बोलभिडू स्पेशल : जगाचं बोलताय पण आपलं महाबळेश्वर एका रोगात डबऱ्यात गेलय ते बघा

महाबळेश्वर… असे ऐकले तरी ती थंड हवा अंगावरुन गेल्याचा भास होतो. डोळे दिपवणारे सह्याद्रीचे विस्तीर्ण आणि दाट खोरे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे आणि तिच्या चार बहिणींचे उगमस्थान, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा गच्च हिरवाईच्या सौंदर्याने नटलेला घाटमाथा… असे सगळे क्षणात नजरेसमोरुन जाते. स्वर्गच जणू….

पण कोरोनाच्या दिवसांमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून हेच नंदनवन सध्या आर्थिक नुकसानीच्या गर्तेत अडकले आहे. पर्यटनावर अबलंबून असणाऱ्या हजारोंच्या तोंडचा घास कोरोनाने हिरावून घेतला आहे.

त्याच कोरोनाचा महाबळेश्वरवर झालेल्या परिणाचा ‘बोल भिडू’ने घेतलेला आढावा…

महाबळेश्वरच्या जवळपास ९०% लोकांचा उदरनिर्वाह पर्यटन आणि पर्यटनाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या व्यवसायातुन होत असतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मध्ये असल्याने इथे एकही औद्योगिक प्रकल्प नाही. बाहेरच्या लोकांसाठी महाबळेश्वर हे केवळ पर्यटनासाठी, मनोरंजनासाठीचे ठिकाण असेल पण स्थानिक नागरिकांसाठी पर्यटन हा भाकरी मिळवून देणारा उद्योग आहे.

यामध्ये अगदी मोठ्यातील मोठ्या हॉटेल व्यवसायापासून ते मक्याचे कणीस विकणाऱ्या छोट्याश्या व्यवसायिकापर्यंत सर्वांचाच समावेश आहे.

साधारण मार्च-एप्रिलमध्ये सगळ्या शैक्षणिक परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा मुख्य हंगाम चालु होतो. या तीन – चार महिन्यांच्या काळात महाबळेश्वरकर अक्षरशः रात्रीचा दिवस करुन कष्ट करतात. कारण या तीन महिन्यांच्या कमावलेल्या उत्पन्नातूनच पुढील चार महिन्यांच्या राशन, सण, उत्सव, लग्न, मुलांच्या शाळा, दवाखाने व इतर खर्चाची पूर्तता केली जाते.

कारण पावसाळी पर्यटन हे चालू असले तरी अतिवृष्टीमुळे इतर पर्यटक संख्या कमी असते. मात्र हौशी पर्यटक संख्या जास्त असते.

यानंतर येतो दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाचा हंगाम. पण हा हंगाम जास्तीत जास्त वीस दिवस ते एक महिना इतक्याच कालवधीसाठी असतो. पुन्हा तीन महिने शांत. फेब्रुवारी – मार्चमध्ये दहावी, बारावी व इतर शैक्षणिक वर्गाच्या परीक्षा असल्यामुळे पर्यटकांचा ओघ कमीच असतो. आणि पुन्हा मार्च – एप्रिलचा सिझन चालू. हे चक्र वर्षानुवर्ष चालत आलेले आहे.

मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे इथले पर्यटन क्षेत्र पुर्णपणे थांबले आहे. इथले सर्वच व्यवसाय ठप्प झाले. यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉजिंग, आईस्क्रीम पार्लर, किराणा व्यवसाय, चिक्की व्यवसाय, स्ट्रॉबेरीशी संबंधित उत्पादन विक्रेते, स्वेटर विक्रेते, छोटे दुकानदार, टॅक्सी चालक, घोडे व्यवसायिक, गाईड्स, फोटोग्राफर, मक्याचे कणीस – पॅटीस विक्रेते अशा सर्वच व्यवसायांचा समावेश आहे.

हॉटेल व्यवसायावर झाला दुरगामी परिणाम :

हॉटेल व्यवसायिक आणि महाबळेश्वर नगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,

कोरोना काळात हॉटेल व्यवसायाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वर्षातील चार महिन्यांचा सिझन लॉकडाऊनमध्येच गेला. वर्षातील सर्वाधिक बुकिंग आणि शिलकी पैसा याच काळात होतो.

मुलांच्या परिक्षा संपल्यानंतर मार्चपासून चालू होणारा सिझन आज मात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी चालू होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. याकाळातील हॉटेल्स व्यवसायाचा नुकसानाचा हा आकडा कमीत कमी १०० कोटींच्या घरात जाणारा आहे. तसेच महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करणारे मॅप्रो, मालाज् यासारखे ६ प्रकल्प येथे आहेत. त्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे.

महाबळेश्वर शहरामध्ये छोटे-मोठे मिळून अंदाजे १७० हॉटेल्स आहेत. तर ६०च्या आसपास छोटे रेस्टॉरंट्स आहेत.

