एका महिलेच्या मागे ९ हजार लोकं उभे राहिले आणि मुंबईच्या बस ७ दिवस बंद राहिल्या

मुंबईतल्या बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी, आठ दिवसांनी आपला संप मागे घेतला. बेस्ट बस चे वाहक म्हणजे कंडक्टर आणि चालक असे थोडे थोडके नाहीत तर तब्बल ९ हजार कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांची खूपच पंचाईत झाली होती. पण हे सगळं वादळ घडवून आणणारी एक महिला होती. एक अशी महिला जीला आपल्या नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारावर घर चालवायचं असतं आणि त्याचसाठी ती झटत होती. प्रज्ञा खजूरकर असं त्या महिलेचं नाव. त्यांचे पती रघुनाथ खजूरकर हे वेट-लीज ऑपरेटर्स या कंपनी मधून बेस्ट बसचे कंत्राटी चालक आहेत.

आपल्या नवऱ्याला कमी पगार मिळत तर आहेच पण इतर बेस्ट बसच्या कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधासुद्धा मिळत नाहीयेत, त्यामुळे  वेट-लीज ऑपरेटर्स आणि बेस्टमध्ये नक्की काय करार झाला आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या आहेत? हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. तेव्हा प्रज्ञा यांनी ४ जुलैला बेस्ट आणि इतर सरकारी विभागांना आरटीआय म्हणजे राईट टू इंफोर्मेशेनचा अर्ज पाठवला. त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा प्रज्ञा खजुरकर यांनी पुन्हा बेस्टला आरटीआय चा अर्ज पाठवला पण दोन्ही वेळेला कोणाकडूनच फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर आमरण उपोषण हाच मार्ग प्रज्ञा खजुरकर आणि रघुनाथ खजुरकर या जोडप्याकडे राहिला.

 

संपाचा भडका कसा वाढत गेला?

आपल्या आरटीआय ला बेस्ट आणि शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा प्रज्ञा खजुरकर आणि रघुनाथ खजुरकर हे जोडपं ३१ जुलैला थेट आझाद मैदानावर आपल्या मुलाबाळांसह पोहोचलं आणि ‘समान काम, समान वेतन’ म्हणत आमरण उपोषणाला बसलं. पहिल्या दिवशी तर ते एकटेच होते पण दुसऱ्या दिवशी १ ऑगस्टला घाटकोपर आगारातल्या २८० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेत आझाद मैदान गाठलं. त्यादिवशी या उपोषणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर आणि इतरकंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शेअर करण्यात आला तेव्हा बुधवारी आंदोलकांची संख्या ५०० वर गेली.

एक महिला आपल्या नवऱ्याच्या हक्कासाठी आमरण उपोषणासाठी उतरली आहे म्हटल्यावर गुरुवारी ही संख्या ३५०० वर गेली आणि शुक्रवारी ५००० हून अधिक कर्मचारी या आंदोलनात शामिल झाले होते. दिवसेंदिवस या संपात शामिल होणाऱ्या आंदोलकांच्या संख्येत वाढ होतंच होती. अखेर मंगळवारी ९००० कर्मचारी संपात सहभागी झाले. हे सगळे कर्मचारी आपल्या बायका-पोरांसोबत आझाद मैदानावर आले होते.

३१ जुलैला फक्त एका कर्मचाऱ्याने संप केला होता. तो आठ दिवसांनी ९००० कर्मचाऱ्यांचा संप झाला. सुरुवातीला घाटकोपर आगारचे कर्मचारी संपासाठी बाहेर पडले आणि ९ तारखेला देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांचे कंत्राटी कर्मचारी संपासाठी बाहेर पडले त्यामुळे शहरातल्या २७ आगारांपैकी १८ आगारातल्या बसेसवर याचा परिणाम झाला. सुमारे ८०० बस आगारात पडून होत्या.

या दरम्यान बऱ्याचदा बेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी बोलून संप मागे हटवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.

आंदोलकांनी याचं कारण सांगताना सांगितलं की, या संपाचा पुढाकार आमच्याच पैकी एका कर्मचाऱ्याच्या बायकोने घेतला होता. कोणतीही युनियन किंवा राजकीय बाजू याला नव्हती. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी अजून बळ मिळत होतं. आम्हाला कोणीही कोणाच्याही स्वार्थासाठी संप मागे घायला लावला नव्हता. म्हणून आमचं आमरण उपोषण इतके दिवस टिकून राहिलं.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय होत्या?

