अमरसिंग नसते तर बच्चनला मुंबईत टॅक्सी चालवायची वेळ आली असती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. सिनेमात शाहरुख,सलमान,आमीर ही ताज्या दमाची खान मंडळी आली होती. महानायक अमिताभच वय झालं होतं. त्याला मिळणाऱ्या पिक्चरचा ओघ आटत चालला होता. जे सिनेमे रिलीज होत होते त्याला पूर्वी प्रमाणे प्रतिसाद नव्हता.

दोस्त राजीव गांधीच्या मदतीने राजकारणात हात मारून झाला पण तिथे डाळ शिजली नव्हती.

अखेर बच्चनने सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. यापूर्वी जया बच्चन यांनी देख भाई देख सारखी सिरीयल प्रोड्यूस केली होती याचा अनुभव होता.  १९९५ साली वेगळी प्रोडक्शन कंपनी स्थापन केली,

“अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड उर्फ ABCL”

फिल्म प्रोडक्शन आणि इवेन्ट मॅनेजमेंट करणारी ही कंपनी होती. पहिल्याच वर्षी कंपनीने पंधरा कोटींचा फायदा ही कमावला. अमिताभने या कंपनीसाठी लोकांकडून वा बँकेंकडून पैसे उचलले होते. अर्शद वारसी, चंद्रचूडला लॉंच करणारा तेरे मेरे सपने बनवला. तो ठीक चालला.

सुरवातीला मिळत असलेले यश बघून बच्चन साहेबांनी टीव्ही सिरीयल व इतर क्षेत्रात उडी मारली. बिगबी च सगळच काम ग्रँड असते. याच ओव्हर कॉन्फीडन्समध्ये त्यांनी १९९६ साली मिस वर्ल्ड ही स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य उचललं.

आपल्या नावाप्रमाणे बच्चनने हा सोहळा सुद्धा अतिशय भव्यदिव्य झगमगाटात पार पाडला. पण दुर्दैव म्हणजे हा बच्चनच्या आयुष्यातला सर्वात मोठा फ्लॉप शो ठरला.

कंपनीला चार कोटीचे नुकसान झाले. पुढे अनेक प्रोजेक्ट्स आणि पिक्चर मध्ये कंपनीने  पैसे लावले. जानेवारी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने कॅनरा बँकेकडे १४ कोटी रुपयांचं कर्ज मागितलं होतं. पण ते फेडता न आल्यामुळे त्यांनी अलाहाबाद बँकेतून ८ रोटी रुपयांचं कर्ज घेतलं.

१९९७ साली अमिताभच्या एबीसीएलचे मृत्यूदाता, मेजरसाब, सात रंग के सपने असे तीनचार सिनेमे आले. यातल्या दोन फिल्ममध्ये खुद्द बच्चनने काम केलेले पण यातला कुठलाच सिनेमा अपेक्षित यश मिळवू शकला नाही.

कंपनी अजूनच तोट्यात आली इतकी की १९९९ मध्ये कंपनीचे दिवाळे निघाले.

देणेकरी बच्चन यांच्या घरी ऑफिस मध्ये रोज येऊ लागले त्यांचे पैसे मागू लागले. अमिताभ बच्चन यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. मिडिया, पेपर मधुन अमिताभ वर टीका होत होती. लोक महानायक अमिताभला वाटेल त्या भाषेत बोलत होते एकंदरीत तो काळ परीक्षा बघणारा होता. अमिताभ यांनी त्या काळात खूप अपमान सोसला तो निमूट पणे गिळला.

त्याचा सुप्रसिद्ध प्रतीक्षा बंगलासुद्धा कॅनरा बॅंकेच्या कर्जापायी जप्त होणार होता. प्रकरण कोर्टात हि गेले मुंबई हाय कोर्टाने अमिताभला स्वतःची मालमता विकण्याची परवानगी नाकारली.

अमिताभ वर एकूण नव्वद कोटींचे कर्ज होते. अमिताभला अनेकांनी कंपनीचे दिवाळे घोषित करून मोकळा हो असा सल्ला दिला.

बच्चनला रस्त्यावर येण्याची पाळी आली होती. नेमक्या याच वेळी त्यांच्या आयुष्यात एका माणसाचा प्रवेश झाला. अमरसिंग

जेव्हा सगळ जग अमिताभच्या विरोधात होतं तेव्हा एकटा अमरसिंग त्याच्या सोबत उभा राहिला. बच्चनला स्वतःवरच विश्वास उरला नव्हता. पण अमरसिंगने त्याला सहाराश्री सुब्रता रॉय यांची व अनिल अंबानी यांची ओळख करून दिली. एका मुलाखतीमध्ये बच्चन म्हणतो,

“जर अमरसिंग नसता तर मला कर्ज फेडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.”