यामध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये १५ पासून ८० लोकांचा स्टाफ काम करित असतो. त्यामुळे हॉटेल व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंधित असलेले कमीत कमी ६ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. हॉटेल्स बंद असल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मालकांना देखील कामगारांना कामावर ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तर हॉटेल्सशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्यांची संख्या देखील मोठी आहे.

आता सगळे सुरु झाल्यानंतर काम सोडून गेलेले सगळे कामगार परत आणणे हे मोठे आव्हान असल्याचेही कुंभारदरे यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी घट :

महाबळेश्वरची नगरपालिका ही ‘क’ वर्ग दर्जामध्ये संपुर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचे सर्वात जास्त आर्थिक स्त्रोत असलेली एकमेव नगरपालिका आहे. यामध्ये ‘वेण्णा लेक’ वरील बोटिंग क्लब मधुन सरासरी अडीच कोटी रुपये उत्पन्न आणि त्यातुन दिड कोटी रुपयांचा निव्वळ नफा होतो. महाबळेश्वरला वर्षाला जवळपास २२ लाख पर्यटक देशभरामधून भेट देत असतात. या पर्यटकांकडून घेण्यात येणारा पर्यटन कर आणि प्रदुषण करामधून वर्षाला ४ कोटी २ लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळते.

शहरातील पाणीपुरवठा योजना ही नगरपालिकेमार्फत चालवली जाते. तसेच इतर स्थानिक रहिवासींकडून आणि हॉटेल इंडस्ट्रीज् आणि व्यवसाय यांतुन सरासरी ५ कोटी रुपयांचे कररुपी उत्पन्न पालिकेला प्राप्त होते.

परंतु मागील पाच महिन्यांपासून सर्वच ठप्प असल्याने एकूणात नगरपालिकेचे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे यांनी सांगितले.

छोटे व्यवसायिक ‘जॉबलेस’ : 

महाबळेश्वरमध्ये पर्यटन पुर्णपणे बंद असल्याने या क्षेत्राशी संबंधित असलेले घोडे व्यवसायिक, टॅक्सी चालक, गाईड्स, फोटोग्राफर, छोटे दुकानदार, हातगाडीवाले या हातावर पोट असणाऱ्यांना देखील लॉकडाऊनचा फटका बसला आहे.

पर्यटकांसोबत फिरणं हेच आम्हा सर्वांच काम आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ असा ऑप्शनच आमच्याकडे नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आम्ही जवळपास दोन हजार जण ‘जॉबलेस’ असल्यासारखेच आहोत,

असे गाईड दत्तु याने बोल भिडूशी बोलताना सांगितले.

स्ट्रॉबेरीच अतोनात नुकसान :

महाबळेश्वर हा स्ट्रॉबेरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला तालुका. इथे जवळपास अडीच हजार एकरावर स्ट्रॉबेरीच उत्पन्न घेतलं जात. स्ट्रॉबेरीचा सिझन जरी डिसेंबर पासून सुरु होत असला तरीही मुख्य हंगाम हा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीन महिन्यांचा असतो. याकाळात प्रतिकिलो अगदी २०० रुपये पासून ७० रुपये किलो पर्यंतही दर मिळतो.

मात्र याच काळात लॉकडाऊन झाले आणि पुणे, मुंबईच्या मुख्य बाजारसमित्या बंद झाल्या न् ही सर्व स्ट्रॉबेरी फेकून द्यावी लागली.

मुळातच कोणताही शेतीमाल हा नाशवंतच असतो. तीन ते चार दिवसात तो विकला गेला नाहीतर खराब होतो. पण स्ट्रॉबेरीच आयुर्मान काढणीपासून अवघ्या २६ ते २८ तासांचे असते. त्याच्या आत जर तो विकला गेला नाही तर पुर्णपणे खराब होतो. तसेच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरी देखील कामगारांआभावी बंद होत्या. त्यामुळे माल टाकून देण्याशिवाय पर्यायच नव्हता. अशी माहिती स्ट्रॉबेरीचे उत्पादक शेतकरी गणपत पार्टे यांनी दिली.

किराणा बाजारपेठेवर देखील परिणाम झाला :

पाचगाणीचे किराणा व्यापारी नितीन होनराव यांनी बोल भिडूशी बोलताना माहिती दिली की,

किराणा व्यवसाय जरी अत्यावश्यक सेवेमध्ये होता तरीही या व्यवसायामधील होलसेल विक्रेत्यांचे मुख्य गिऱ्हाईक हे छोटे दुकानदार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स हे असतात. मात्र हॉटेल व्यवसाय पुर्णपणे बंद असल्यामुळे मार्चपासूनच नुकसान सहन करावे लागले. हॉटेलमधील पार्सल सेवा चालू झाल्यानंतरही बाहेरील पर्यटक नसल्यामुळे त्याचा देखील फायदा झाला नाही.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.