प्रेक्षकांची टेस्ट बदलत असतानाही दिलीप कुमारांनी ५ दशकं सिनेसृष्टी गाजवली…

आज ११ डिसेंबर. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा जन्मदिन. आज जर ते हयात असते तर शंभर वर्षाचे झाले असते. त्यांच्या शताब्दी ची आज सांगता होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची छोटीशी झलक.

अभिनय सम्राट ,अभिनयाचे गिरीशंकर,अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध बिरूदावल्या ज्या अभिनेत्याला सन्मानाने लाभल्या, आणि हिंदी सिनेमातील अभिनयाचा सर्वोत्कृष्ट अविष्कार म्हणून कायम पहिले जाते  तो अभिनेता  म्हणजे दिलीपकुमार! त्याचा अभिनयाचा प्रवास मोठा ‘दिलचस्प’ होता.

तराना ,देवदास,फूटपाथ,संगदिल ,दिदार ,आरजू अशा सुरुवातीच्या चित्रपटातून भग्न हृदयाचा /वैफल्यग्रस्त प्रेमी रंगवून त्याने ‘शोकात्म भूमिकांचा राजा ‘ ही रसिकांकडून पदवी हासील केली.

एकाहून एक सरस दर्दभऱ्या भूमिकातून तो दुःखी मनाला ‘मीठा दर्द’  देत होता.

भूमिकेत संपूर्णपणे विरघळणं म्हणजे काय याचा आदर्श आणि सर्वांसुंदर परिपाठ म्हणजे दिलीपने घालून दिला. त्याचा कालखंड देखील ‘असाधारण’ असाच होता. इंग्रजी साहित्य /सिनेमा यामुळे भारतात देखील रसिक प्रेक्षकांची ‘टेस्ट’ कलात्मक दृष्टीने बदलत होती.

शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळतपणे येणाऱ्या पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होवू लागला होता.

उच्च श्रेणीची ‘सांस्कृतिक भूक’ हवीहवीशी वाटत होती. त्यामुळेच  कलकत्यात न्यू थिएटर मधील शरतचंद्र, रवींद्रनाथांच्या साहित्याचा अंतर्भाव असो,बॉम्बे  टॉकीज मधील सामाजिक आशय असो वा पुण्याच्या प्रभात मधील सामाजिक भानासोबतच असलेला नवतेचा  ध्यास असो हे त्याचेच द्योतक होते.

दिलीपच्या रूपेरी आगमनापूर्वी सोहराब मोदी,पृथ्वीराज ही बव्हंशी मंडळी रंगभूमीवरून सिनेमात आल्याने त्यांच्या आवाजाची ‘पीच’ मात्रा अधिक आणि अभिनयात  नाटकी ढंग असण स्वाभाविक होत.पण दिलीपने ही संवाद शैली मोडून काढली

त्याने शब्दाच्या ओघातील ‘स्तब्धतेचे’ महत्व अधोरेखित केले.

अलंकारित पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक,व्याकरण रहित भाषा आणली. त्याने वाक्यातील प्रत्येक  शब्दाला ‘भाव’ दिला ‘रंग’ दिला आणि चित्र प्रतिमेला ‘कलात्मक’ बनवलं.

दिलीप/राज/देव या सदाबहार त्रिकुटाच आगमन नेमकं याच वेळी झालं.

भारतात स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या स्वप्नातील भारत घडवण्यात या त्रिकुटाचा चित्रपटाच्या माध्यमातून  मोठा हातभार लागला.दिलीपच्या दर्दभऱ्या अदाकारीला देखील एक चमकत सौंदर्य होत. ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे जन्मलेल्या दिलीपकुमारचा रूपेरी पडद्यावरील प्रवेश अनपेक्षितपणे झाला. बॉम्बे  टॉकीजच्या देविकारानी ने त्याला अभिनयाबाबत विचारले.

प्रभावी व्यक्तीमत्वाचा युसुफखान (मूळ नाव)  सुरुवातीला खूप लाजाळू होता. सिनेमासाठी त्याने काही वेगळे नाव घ्यावे असे देविकारानीने त्याला सुचविले.

त्यावेळी बॉम्बे  टॉकीज मधील पंडीत नरेंद्र शर्मा यांनी ‘वासुदेव’ ‘जहांगीर’ आणि ‘दिलीपकुमार’ या  तीन नावांचे पर्याय त्याच्यापुढे ठेवले. देविकारानीचा आग्रह ‘दिलीपकुमार’ या नावाशी होता कारण हे नाव अशोकुमार या नावाशी साधर्म्य साधणारे होते.अशा प्रकारे दिलीपचे फिल्मी बारसे पार पडले.  त्याचा पहिला सिनेमा ‘ज्वार भाटा’ २६ नोव्हेंबर १९४४ रोजी प्रदर्शित झाला,आणि फ्लॉप ही झाला. त्या वेळच्या परखड सिनेमा मासिक ‘फिल्म इंडिया’ च्या बाबूराव पटेल यांनी दिलीपच्या अभिनयावर जहरी टीका केली होती.दिलीपने अंतर्मुख होवून आत्मपरीक्षण केले.

अभिनयाच्या सुधारण्याकरिता दिलीपने अपार मेहनत घेतली.

देश विदेशातील उत्तमोत्तम सिनेमे तो पाहू लागला .हॉलीवूड मधील त्या काळचे आघाडीचे कलावंत पॉल म्युनी ,जेम्स स्टीवर्ट, इन्ग्रिड बर्गमन  यांच्या अदेतील बारकावे आत्मसात करू लागला. काव्य ,शास्त्र, विनोद याची त्याला उत्तम जाण  होतीच.विविध भाषा,त्यातील व्याकरण याचा त्याने सखोल अभ्यास केला. संयत अभिनयावर भर देत त्याने वाक्यातील ‘स्तब्धतेलाही’  नवा अर्थ मिळवून दिला. अंडरप्ले अदाकारीचा  नवा आयाम  निर्माण केला.