अमरसिंगनी त्याला आर्थिक मदत मिळवून दिली की नाही माहित नाही पण बच्चनला आत्मविश्वास परत मिळवून दिला. धूर्त अमरसिंग यांचे राजकारणापासून ते बिजनेस, अंडरवर्ल्ड प्रत्येक ठिकाणी असणारे कनेक्शन याच पाठबळ असल्यामुळे अमिताभने पुढच धाडस उचलायचं ठरवलं.

याच दरम्यान अमिताभ यांना कोण बनेगा करोडपती हा नवीन शो साठी  विचारण्यात आले.

त्याकाळी टीवीला इतके महत्व नव्हते. सिनेमा सारख्या ७० mmच्या मोठ्या पडद्यावरून टीवी मध्ये जाणे म्हणजे लोकांना अपमानास्पद वाटायचे आणि इथे तर बॉलीवूड चा सुपरस्टार अमिताभ वर टीवी मध्ये काम करण्याची वेळ आली होती.

अमिताभ त्याकाळी फरशी पुसायला हि तयार होता. त्याने KBC ला होकार दिला आणि शो सुरु झाला.

अमिताभला या सेट वर फक्त सूत्रसंचालन करायचे होते पण नियतीने त्याला त्याचा खरा अभिनय याच शो मध्ये करायला लावला. स्वतःच्या पैशाच्या सर्व अडी अडचणी , देनेकार्यांचे टेन्शन सोडून हसत मुखाने लोकांना सामोरे जायला लागला, लोकांना करोडोची स्वप्ने विकू लागला.

अत्यंत उत्साहात बच्चन यांनी त्या शो चे सूत्रसंचालन केले. अमिताभ यांची अत्यंत स्वच्छ आणि अस्खलित हिंदीने व त्यांच्या भारदस्त आवाजाने भारतीय प्रेक्षकांना लॉक केले होते.

लोक अमिताभचे परत एकदा दिवाने झाले. प्रत्येक एपिसोड बरोबर अमिताभ यांची लोकप्रियता आणि आर्थिक स्थिती सुधारत गेली. याच श्रेय त्याने दिल अमरसिंग यांना.

२००३ साली एबीसीएल च रुपांतर अमिताभ बच्चन कॉर्पोरेशनमध्ये करण्यात आलं. या नव्या कंपनीचे व्हाईस चेअरमन अमरसिंग हे होते.

बच्चन ज्या कार्यक्रमात जाईल तिथे सावलीप्रमाणे अमरसिंग सोबत दिसू लागले. अमरसिंग यांच्यामुळेच जया बच्चन यांना समाजवादी पार्टी कडून राज्यसभेवर धाडण्यात आलं. त्याकाळी मुलायम सिंग यांच्याही विरोधात जाण्याइतपत अमरसिंगच वजन वाढल होत.

पण पुढे काही तरी कारण घडल आणि बच्चन अमरसिंग दुरावत गेले.

अमिताभने यावर कधी भाष्य केले नाही पण फटकळ अमरसिंग यांनी अनेक इंटरव्ह्यूमधून बच्चनवर तोंडसुख घेतलं होत. पुढच्या काळात अमरसिंग यांचं नौका बुडतच गेली. एकामागोमाग एकप्रकरणात त्यांची बदनामी होत गेली. जेलची वारी करावी लागली. राजकीय कारकीर्द देखील संपली.

गेले काही दिवस अमरसिंग आजारी असल्यामुळे सिंगापूर येथे अॅडमिट होते. तिथे असताना अमिताभने त्यांना त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहणारा मेसेज पाठवला. तेव्हा भारावून गेलेल्या अमरसिंग यांनी ट्विटवरून बच्चनची माफी मागणारी पोस्ट टाकली.

अमरसिंग यांचे वादग्रस्त व्यक्तिमत्व, त्याचं बरवाईट वर्तन, त्यांचे फटकळ बोलण याबद्दल कोणी किती जरी टीका केली तरी अमरसिंग हा माणूस दोस्तांचा दोस्त होता हे मात्र मान्यच करावे लागेल.

काल दुपारी त्यांचे सिंगापूर येथे किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाले.  भारतीय राजकारण, मिडिया, सिनेइंडस्ट्री यावर घोंगावणारं वादळ अखेर शांत झाल.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.