थातच झालेला नव्हता. अभ्यास करायला पुस्तकं तर लगेचच लागणार होती, ह्याने लगेच पप्पाना कॉल केला. पप्पानी ड्रायव्हर तर काय अवेलेबल होणार नाही असं सांगितलं.

मग ह्याने अशी कुठली कुरियर सर्व्हिस मिळतेय का, जी त्याच दिवशी डिलिव्हरी करते ते इंटरनेटवर हुडकलं. तर त्याला काहीच घावना. जेवढ्या केवढ्या होत्या त्या लई महाग होत्या.

तेव्हा पोराला आठवले मुंबईचे डबेवाले. ज्या डबेवाल्यांना ना मुंबईचा पाऊस रोकू शकतो ना मुंबईचं ट्रॅफिक. १०० हून अधिक वर्षांपासून चालत आलेलं डबे वाल्यांचं मॅनेजमेंट म्हणजे खरोखर एक अभ्यासचाच विषय आहे.

जर मुंबईचे डबेवाले वेळेत डबे पोचवून, दररोज अख्ख्या मुंबईला जेउ घालू शकतात तर मग ते एका दिवसांत पार्सल्स कशी पोचवायची तेही सांगूच शकतात हे पठ्ठ्याने अचूक हेरलं आणि डायरेक्ट डबेवाल्यांनाच गाठलं.

तिलक तेव्हा फक्त १३ वर्षांचा होता. त्याने त्या वयात ‘शालेय’ सोडून बराच अवांतर अभ्यास केला, पण डबेवाल्यांची सिस्टिम नेमकी कशी चालते ह्याचा त्याला जवळून अभ्यास करायचा होता.

मग खूप प्रयत्न करून त्याने गाठलं थेट, डबेवाला असोसिएशनचे प्रेसिडेंट सुभाष तळेकर यांना.

त्यांना आपल्या डोक्यातली कुरियर सर्व्हिसची आयडिया सांगितली. पण त्यावेळी ह्या बारक्या पोराला कोणी सिरियसलीच घेईना. शेवटी तिलकच्या वडिलांनीच सुभाष तळेकरांशी कॉनटॅक्ट करून तिलकला डबेवाल्यांसोबत काही दिवस फिरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आणि डबेवाल्यांनी ती मान्यही केली.

मग तिलक जवळ जवळ १५ दिवस त्या डबेवाल्यांसोबत अख्खी मुंबई फिरला. त्यांचं मॅनेजमेंट जवळून पाहिलं आणि डायरेक्ट त्यांनाच एक बिझनेस ऑफर दिली. पोरगं लय हुशार..

मुंबईच्या रस्त्यावर डबेवाल्यांसोबत मधल्या वेळेत लस्सी पिता पिता, तो डबेवाल्यांना विचारायचा की “दादा, तुम्हाला चाळीस किलो ऐवजी १० किलो वजन उचलायचे कोणी एक्स्ट्रा पैसे देत असेल तर तुम्ही ती ऑफर घ्याल का?” सुरवातीला सगळं सगळ्यांनी मजेतच घेतलं पण नंतर डबेवाल्यांना सुद्धा पोराच्या बोलण्यात तथ्य वाटलं, फायदाही दिसला आणि त्यांनी तिलकची कुरियर सर्व्हिसवाली ऑफर घेतली. सोबत डबा डिलिव्हरीच्या बिझनेसमध्ये काही अडथळा तर येणार नाही ना ह्याची खात्रीही करून घेतली.

आणि मुंबईचे डबेवाले तिलकचे डिलिव्हरी पार्टनर्स बनले.

अर्थात आता ह्या सगळ्यात फक्त तिलकचं एकट्याचं डोकं नव्हतं तर सोबत त्यांच्या वडिलांची आणि काकांची सुद्धा त्याला साथ होती. वडलांना तर पोरगं धंद्याचा विचार करतंय ह्यातच धन्यता वाटत होती, आणि काकांनी तर पार आपली चांगली चाललेली नोकरी सोडून ह्या बिझनेसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला. बिझनेसबद्दल फायनॅन्शियल रीसर्च केला.

सुरवातीला तिलक ने त्याच्या वडिलांच्या कंपनीतून investment घेऊन बिझनेसला सुरवात केली होती. Paper n Parcels नावाचं अॅप लॉंच करण्यापासून ते त्या अॅपचं वर्किंग आणि लॉजिस्टिक पाहाण्यापर्यंत सगळ्यात तिलकने पुढाकार घेतला आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवलं.

तिलकच्या Paper n Parcels ह्या कंपनीचा डायरेक्ट कस्टमर म्हणजे, पॅथॉलॉजी लॅब्स, बुटिक्स,  ब्रोकररेज फॅर्म अशा कंपन्या होत्या ज्यांना फास्ट कुरियर डिलिव्हरी सर्व्हिसची गरज लागायची.

नंतर Paper n Parcels ही कंपनी कोविड काळात म्हणजेच २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात मेहेतांनी विकली पण तो पर्यंत अनेक मोठे मोठे अवार्ड्स मिळवले. पार २०१८ च्या फोर्ब्स यादीतही नाव काढलं. शिवाय त्याला मरीटाइम इंडियाच्या लॉजीस्टिक सेक्टरमध्ये, द यंगेस्ट आंत्रप्रेन्युअर हा ही अवॉर्ड मिळालाय.

थोडक्यात, या पोराकडे पाहिल्यावर आपल्याला ३ इडियट्स मधल्या आपल्या रँचोची आठवण होतेच होते. आणि रँचो प्रमाणेच ह्या पोराचंही ‘फुटुरे’ लय मोठ्ठं असणारे हे फिक्स वाटतं.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.