त्याक्षणाला नानामधल्या दगडाला पाझर फुटून बाप जागा झाला..

कोणत्याही आई – वडिलांसाठी त्यांची मुलं ही कायम जवळची असतात. त्या बाळाचे आई – बाबा इवलसं तान्हं बाळ जेव्हा पहिल्यांदा आपल्या हातात घेतात, तेव्हा त्यांच्यासाठी तो आनंद काही औरच असतो ! असाच आनंद एका आईला बाळ जन्माला आल्यावर झाला होता. परंतु मुलाचे बाबा मात्र खुश नव्हते.

ही काहीशी हळवी गोष्ट आहे अभिनेते नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती यांच्या पहिल्या मुलाची.

मुलगा जन्माला आल्यावर नीलकांती यांना खूप आनंद झाला होता. परंतु नाना मात्र नाखूष होते. असं का ?

नाना आणि नीलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मल्हार आणि नानाची बाप – लेकाची जोडी, त्यांचे फोटो बघून नानांचं मुलावर किती प्रेम आहे हे पाहायला मिळतं. हे दोघे बाप – लेक न वाटता एकमेकांचे मित्र वाटतात, इतकं या दोघांचं नातं सुंदर आहे. परंतु मल्हारच्या आधी नानांना एक मुलगा झाला होता.

वयाच्या २७ व्या वर्षी नाना पाटेकर आणि नीलकांती यांचं लग्न झालं. हा काळ नानांच्या स्ट्रगलचा काळ होता. लग्नाच्या वेळेस नाना महिन्याला ७५० रुपये कमवत होते. तर नीलकांती बँकेत कामाला असल्याने त्यांचा पगार २५०० रुपये होता.

यावेळेस नीलकांती यांनी नानांना खूप पाठिंबा दिला.

“तुला जे काम आवडतं ते काम कर. सध्या तू पैसे कमी कमावत आहेस. पण आज ना उद्या तू नक्कीच आर्थिक दृष्ट्या स्थिर असशील याची मला खात्री आहे.”

असं नीलकांती नानांना म्हणाल्या. साथीदाराने खांद्यावर ठेवलेला विश्वासाचा हात नानांना दिलासा देणारा होता. म्हणूनच नानांना मुक्तपणे अभिनय करता आला.

नाना आणि नीलकांती यांचं वैवाहिक जीवन सुखाने सुरू होतं. यामध्ये या दोघांच्याही आयुष्यात एक चिमुकला पाहुणा आला. नीलकांती यांनी मुलाला जन्म दिला. या गुड न्यूजने नानांना खूप आनंद झाला. मुलाला कधी पाहतोय असं त्यांना झालं होतं. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांना धक्का बसला.

ते मुलापासून त्याच क्षणी दूर झाले. याला कारण असं, छोट्या बाळाचे ओठ जन्मतः काहीसे कापले गेले होते. त्यामुळे ते बाळ दिसायला काहीस वेगळं होतं.

जन्माला आलेला पहिल्याच मुलाला झालेलं हे शारीरिक व्यंग पाहून ते नाराज झाले. नीलकांती यांना नानांची घालमेल कळली, पण त्या काही बोलल्या नाहीत. काही दिवसानंतर नानांनी बाळाला आणि नीलकांतला घरी आणलं.

परंतु नाना त्या बाळाशी ना खेळत होते, ना त्याची दखल घेत होते.

परंतु आईसाठी जन्माला येणारं बाळ कसंही असो, तिला ते कायम जवळचं असतं. नानांची उघड नाराजी नीलकांती यांना जाणवत होती. पण त्या नानांना काही बोलल्या नाहीत, किंवा काही समजवायचा प्रयत्न केला नाही.

बाळाची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी नीलकांती यांनी स्वतःवर घेतली.

एक दिवस घरातले बाकी सदस्य काही ना काही कामासाठी बाहेर गेले होते. नाना आणि ते छोटं बाळ दोघेच घरी. तरीही नाना त्या बाळापासून दूर बसले होते. आणि अचानक ते बाळ रडायला लागलं. नानांना काय करावं कळेना. ते उठून बाळाजवळ गेले.

छोट्या मुलाच्या डोळ्यातले नाजूक अश्रू त्यांनी पाहिले. आणि याच क्षणी नानांच्या आतला बाप जागा झाला.

त्यांनी बाळाला उचलून कडेवर घेतलं आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करताना या चिमुकल्या जीवाची काही चूक नसताना आपण आपल्याच मुलाशी किती वाईट वागलो, याची त्यांना जाणीव झाली. आणि त्याच क्षणी नानांनी मनाने मुलाचा स्वीकार केला.

नीलकांती यांना ही गोष्ट कळाल्यावर त्यांनाही समाधान वाटलं.

सगळं छान सुरू असताना नियतीच्या मनात मात्र काही वेगळं होतं. नाना आणि नीलकांती यांच्या या मुलाला आरोग्याच्या खूप समस्या होत्या. शारीरिक दृष्ट्या हे लहान मुल सुदृढ नव्हतं. नाना – नीलकांती यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु कोणतेही उपचार कामी येत नव्हते. अखेर शारीरिक अवस्था फार नाजूक झाल्याने, फार कमी महिन्यांमध्ये हे मुल दगावलं.

मुलाच्या अशा अकाली जाण्याने नाना आणि नीलकांती दोघांना मोठा धक्का बसला. नाना तर हादरून गेले होते. ते कोणाशी बोलत नव्हते. नाना काहीसे डिप्रेशन गेले. बापाचं काळीज मुलाच्या आठवणीने तुटत होतं. पुढे नाना आणि नीलकांती या दोघांना दुसरा मुलगा झाला.

यानंतर नाना मानसिक दृष्ट्या काहीसे सावरले. हा दुसरा मुलगा म्हणजे मल्हार.

नाना पाटेकर वरकरणी कितीही राकट माणूस वाटत असला तरी हा माणूस आतून किती हळवा आहे, हे यावरून अनुभवायला मिळतं. ज्या मुलाचा नाना सुरुवातीला दुस्वास करत होते त्याच मुलाविषयी त्यांच्या मनात कालांतराने प्रेम निर्माण झालं.

असा मुलगा अगदी लहान असताना आयुष्यातून गेल्यावर बाप म्हणून नानांना जबर धक्का बसला. या सर्व दिवसांमध्ये पत्नी म्हणून नीलकांती यांनी नानांना दिलेली साथ सुद्धा मोलाची होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.