विक्रम गोखलेंना कळालं, “बाप आखिर बाप होता है”

कलाकार स्क्रिप्ट वाचतो तेव्हा पहिल्याच पानात त्याला कळतं की कलाकृती चांगली आहे की वाईट. मग पुढे त्या कलाकृतीचा हिस्सा व्हायचं की नाही हे सर्वस्वी कलाकार ठरवतो. परंतु अभिनेते विक्रम गोखले मात्र एखादं नाटक करण्याआधी नाटकाची स्क्रिप्ट वडील चंद्रकांत गोखले यांना वाचायला द्यायचे.

चंद्रकांत गोखले यांनाही सिनेमा, नाटकाचा भरपूर अनुभव. त्यामुळे विक्रम गोखले वडिलांना आवर्जून नाटकाची स्क्रिप्ट वाचायला देऊन त्यांचं मत जाणून घ्यायचे.

पण एकदा यामुळे एक पंचाईत निर्माण झाली. विक्रमने दिलेल्या एका नाटकाची स्क्रिप्ट वाचून चंद्रकांत गोखले इतके भारावले की त्यांनी मुलासमोर त्या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

ते नाटक होतं जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’.

गोखले कुटुंबाचं रंगभूमी आणि सिनेमा माध्यमाशी फार जुनं नातं आहे. याचं कारण असं विक्रम गोखले यांच्या आजी आणि नानी या दोघी सुद्धा भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या नायिका. त्याकाळी कोणीतीही स्त्री सिनेमात काम करण्यास धजावत नसे. अशावेळेस दुर्गाबाई आणि कमलाबाई गोखले या दोघी मायलेकींनी ‘मोहिनी भस्मासुर’ सिनेमात एकत्र काम केलं. म्हणूनच गोखले कुटुंबात अभिनयाचा वारसा पूर्वी पासूनच चालत आलेला आहे.

कमलाबाई गोखले यांचा मुलगा चंद्रकांत. चंद्रकांत गोखले यांनी अनेक भूमिका गाजवल्या.

आजही त्यांची ‘पुरुष’ नाटकातली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात असावी. रीमा लागू यांच्या वडिलांची भूमिका ते साकारायचे. या नाटकात चंद्रकांत गोखले आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी फर्मास रंगायची.

चंद्रकांत गोखलेंनी नाटक सोडलं तेव्हा नाना पाटेकर यांचा सुद्धा ‘पुरुष’ करण्यामधला रस निघून गेला, असं नाना पाटेकर यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

यावरूनच इतकंच लक्षात येतं, की चंद्रकांत गोखले हे किती महान नट होते.

एकीकडे वडिलांना नट म्हणून कलाक्षेत्रात मान होता तर दुसरीकडे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा विक्रम गोखलेने या क्षेत्रात स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. आपण खूपदा पाहतो की वडील जर ग्रेट अभिनेते असतील तर कलाकार असलेल्या त्यांच्या मुलाची कायम तुलना होते. पण असं म्हटल्यास कोणाचा विरोध नसावा की, विक्रम गोखले यांनी स्वतःची अभिनय पद्धती इतकी वेगळी केली, की त्यांचा अभिनय पाहताना मनात कुठेही या बाप – लेकाच्या अभिनयाची तुलना होत नाही.

विक्रम गोखले यांनी अनेक सिनेमे आणि नाटकांमध्ये काम केलं. एखादी चांगली भूमिका ही नटाची ओळख बनते. विक्रम गोखलेंनी सुद्धा आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती ‘बॅरिस्टर’. जयवंत दळवी लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानलं जातं. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली.

या नाटकात बॅरिस्टरची प्रमुख भूमिका करण्यासंबंधी विक्रम गोखलेंना विचारणा झाली.

विक्रम यांना घरात सगळे भय्या म्हणत. नाटकाची कोणतीही स्क्रिप्ट मिळाली की ते आधी वडिलांना वाचायला देत. चंद्रकांत गोखले यांनी अनेक मोठमोठ्या नाटककारांच्या नाटकांमध्ये काम केलं असल्याने, त्यांना नाटकांची चांगली जाण आहे असं भय्याला वाटे.

एकदा त्यांनी असंच नेहमीप्रमाणे बॅरिस्टर ची स्क्रिप्ट वडिलांना वाचायला दिली.

कोणाकडून भूमिका मागून घेणं, हा चंद्रकांत यांचा स्वभाव नव्हता. परंतु त्या वेळी मात्र काहीसं वेगळंच झालं. जयवंत दळवींनी लिहिलेली बॅरिस्टर ची स्क्रिप्ट वाचून चंद्रकांत गोखले यांना इतकी आवडली की त्यांनी विक्रमसमोर नाटकातली तात्यांची भूमिका साकारायची इच्छा प्रकट केली. वडिलांचं इतकं हरखून जाणं, आणि समोरून भूमिका मागणं विक्रमसाठी नवीन होतं.

नाही म्हटलं तरी चंद्रकांत गोखले हे जुन्या पिढीतले नट. त्यांना या नव्या वातावरणाशी कसं जुळवून घेता येईल हा प्रश्न विक्रमच्या मनात आला.

“बाबा,तुम्ही जुन्या पिढीतले नट. तुम्हाला हे सर्व कसं जमेल?”,

असं साशंक मनाने विक्रमने बाबांना विचारलं. विक्रमच्या मनातली शंका बाबांनी आधीच ओळखली असावी. ते म्हणाले,

“तू विजयाबाईंना सांग माझी एकदा फक्त तालीम घ्या. मला कसं बोलायचं हे कळलेलं आहे. त्यांनी मला फक्त हालचाली सांगायच्या. जर मी त्यांना नापसंत झालो तर पुन्हा या गोष्टीत ढवळाढवळ करणार नाही.”

नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता. विक्रमने विजयाबाईंना ही गोष्ट सांगितली.

विजयाबाईंना सुद्धा खात्री होती, की नव्या मंडळींमध्ये चंद्रकांत गोखले यांना जमणार नाही. परंतु चंद्रकांत गोखले हा अभिनयाचा दांडगा अनुभव असलेला कलाकार. त्यामुळे त्यांना कोणी नकार सुद्धा देऊ शकत नव्हतं. अखेर विजयाबाईंनी होकार दिला आणि चंद्रकांत गोखले भय्यासोबत तालमीला आले. त्यांनी रिहर्सल त्यांच्या परीने चांगली केली आणि घरी गेले. विक्रम काही वेळानंतर निरोप घेऊन आले.

“बाबा, तुम्ही उद्यापासून तालमीला या. तुम्हीच तात्या करणार आहात”.

आपण आजच्या भाषेत वशिला हा शब्द वापरतो. तसं यात असला कोणताही प्रकार नव्हता. आणि समोर विजया मेहता यांच्या सारखी दिग्दर्शिका होती. ज्यांच्या हाताखाली नाना पाटेकर, रीमा लागू, नीना कुलकर्णी यांसारखे मोठमोठे कलाकार घडले आहेत. म्हणूनच चंद्रकांत गोखले जरी असले तरीही ते या भूमिकेला योग्य आहेत का, असा पूर्ण विचार करूनच विजया मेहतांनी त्यांची निवड केली.

नाटकांमध्ये असं फार कमी वेळेस पाहायला मिळतं पण यामुळे गोखले पिता – पुत्राची जोडी मात्र ‘बॅरिस्टर’ नाटकात एकत्र झळकली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.