या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या होत्या. त्यापैकी दोन अशा मागण्या ज्यामुळे संपला सुरुवात झाली होती. एक म्हणजे पगार वाढ. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार १६ हजार इतकाच होता तो वाढवून २५ हजार करण्याची मागणी त्यांनी केली होती. कारण या तुटपुंज्या पगारात मुलांचं शिक्षण, अन्न हे सगळं करणं कठीण आहे. त्यात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्टचा प्रवास देखील मोफत नव्हता त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च सुद्धा १५-१६ हजारच्या पगारातून केल्यावर हातात काहीच उरत नाही. याच कारणासाठी पगारवाढ आणि बेस्टचा मोफत प्रवास या सुरुवातीच्या मुख्य मागण्या होत्या. त्याव्यतिरिक्त बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं, बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत करणं आणि नादुरुस्त बस दुरुस्त केल्याशिवाय रस्त्यावर न उतरवणं या त्यापैकी काही मागण्या होत्या.

कोणत्या मागण्या पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं?

पगारवाढीचा प्रश्न खूप महिन्यांपासून लांबणीवर होता. यासाठी छोटे मोठे संप-आंदोलन याधीही झाले होते. पण यावेळी मात्र ही मोहीम एका सामान्य महिलेच्या जिद्दीमुळे पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. ७ ऑगस्टला मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि याविषयी सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या प्रमुख मागण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार  आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन १८ हजार रुपये होणार आहे. वर्षाला मिळणाऱ्या हक्काच्या रजा म्हणजे CL, SL, PL सुद्धा भरपगारी देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा बस प्रवास मोफत करता येणार आहे, सोबत आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा वार्षिक दिवाळी बोनस दिला जाणार आहे आणि साप्ताहिक रजा सुद्धा भरपगारी मिळणार आहे. वार्षिक वेतनवाढ देण्याबाबत सुद्धा राज्य सरकार त्यांच्या कंपन्यांना सूचना करणार आहे, तसंच या संपाच्यावेळी झालेल्या सुट्ट्यांचा पगारसुद्धा न कापण्याचे आदेश मुख्यमंत्री त्यांच्या कंपन्यांना देणार आहेत आणि संप केल्याबद्दल कोणतीही कारवाई न करण्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलं आहे.

पण एकीकडे बेस्ट बसचे कंत्राटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी, आपल्या पोटापाण्यासाठी लढत होते आणि दुसरीकडे या संपामुळे बसचा तुटवडा झाल्याने सामान्य लोकांची, नोकरदार वर्गाची तारांबळ उडत होती. मुंबईची लाईफलाईन लोकल असली तरी ती सगळीकडे जाऊ शकत नाही. काही ठिकाणी बायरोडच जावं लागतं. मग त्यासाठी पर्याय असतो रिक्षा, टॅक्सी किंवा बस. पण मुंबईचं ट्राफिक बघता रिक्षा किंवा टॅक्सीचं मीटर जितक्या फास्ट पडतं तितकी आपली धाकधूक सुद्धा वाढत जाते. त्यामुळे या सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणजे बस.

जिथे रिक्षाचं मीटर ४०-५० रुपयांचं पडतं, तिथे आपण ५-१० रुपयाचं बसचं तिकीट काढून पोहोचतो. एवढंच नाही तर रोज ऑफिसला जरी ट्रेनने गेलो तरी पुढच्या प्रवासासाठी बस ही लागतेच. त्यामुळे लोकलला लाईफलाईन बोललो तरी बसमुळे पण मुंबई अडतेच.  या संपाच्या दिवसात बसमध्ये गर्दी वाढली होती, लोकांना कामावर, कॉलेजमध्ये शाळेत पोहोचायला उशीर होत होता. त्यामुळे हे आठ दिवस मुंबईकरांची सुद्धा खूप गैर सोय झाली होती. या संपामुळे नेहमी वेळेत चालणाऱ्या संपूर्ण मुंबईचं टाईमिंगच बिघडलं होतं.

हे सगळं घडलं होतं प्रज्ञा खजुरकरने सुरु केलेल्या संपामुळे. कोणाच्याही पाठींब्याशिवाय प्रज्ञा खजुरकर आणि रघुनाथ खजूरकर या दांपत्याने संपाला सुरुवात केली होती.

या संपाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असं त्या दांपत्याला सुद्धा वाटलं  नव्हतं. आर्थिक अडचण निर्माण झाल्यावर बेस्टने खर्च कमी करण्यासाठी २०२१-२०२२ पासूनच कंत्राटी पद्धतीने बस, बसचे चालक आणि वाहक रुजू करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काहींनी त्यांच्या कंत्राटी कंपनीवर ‘निश्चित पगार देत नसल्याचे’ आणि ‘पगार वेळेवर देत नसल्याचे’ आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे अचानक करण्यात आलेला संप असं म्हटलं गेलं असलं तरी, याचा भडका कधीना कधी उडणार होताच. अखेर हा भडका एका सामान्य महिलेने तिच्या नवऱ्याच्या आणि तिच्या कुटुंबाच्या हक्कासाठी उठवला आणि यशस्वीसुद्धा करून दाखवला.

हे ही वाच भिडू,

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.