दुःखाने भिजलेल्या दिलीपच्या अनेकानेक सिनेमांनी रसिक पुरते नादावले.

नादियाके पार,शहीद,जुगनू,मिलन,मेला,शबनम,जोगन,बाबुल, आणि अंदाज! दिलीपच्या ऐन तारुण्यातील हे सर्व सिनेमे म्हणजे त्याच्या चाह्त्याकारीता ‘मर्म बंधातली ठेव ही ‘असे आहेत! २१ मार्च १९४९ रोजी मुंबईच्या लिबर्टी या अलिशान चित्रपट गृहात ‘अंदाज’झळकला. आणि खऱ्या अर्थाने मल्टी स्टार युगाचे बिगुल वाजले.दिलीपच्या या शोकमग्न अभिनयाचा पन्नासच्या दशकातील अविष्कार आणखी गहिरा बनला. दिदार, यहुदी, संगदिल, शिकस्त, फुटपाथ आणि कळसाध्याय  शोभावा असा बिमल रॉयचा देवदास!

आज इतकी वर्ष झाली पण ‘कौन कम्बख्त है जो बर्दाश्त करनेके लिये पिता है’  ‘इतनीसी भूल और इतनी बडी सजा’ , ‘ वो शादी के रास्ते चली गई और मै बरबादी के’ हे दिलीपचे  डॉयलॉग रसिक विसरलेले नाहीत.

दिलीपच्या अभिनयाचा दुसरा टप्पा सुरु झाला बी आर च्या ‘नया दौर’ पासून!

या काळात त्याने लाईट मूडच्या,खेळकर,मस्तवाल, रोमॅंटीक टिपिकल हिंदी सिनेमाच्या हिरो सारख्या   भूमिका केल्या. यात कोहिनूर, मधुमती , लीडर, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘आदमी’,राम और श्याम, गोपी, संघर्ष या भूमिका आल्या. याच काळात त्याचे दोन महत्वपूर्ण सिनेमे आले ‘मुगल ए आजम’ आणि ‘गंगा जमुना!’

दिलीपच्या अभिनयाचा तिसरा टप्पा चरित्र नायकाचा जो सुरु झाला.

१९८१ सालच्या ‘क्रांती’ पासून या काळात त्याचे शक्ती ,विधाता ,मशाल,सौदागर ,मजदूर ,कर्मा असे चित्रपट आले.गंभीर शोकमग्न भूमिकात हातखंडा असणाऱ्या दिलीपने पुढच्या दोन्ही टप्प्यात जबरदस्त बाजी मारली.कलात्मक चित्रपट हा अलीकडच्या काळातील शब्द पण दिलीपचा मधुमती काय किंवा तराना काय किंवा ’सगिना’ काय ‘सिम्पली क्लासिक’ या गटात मोडणारे होते.

दिलीपच्या अभिनयाची हि रुपेरी यात्रा तब्बल ५० वर्षांची होती.

प्रत्येक नवा येणारा कलावंत हा दिलीपकुमारच्या अभिनयाला पाहत मोठा होत गेला. राजेंद्रकुमार आणि मनोजकुमार या दोघांनी तर दिलीपच्या  अभिनयाची तंतोतंत कॉपी करत मोठे यश प्राप्त केले. सत्तरच्या दशकात सुपरस्टार राजेश खन्नाने आपल्या अभिनयात दिलीप आणि देव दोघांचे कॉम्बिनेशन आणले. अमिताभ बच्चन यांच्या  अनेक भूमिकातून दिलीप डोकावतो.कित्येक वेळा दिग्दर्शकानेच अमिताभला सही सही दिलीपच्या अभिनयाला कॉपी करण्याचा सल्ला दिला अर्थात अमिताभ ने नंतर स्वत:ची वेगळी इमेज निर्माण केली.भावनात्मक प्रसंगात दिलीप खूप बाजी मारून न्यायचा.अभिनेता नासिरुद्दीन शहा , शाहरुख खान यांनी  देखील दिलीपला आदर्श मानून त्याचा सारखा अभिनय करण्याचा सुरुवातीला प्रारंभ केला.

अलीकडच्या काळात नवाजुद्दिन सिद्दिकी सारख्या अभिनेत्याच्या भूमिकात देखील दिलीपचा भास होतो.’शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना याने तर रुपेरी पडद्यावर सरळ सरळ दिलीपची री ओढली. दिलीपच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट समजून त्याला कॉपी करणारे जसे होते तसेच दिलीप कुमारच्या चित्रपटात त्याच्या सोबत चमकण्याचे अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींचे स्वप्न असायचे त्या मुळे प्रत्येक पिढी करीता आपलं अभिनयाचं पाणी दिलीप समोर कितपत चमकतं हि हे चेक करण्याचे माध्यम होते. राजकपूर(अंदाज), देव आनंद (इंसानियात) अशोककुमार(दिदार) ,राजकुमार (पैगाम ,सौदागर)  मनोजकुमार (आदमी,क्रांती) संजीव कुमार (संघर्ष , विधाता ) अमिताभ बच्चन (शक्ती)नासीर (कर्मा)

आज दिलीपच्या शंभराव्या वाढदिवशी त्यांची अभिनयाची सफर पहिल्या नंतर त्यांनी आपल्या अभिनयाने  भारतीय सिनेमाच समृध्द केल्याचे पटते !

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.