जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला

१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.

त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.

जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.

येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली

आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.

या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.

झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.

पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,

झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी

हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.

राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.

प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.

हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.

त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.

ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.

प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.

अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.

अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.

ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.

अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.

पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.

दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.

डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.